चिपळूणचे डॉक्टर्स आणि चुकणारी वेळ!

चिपळूणचे डॉक्टर्स आणि चुकणारी वेळ!

*चिपळूणचे डॉक्टर्स आणि चुकणारी वेळ!*

 

मकरंद भागवत, पत्रकार, चिपळूण.

मो. 9850863262

 

डॉक्टर हे देवदूत आहेत अशी आपल्या प्रत्येकाची भावना आहे. होणारे आजार, त्याच्या वेदना यातून मुक्तता डॉक्टर देत असतात. अगदी जीवन मरणाच्या प्रसंगात आपण देवाचा धावा करतोच पण बरंचसं काही डॉक्टरांच्या प्रयत्नांवर अवलंबुन असतं. त्यामुळे डॉक्टरी पेशाबद्दल पूर्ण आदर राखून काही बाबी समोर आणायच्या आहेत…

पहिली गोष्ट म्हणजे चिपळूणमधील स्वतःचे दवाखाने, हॉस्पिटल असणारे, मोठ्या हॉस्पिटलमध्ये सेवा करणारे आणि व्हिजिटिंग डॉक्टर्स रुग्णाला दिलेली वेळ पाळत नाहीत. जवळपास 90% ठिकाणी हा अनुभव येतो. मी स्वतः अनेकदा अनुभव घेतला आहे आणि पत्रकार म्हणून असंख्य रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांनी याबाबत सांगितलं आहे. नाराजी व्यक्त केली आहे. म्हणून याबाबत सोशल मीडियावर लिहायचं ठरवलं.

चिपळूणला आजूबाजूच्या ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात रुग्ण येत असतात. गाडी असणाऱ्यांना काहीसं सोईस्कर असलं तरी बहुतांशी रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांना एसटी बस किंवा वडाप यावर अवलंबुन रहावे लागते. त्यामुळे त्यांची होणारी धावपळ लक्षात घेतली पाहिजे. आपल्याकडचे (अपवाद सोडून )डॉक्टर्स सकाळीही वेळेत येत नाहीत आणि संध्याकाळीही. इमरजन्सी ही रोज नसते तरीही. रुग्णाला दहा वाजता बोलवायचं आणि आपण मात्र अकरा, साडे अकरा, बारा कधीही यायचं. संध्याकाळी पण तेच. दिलेल्या टायमिंगचं आणि डॉक्टरांचं गणित कधी जुळत नाही. बरं त्याबाबत योग्य ती माहिती देण्याची तसदी घेतली जात नाही. बराचसा स्टाफ हा ‘चहापेक्षा किटली गरम’ या वर्गातला! रुग्ण, त्याचे नातेवाईक ही माणसं नसून पैशाचं ATM आहेत अशाच पद्धतीने त्यांचं वागणं, बोलणं! कधीकधी अशा स्टाफमुळे ‘स्वागत कक्ष’ का म्हणतात असा प्रश्न पडतो. सौजन्याने बोलणे, पेशन्टला धीर देणे, प्रसन्न वातावरण ठेवणे ही जबाबदारी डॉक्टरांची आणि स्टाफची आहे. कारण त्यामुळे पेशन्ट अर्धाधिक बरा होत असतो. पण काहींना खेकसणे , पुरेशी आणि समजेल अशी माहिती न देणे हा रोगच जडलाय.

संध्याकाळी तर डॉक्टर्स कधीच वेळेत येत नाहीत. पुरेसे पेशन्ट असल्याशिवाय यायचंच नाही असं धोरण दिसतं. पण त्यामुळे वेळेत येणाऱ्या पेशन्टला त्रास सहन करावा लागतो. पेशन्ट एखादं दुसरा असेल तरी वेळेत येऊन (थोडा वेळ इकडे तिकडे होऊ शकतं, पण त्यालाही मर्यादा आहे.) त्याला तपासणे, उपचार करणे हे कर्तव्य आहे. हा काही व्यवसायाचा भाग होऊ शकत नाही.

काही व्हिजिटिंग डॉक्टर्स लिमिटच्या बाहेर व्हिजिट ठेवतात आणि त्यांच्या तारखा, दिवस,वेळ याचं गणित जमत नाही त्यामुळे शेवटी गैरसोय ही पेशन्टचीच होते.

 

ता. क. – माझा मुद्दा हा वेळ पाळण्यासंदर्भातला आहे. तो चिपळूणचा असला तरी रत्नागिरी जिल्ह्यातील डॉक्टर्सना लागू होणारा आहे. त्यामुळे डॉक्टर्स इमरजन्सी सोडून एरवी तरी वेळ पाळण्याचा प्रयत्न करतील, स्टाफला पेशन्ट् आणि नातेवाईक यांना व्यवस्थित सौजन्य राखून माहिती देण्याविषयी लक्ष घालतील अशी अपेक्षा आहे. उपचार, कट प्रॅक्टिस, बिलिंग, टेस्ट, औषधं, आरोग्य विमा, सरकारी योजना यातून चालणारे गैरव्यवहार हे मुद्दे आहेतच. पण साधी अपेक्षा एकच आहे…वेळ पाळा (15/20 मीनिटे इकडे तिकडे ) आणि रुग्णाला योग्य ती माहिती द्या. बस्स. बाकी काही नाही. मिरज – सांगलीकडे रुग्णांचा ओढा का आहे.. हजारो रुग्ण तिकडे का जातात यावरही येथील डॉक्टरांनी विचारमंथन करायला हरकत नाही.

## लेखासाठीचा फोटो सिम्बॉलिक आहे, पण डॉ. नी हसतमुख रहायला हरकत नाही.

संपादक मकरंद भागवत

पत्रकारितेचा तीस वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक विषयांवर परखड भाष्य.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *