कोकणाला चक्रीवादळाचा धोका!

कोकणाला चक्रीवादळाचा धोका!

महाराष्ट्रावर पावसाचे ढग दाटले!

कोकणाला चक्रीवादळाचा धोका

 

मुंबई :- महाराष्ट्रातील नागरिकांसाठी दिलासादायक आणि तितकीच सतर्क करणारी हवामानाची बातमी समोर आली आहे. राज्यातील तब्बल २५ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, मुंबईसह कोकणात मान्सूनच्या आगमनासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. दरम्यान, अरबी समुद्रात तयार होत असलेल्या सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे कोकण किनारपट्टी आणि गुजरातसाठी चक्रीवादळाचा संभाव्य धोका निर्माण झाल्याने हवामान विभाग आणि तज्ज्ञांचे लक्ष या घडामोडींवर केंद्रित झाले आहे.

स्कायमेटचे हवामान तज्ज्ञ महेश पलावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, मान्सून सध्या कोकण किनारपट्टीपर्यंत पोहोचला असून १० जूनच्या आसपास मुंबई आणि उपनगरांमध्ये त्याचे आगमन होण्याची शक्यता आहे. तर संपूर्ण महाराष्ट्र मान्सूनच्या प्रभावाखाली येण्यासाठी सुमारे २० जूनपर्यंतचा कालावधी लागू शकतो. पश्चिम महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता कायम असताना, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये उष्णतेचा तडाखा अद्याप कायम राहण्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रात मात्र ऊन-पावसाचा खेळ सुरू राहणार आहे.

बिहारमध्ये तयार झालेल्या सायक्लोनिक सर्क्युलेशनमधून निर्माण झालेली टर्फ लाइन उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेला स्पर्श करत अरबी समुद्रापर्यंत पोहोचली आहे. त्याचवेळी गोव्याजवळ अरबी समुद्रात आणखी एक सायक्लोनिक सर्क्युलेशन सक्रिय झाले आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, १५ जूनपर्यंत या प्रणालीचे चक्रीवादळात रूपांतर होते का यावर लक्ष ठेवले जात आहे. जर परिस्थिती अनुकूल राहिली, तर कोकण किनारपट्टी आणि गुजरातला त्याचा सर्वाधिक फटका बसू शकतो.

 

विदर्भात उष्णतेचा कहर, पश्चिम

महाराष्ट्रात मुसळधार पाऊस

 

राज्यातील हवामानात मोठी विषमता दिसून येत आहे. विदर्भात सध्या उष्णतेची लाट कायम असून तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. अनेक भागांमध्ये पावसाचा मागमूसही नाही. दुसरीकडे सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. सांगलीमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून त्यामुळे उकाड्यापासून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा आणि जोरदार वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे. काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

 

नैऋत्य मोसमी वारे ८ जून रोजी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या काही भागांत दाखल झाले आहेत. पुढील सात दिवसांत केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, ईशान्य भारत आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगालमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच ९ आणि १० जून रोजी अनेक भागांत वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस पडू शकतो. या काळात वाऱ्यांचा वेग ताशी ७० ते ७५ किलोमीटरपर्यंत जाण्याची शक्यता असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

एकीकडे मान्सूनच्या आगमनाची उत्सुकता वाढत असताना, दुसरीकडे संभाव्य चक्रीवादळ आणि अतिवृष्टीचा धोका लक्षात घेता हवामान विभागाच्या सूचनांकडे दुर्लक्ष न करण्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

संपादक मकरंद भागवत

पत्रकारितेचा तीस वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक विषयांवर परखड भाष्य.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *