घरातल्या घरात भाजप!

घरातल्या घरात भाजप!

*घरातल्या घरात भाजप..!!*

 

मकरंद भागवत, पत्रकार, चिपळूण.

मो. 9850863262

 

 

भाजपचे सर्वाधिक प्रभावी आणि यशस्वी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, त्यांचे प्रमुख सल्लागार आणि कोकणातील भाजपचे खरे धुरंधर अनिकेत पटवर्धन, मुरब्बी राजकारणी आम. प्रमोद जठार आदींचा नुकताच रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा झाला. या दौऱ्यामुळे गेल्या आठ दहा महिन्यात भक्कम झालेला आणि प्रसंगी स्वबळावर कोकणातील सर्व आमदार, खासदार निवडून आणू शकणारा भाजप लोकांच्या नजरेत भरला. भाजप सुसाट आणि बाकी सर्व कोमात अशी परिस्थिती निर्माण करण्यात स्थानिक पातळीवरील नेते, पदाधिकारी यांना यश आले आहे. भाजपची वाढलेली आणि यापुढे वाढतच राहणारी ताकद लक्षात आल्यामुळे शिंदे शिवसेनेचे बलाढ्य सरदार उदय सामंत, भैय्या सामंत, रामदासभाई, योगेश कदम, अजितदादा राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम, ठाकरे गटाचे शिलेदार भास्कर जाधव आणि या सर्वांचेच छोटे मोठे साथीदार गळीतगात्र झाले आहेत. आता आपले अस्तित्व संपणार, आपले कार्यकर्ते – मतदार आपल्याकडे टिकतील का या भयाने सर्वांना पछाडले आहे. दिवसाच नव्हे तर रात्रीपण त्यांना स्वप्नात भाजपचे दोन जिल्हाध्यक्ष दिसतात. डोळ्यासमोर कमळं अक्षरशः फुलतात. पुढच्या निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यात भाजप शत – प्रतिशत असणार या कल्पनेनेच काहींनी धनुष्यबाण खुन्टीला अडकवून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. काहींजण घड्याळ कपाटात बंदिस्त करणार आहेत तर काही मशाल विझवून घरी बसण्याचा विचार करत आहेत. या सर्वांमध्ये फक्त भीती कोणाला वाटलेली नाही तर ती तुतारी वाजवणाऱ्या माणसाला! कारण तो आधीच गायब झालेला आहे. प्रश्न उरला हाताचा… पण त्यालाही काही फरक पडत नाही. हातात हात घेऊन पक्ष वाढवायचा नसतो तर पायात पाय घालून पाडायचा असतो हेच त्यांचे ब्रीदवाक्य आहे. त्यामुळे आता यापुढे नुसताच घराघरात भाजप नसेल तर तो घरातल्या घरातही असणार आहे. या महत्वाकांक्षी मोहिमेची सुरुवात सहा महिन्यापूर्वी झालेली आहेच. त्याला अभूतपूर्व यश मिळाल्याने जो तो निर्भेळ दुधाचे पेढे एकमेकांना वाटतोय!

एक व्यक्ती, एक पद असं खूळ पूर्वी पक्षात होतं, पण घरोघरी जाऊन पक्ष वाढत नाही असं लक्षात आल्यावर घरातल्या घरात पदांची खिरापत वाटण्याचा निर्णय घेण्यात आला. नवरा, बायको, मुलगा, मुलगी याबरोबरच सासरचे – माहेरचे, मित्रमैत्रिणी, लाळघोटे यांनाही पदे देण्याचा विचार करण्यात आला. हा प्रयोग यशस्वी होत असल्यामुळे आता नातवंड, पतवंड यांनाही पदं देण्याची शिफारीश करण्यात आली आहे. युवा मोर्चा, महिला मोर्चा याप्रमाणे अनेक जाती, धर्म, उपजाती, व्यवसाय, उपव्यवसाय असे असंख्य मोर्चे निर्माण करुन पदाधिकारी नेमण्याची कल्पना ‘युनिक’ आहे. कार्यकर्त्याला पद (मग ते कसलं पण ) नाही दिलं तर तो काम करीत नाही. त्याची निष्ठा डळमळीत होते असा निष्कर्ष काढण्यात आला. त्यामुळे आज भाजपमध्ये कार्यकर्ते नाहीत तर पदाधिकारी दिसतात. घरातल्या घरात पक्ष वाढविण्यासाठी भाजप बालक मोर्चा, भाजप बालिका मोर्चा, भाजप सगेसोयरे मोर्चा यांची निर्मिती करण्याचा विचार होऊ शकतो.

नवीन आलेले नेते, पदाधिकारी हे जुन्या – जाणत्यांपेक्षा निश्चितच निष्ठावंत आहेत. त्यांना इतकं ‘बौद्धिक’ दिलं गेलं आहे की त्यांच्या पुढच्या चार पिढ्या तरी भाजप सोडणार नाहीत. त्यांच्या तनामनात आणि धनात आहे केवळ कमळ आणि कमळ! उद्या कदाचित सत्ता नसली तरी हे कट्टर भाजपेयी हात दाखवणार नाहीत! तुतारीच्या मालकाच्या शोधात जाणार नाहीत. एक हजार एक टक्के. एवढी खात्री रवींद्र दादांना आहे.

जुन्यांनी उगाचच एक व्यक्ती एक पद, निष्ठा याचे पालूपद लावू नये आणि स्वबळावर लढण्याची निर्माण झालेली ताकद कमी करू नये असा अप्रत्यक्ष इशारा चव्हाण यांच्या दौऱ्यातून देण्यात आल्याचे दिसते. कारण चव्हाण हे फक्त जिल्हाध्यक्ष यांच्याच कानात सतत काहीतरी मंत्र देत होते. हा मंत्र काय आहे तो आगामी काळात कळेल. या मंत्रावर देवेंद्रजी यांचे काय तंत्र आहे तेही आगामी काळात कळेल. तोपर्यंत आपण सर्वांनाच जागोजागी कमळं फुललेली दिसतील. त्याचा आनंद घेऊया. बाळ मानेही निवान्त राहून या कमळांचा आनंद लुटत आहेत. त्यांना देवेंद्रजींनी आनंद घेण्याचे तंत्र शिकवले आहे.

 

ता. क. – भाजपचे सर्वात मोठे यश म्हणजे इकडचे तिकडचे भ्रष्टाचारी यांना प्रचंड संख्येने एकत्र आणून त्यांच्यावर म्हाळगी प्रबोधनीत (त्याआधी ईडी, आयटी, चौकशा यांची तोंडओळख करुन देण्यात आली) उत्तम संस्कार करुन, त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात निष्ठा भरून दिली आहे. ते आता भ्रष्टाचारी नसून भाजपचे स्वच्छ चरित्र्याचे कट्टर कर्यकर्ते बनले आहेत. आता भाजपला 2047 च नव्हे तर हे शतक संपेपर्यंत कोणीही धक्का लावू शकणार नाही.

  • जय कमळ! जय भाजप!!

संपादक मकरंद भागवत

पत्रकारितेचा तीस वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक विषयांवर परखड भाष्य.

Related articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *