बिल्डरने चिपळूण पालिकेला फाट्यावर मारले!
*बिल्डरने चिपळूण पालिकेला फाट्यावर मारले!*
*विंध्यवासिनी रस्त्यावर काँक्रीट टाकून अतिक्रमण…*
चिपळूण – विंध्यवासिनी रस्त्यावर (डॉ. शारंगपाणी यांच्या बंगल्याच्या जागेत ) अपार्टमेंट बांधत असलेल्या बिल्डरने चिपळूण नगरपालिकेतील लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांना फाट्यावर मारल्याचे दिसून येत असून त्यामुळे येथील नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, वरील ठिकाणी बिल्डरने बिल्डिंगसमोर काँक्रीटीकरण केले आहे, मात्र ते स्वतःच्या जागेत मर्यादित न ठेवता थेट मुख्य रस्त्यावर घातले आहे. मूळ डांबरी रस्ता अर्धाच झाला आहे. त्यामुळे येथे एकदोन अपघात झाले होते. रस्त्यातच दोनतीन इंच जाडीचा काँक्रीटचा थर असल्यामुळे विशेषतः दुचाकीस्वार स्लिप होतात आणि अपघात होतात. दहा बारा दिवसांपूर्वी यासंदर्भात येथील नागरिकांनी आवाज उठविल्यानंतर पालिकेचे तरुण तडफदार बांधकाम सभापती कपिल शिर्के यांनी जागेवर येऊन पहाणी केली व बिल्डरला काँक्रीट काढून टाकण्याबाबत सूचना दिल्या तसेच पालिकेचे कर्तव्यदक्ष प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढाम्बकर यांनीही बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. कपिल शिर्के यांच्या भेटीवेळी संबंधित बिल्डरने काँक्रीट काढतो असं कबूल केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र, प्रत्यक्षात तब्ब्ल आठ दिवस होऊनही काही कार्यवाही झाली नसल्याने नागरिक तसेच वाहनचालक यांनी संताप व्यक्त केला आहे. बिल्डरने आश्वासन न पाळून पालिकेला तर फाट्यावर मारलेच पण कपिल शिर्के यांच्यासारख्या तडफदार सभापतींच्या सूचनेलाही केराची टोपली दाखवल्याचे दिसून येत आहे. एकंदरीत बिल्डर मंडळींच्या लेखी नगरपालिका पदाधिकारी आणि प्रशासनाची काडीचीही किंमत नसल्याची संतप्त भावना काहींनी व्यक्त केली.
दरम्यान, या बिल्डिंगशी सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रातील एका मोठ्या वैद्यकीय व्यावसायिकाचा थोडाफार संबंध असल्याची चर्चा आहे. तसे असेल तर संबंधित डॉक्टरांनी अनधिकृत कामाला पाठिंबा देऊ नये, बिल्डरला रस्त्यावर अतिक्रमण केलेले काँक्रीट काढून टाकण्यास सांगावे अशी अपेक्षाही काही नागरिकांनी व्यक्त केली आहे.
आता गणपतीत वाहतूक वाढतेच, पण विंध्यवासिनी देवीच्या नवरात्र उत्सावात तर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. हजारो भाविक येत असतात. अशावेळी अपघात झाला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी बिल्डर आणि पालिकेची राहिल असेही काही नागरिकांनी ठणकावून सांगितले आहे.
*कोकण रिपोर्टर*

