चक्रीवादळसदृश्य स्थिती… पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

चक्रीवादळसदृश्य स्थिती… पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

## दोन चक्रीवादळसदृश स्थितींमुळे पावसाचा जोर

वाढण्याची शक्यता ; पुढील ७२ तास महत्त्वाचे! ##

 

मुंबई :- महाराष्ट्रात पुढील ७२ तास मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. राज्यात सक्रिय झालेल्या दोन चक्रीवादळसदृश स्थितींमुळे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यापूर्वी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, नाशिकसह अनेक जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला होता. मात्र, हवामानातील बदल आणि पावसाची तीव्रता लक्षात घेऊन हवामान खात्याने (IMD) अलर्टमध्ये बदल केला आहे. त्यानुसार पुण्याच्या घाटमाथ्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबईसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे.

मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकसह अनेक भागांमध्ये ताशी ५० ते ७० किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहण्याचा अंदाज असून, ठाणे जिल्ह्यातील कल्याण आणि डोंबिवली परिसरातही मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचणे, वाहतुकीवर परिणाम होणे आणि झाडे किंवा फांद्या कोसळण्याच्या घटना घडू शकतात.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, ईशान्य अरबी समुद्र ते बंगालचा उपसागर दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. याशिवाय आंध्र प्रदेश किनारपट्टी आणि उत्तर छत्तीसगड परिसरात चक्रीवादळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. या दुहेरी हवामान प्रणालीमुळे महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले असून नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संपादक मकरंद भागवत

पत्रकारितेचा तीस वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक विषयांवर परखड भाष्य.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *