गद्दारी आणि पक्षनेतृत्व!
*गद्दारी आणि पक्षनेतृत्व!*
विधानपरिषद निवडणुकीत बाळ माने यांनी भाजपच्या मदतीने किंवा भाजपने बाळ माने यांच्या साथीने केलेल्या ‘गेम’मुळे कोकणातील राजकारण ढवळून निघाले आहे आणि त्यातला सर्वाधिक चर्चेचा म्हणा, संतापाचा अगर उद्विग्नतेचा म्हणा जो मुद्दा गाजतो आहे तो म्हणजे ‘गद्दारी’ चा.
अर्थात गेल्या काही वर्षांत गद्दारी हा शब्दच मुळी भारतीय राजकारणात परवलीचा झालेला आहे. आज देशातील 75/80 टक्के लोकप्रतिनिधी हे म्हटलं तर ‘गद्दार’ याच कॅटेगिरीतले आहेत. यात ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, विधानपरिषद, लोकसभा, राज्यसभा या सर्वांचा समावेश आहे. जेव्हापासून राजकारण हे सत्ता – संपत्ती मिळवण्याचे उत्तम साधन आहे याची जाणीव ‘चतुर’ कर्यकर्त्यांना, पदाधिकारी आणि नेत्यांना झाली तेव्हापासून राजकारणाने आणि राजकारण्यांनी ओंगळवाणे स्वरूप प्राप्त केले. राजकारण हे सहज – सरळ नसते हे मान्य केले तरी त्यालाही नैतिकतेच्या मर्यादा, बंधनं असलीच पाहिजेत. पण गेल्या तीस चाळीस वर्षांत राजकारण हे अत्यन्त स्वार्थी, भ्रष्ट, तत्वशून्य, गुंडगिरी करणाऱ्यांच्या हातात गेले. त्याची घसरण ही झपाट्याने झाली आहे. लोकप्रतिनिधी अभ्यासू, प्रामाणिक, नितिमूल्य पाळणारा असावा ही आता कोणत्याच पक्षाची, त्याच्या नेतृत्वाची अपेक्षा नसते. उलट तो भ्रष्टाचारी असावा, गुंडगिरी करणारा असावा, पद – पैसा यासाठी सहज विकला जाणारा, गद्दारी करणारा असावा इतकीच माफक अपेक्षा असते. ठिकाण कोणतंही असुदे बहुमतासाठी फक्त ‘डोकी’ हवीत. ती डोकी रिकामी असली तरी चालतील. अशा परिस्थितीत देशाचे, राज्याचे, जिल्ह्याचे, तालुक्याचे राजकारण नैतिकतेच्या पातळीवर चालेल अशी खोटी आशा आणि अपेक्षा आपण तरी का बाळगावी? केवळ राजकारण्यांना दोष देऊन उपयोग नाही… आपण मतदार म्हणून आणि एरवी नागरिक म्हणूनही तेवढेच जबाबदार आहोत. हा गद्दार आहे, तो भ्रष्ट आहे, तो गुंड आहे, तो स्वार्थी आहे असं आपण नुसतं बोलतो. तोंडाची वाफ दवडतो, पण ऐनवेळी त्यालाच भरघोस मतांनी निवडून देतो. बेंबीच्या देठापासून बोंबलून त्याचा जयजयकार करतो. स्वतःच्या घरात इकडची काडी तिकडे न करणारे कार्यकर्ते कम चमचे अशा नेत्यांची थुंकीही जमिनीवर पडू देत नाहीत. जेवढी म्हणून लाचारी करता येईल तेवढी केली जाते. नेत्यांना तर अशी मंडळी आजूबाजूला कायम हवीच असतात. त्यामुळे त्यांची गद्दारीही सहज खपून जाते.
नैतिकता म्हणून राजीनामा देणारे, मिळालेल्या संधीत समाधानी राहणारे, मुलाबळांपेक्षा कार्यकर्त्याला मोठं करणारे नेते आता औषधालाही सापडणार नाहीत. तो काळ केव्हाच संपला. आता सर्व याच्या उलट! त्यामुळे ‘गद्दारी अच्छी लगती हैं’ असं म्हणण्याचा हा काळ आहे. त्यासाठी मगरीचे अश्रू ढाळण्याची गरज नाही किंवा खोटा संताप व्यक्त करण्याची गरज नाही. कारण गद्दारीला सर्वात जास्त जबाबदार असेल तर ते पक्षनेतृत्व असं माझं ठाम मत आहे.
कारण गद्दारी ही संताप वाटणारी बाब असली तरी त्याला मुळात खतपाणी कोण घालतं तर पक्षनेतृत्व! पक्षनेतृत्व निवडणुक आली ऱे आली की निष्ठावंत कार्यकर्त्याला, पदाधिकाऱ्याला विसरते. त्यावेळी केवळ निवडून येण्याचे मेरिट, सत्ता मिळवण्याचे मेरिट एवढाच विचार केला जातो. पैसेवाला हवा, दादागिरी करणारा हवा, अमक्या जातीचा – धर्माचा हवा अशा निकषात बसणारे आणि स्वतःला विकायला बसलेले उमेदवार असले की झालं. पक्षनेतृत्वाला एरवी एकनिष्ठ कर्यकर्ते आठवतात आणि निवडणूक आली की मात्र गद्दारी एक्सपर्ट उमेदवार लागतात.
आज म्हटलं तर भाजप हा मूळ कार्यकर्त्यांपेक्षा ‘गद्दार’ लोकांचाच भरणा असलेला पक्ष आहे. कमळ मोठ्या प्रमाणात फुलत असलं तरी त्याच्याखाली गद्दारीचा चिखलही तेवढाच भयंकर आहे.
इकडे उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेला तर गद्दारीचे खग्रास ग्रहण लागले आहे. पण मुळात पक्षनेतृत्व किंवा त्यांचे पहिल्या, दुसऱ्या फळीतले नेतेही निष्ठावंत कार्यकर्ते, पदाधिकारी यांना डावलून आयत्यावेळी आयात उमेदवारांना गोंजारतात, मिठ्या मारतात हे पण लक्षात घेतले पाहिजे. भाजपला पोरं पळवणारी टोळी म्हणणे ठीक आहे. ते चूक का बरोबर हा प्रश्नही वेगळा. पण तुमचे आमदार, खासदार किंवा कर्यकर्ते, पदाधिकारी तुम्हाला सांभाळता येत नाहीत हा दोष तुमचाच आहे ना. तुम्ही काय करत असता म? नुसतंच रडगाणं गाण्यापेक्षा निष्ठावन्त कार्यकर्त्याला बळ द्या. अधलेमधले जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख, उपनेते त्या त्या स्तरावर काय करतायत यावर लक्ष ठेवा. कधीतरी थेट छोट्या कार्यकर्ता, पदाधिकारी याच्याशी संवाद साधा. त्याचं मत, अडचण समजून घ्या. त्याला पाठबळ द्या, प्रोत्साहन द्या. शेवटी निष्ठावंत कार्यकर्ता हाच पक्ष आणि त्याची विचारधारा जिवंत ठेवत असतो. आज भाजप कायम इलेक्शन मोडवर असतो. तुम्हीही तुमच्या पक्षाची तयारी करा. तुम्हाला कोणी अडवलंय? Bपण काही करायचं नाही, bसंघटनेकडे चांगल्या पद्धतीने लक्ष द्यायचं नाही, नियोजन करायचं नाही, रस्त्यावर उतरायचं नाही आणि मग याने आमचा उमेदवार पळवला, त्याने गद्दारी केली म्हणून नुसतंच ओरडत सुटायचं याने काही साध्य होणार नाही. पक्षात वेगवेगळ्या स्तरावर जे नेते ‘संस्थानिक’ झाले आहेत त्यांच्यावरही लक्ष हवे. हे मधलेच नेते सर्वसामान्य कार्यकर्ता आणि नेतृत्व यांत स्वार्थासाठी भिंत तयार करतात. पक्षनेतृत्वाने पहिल्यांदा ही भिंत फोडली पाहिजे आणि केवळ सत्तेची गणितं न मांडता अगदी गरीब असला तरी निष्ठावंत कार्यकर्त्याला बळ दिले पाहिजे. कारण तोच खरा ‘आत्मा ‘ आहे मग पक्ष, संघटना कोणतीही असो. असं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत स्वार्थी डोमकावळे सर्वत्र घिरट्या घालतंच राहणार आहेत.
मकरंद भागवत, पत्रकार, चिपळूण.

