उत्सव : उत्साह आणि उन्माद…
*उत्सव : उत्साह आणि उन्माद…*
(स्वार्थी पुढऱ्यांना टाळा, समाज लवकर सुधारेल…)
मकरंद भागवत, पत्रकार, चिपळूण.
मो. 9850863262
डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना एका (क्रांतिकारी विचारांच्या) तरुणाने मारहाण करण्याचा प्रयत्न केला. क्रांतिकारी विचारांनी प्रेरित होऊन त्याने पूर्वीही काही गुन्हे करुन समजपयोगी काम केल्याचे कळते. बापट यांना मारहाण करण्याचा प्रयत्न करणारा हा शिंदे नामक इसम काहींचा हिरो झाला आहे. काही लोकं (त्यात सटरफटर सर्वपक्षीय पुढारी आहेत, जात – धर्म याची ठेकेदारी घेतलेले आहेत) बापटला चापट, बापटला थापट अशा काहीतरी पोस्टी करुन आपला विकृतपणा दाखवून देत आहेत. माझ्या मते ही बापटला चापट किंवा थापट नसून समाजात वाढत असलेल्या अविवेकाचे, अविचाराचे, विकृतीचे आणि विनाशाकडे झपाट्याने सुरु असलेल्या वाटचालीचे द्योतक आहे. बापट हे स्वतः नास्तिक आहेत असं सांगतात. त्यामुळे उत्सव आणि श्रद्धा याबाबत त्यांचे सर्वच विचार पटतील असं नाही, परंतु त्यांनी उत्सवांचे होत असलेले विकृतीकरण, ध्वनी-हवा-पाणी प्रदूषण, मानसिक, शारीरिक त्रास, नितीनियम याबाबत व्यक्त केलेली मतं अजिबात चुकीची नाहीत. फक्त मुद्दा एवढाच आहे की हे सर्व एका फटक्यात बंद होईल का? सुधारणा होईल का? तर त्याचं उत्तर ‘नाही’ असंच आहे. टप्प्याटप्प्याने त्यात बदल घडवून आणता येईल. त्यासाठी कायदा- सुव्यवस्था सांभाळणाऱ्या पोलिसांची जबाबदारी नक्कीच जास्त आहे, परंतु समाजाचे पुढारीपण करणाऱ्यांची, सामाजिक संघट्नांची जबाबदारीही तेवढीच आहे.
मुळात उत्सवांचे बाजारीकरण सुरु झाले ते गल्लीबोळातल्या राजकीय, जाती- धर्माच्या स्वयंघोषित पुढाऱ्यांनी, गुंडापुंडानी त्यात स्वतःच्या मोठेपणासाठी, सत्ता – संपत्तीच्या स्वार्थासाठी इंटरेस्ट घेतला तेव्हापासून. त्यामुळेच या सार्वजनिक उत्सवांना विकृत स्वरूप प्राप्त झाले. यात सर्व जात – धर्म आले. मुळात सर्वात मूर्ख नव्हे तर महामूर्ख कोण असू तर आपण सामान्य, मध्यमवर्गीय माणूस! या राजकीय पुढाऱ्यांनी सर्वात जास्त वाट लावली आहे समाजाची. ते कोणी मोठे देशभक्त नव्हेत, ते कोणी मोठे समाजसेवक नव्हेत, ते कोणी मोठे धर्मात्मे नव्हेत, पण या सगळ्याचं सोंग ते उत्तम वठवतात. आणि आपण येड्यासारखं त्यांच्या मागेपुढे करत असतो. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वत्र हेच चित्र आहे. पुढारी असल्याशिवाय आपलं पानच हलत नाही. (समाजात चांगली , अभ्यासू, कर्तृत्ववान माणसं नाहीत का…)आपणच त्यांना गरजेपेक्षा जास्त महत्व दिले आहे. आणि ते काय करतायत तर आपल्या कुटुंबाचे सात पिढ्यांचे कल्याण! स्वतः, बायको, मुलगा, नातू, पणतू असं लचांड आपलं सुरूच! आणि स्वतःच्या घरात इकडची काडी तिकडे न करणारे, स्वतःच्या आईबापाला न विचारणारे या अत्यन्त लबाड, स्वार्थी पुढऱ्यांचे पाय चाटायला मात्र पुढे!!! (ज्या राजकीय नेत्यांना वाटतंय की आपण प्रामाणिक आहोत त्यांनी वाईट वाटून घेऊ नये. प्रत्येकाने आपल्या मनाला विचारावे) त्यामुळे पुढऱ्यांचे फावते आणि ते पैशाच्या, दादागिरीच्या जोरावर उत्सवांचे विकृतिकरण करतात.
उत्सव साजरा करताना परंपरा, संस्कार, त्यातून मिळणारा आनंद, मानसिक समाधान याला महत्व द्यायचे की तो अधिकाधिक त्रासदायक होईल यासाठी प्रोत्साहन द्यायचे? उत्सवातील ‘उत्साह’ वेगळा आणि ‘उन्माद’ वेगळा. आज उन्माद वाढला आहे. तो वेळीच ठेचला पाहिजे. याचा प्रत्येक जाती धर्मातील लोकांनी विचार केला पाहिजे. आपण शिकलोय, भौतिक सुखं आली, पण आपण सज्ञानी, संस्कारी झालेलो नाही. उलट अधिकाधिक बिघडत चाललो आहोत.
सामान्य किंवा विशेषतः मध्यमवर्गीय माणूस हा घरातच शूर असतो. कुटुंबात बसून त्याला बरंच काही वाटतं. पण जेव्हा बोलायची, प्रश्न करायची, रस्त्यावर उतरण्याची वेळ येते तेव्हा त्याची फाटते. काही तर ‘मला काय करायचंय’ या विचाराने प्रेरित झालेले! हे कुठेतरी बदललं पाहिजे. चांगल्या माणसांची, विचारांची ताकद वाढली की वाईट प्रवृत्ती आपोआप मागे हटतात.
*अशा मंडळाकडे फिरकू नका…*
उत्सव साजरे व्हायला हवेत. त्यासाठी नितीनियम, मर्यादा हव्यात. आजकाल अनेक सार्वजनिक मंडळाच्या उत्सवाचा मुख्य हेतू हा प्रचंड मार्केटिंग आणि त्यातून अफाट मिळणारा पैसा! (भक्तांसाठी ते दान ) मग त्यातून येणारी वेगळीच मस्ती आपण पाहतो. अशावेळी खरी जबाबदारी म्हणा किंवा परिणामकरक गोष्ट आपण करू शकतो ती म्हणजे अशा मंडळाकडे बिल्कुल न फिरकणे… त्यांचा पैशाचा स्रोत आटला पाहिजे. कारण हे पुढारी किंवा कार्यकर्ते काही स्वतःच्या मेहनतीचे आणि खिशातले पैसे खर्च करून एवढे मोठे उत्सव साजरे करत नाहीत. त्यामुळे लोकांनी जी सार्वजनिक उत्सव मंडळं पारंपरिक पद्धतीने, नितिनियम पाळून त्रासदायक होणार नाही अशा पद्धतीने, विधायक उपक्रम राबवून आणि प्रामुख्याने विनम्रपणा ठेऊन उत्सव साजरा करत असतील तिथे अवश्य जावं. विकृत लोकांना धडा शिकवण्याचा हाही एक उत्तम आणि सनदशीर मार्ग वाटतो.
ता. क. – बापट यांना मारहाण प्रयत्न झाला त्याविषयी बोलताना आनंद दवे नामक व्यक्ती म्हणाली की, फक्त चापट मारली. त्याला हल्ला म्हणता येणार नाही. असे प्रकार पुण्यात रोज अनेक घडतात. तसं तर काय पुण्यात रोज चाकू, कोयता मारला, दाखवला असे अनेक प्रकार घडत असतील. पण दवे यांच्या म्हणण्यानुसार मग तो जोपर्यंत चाकूने, कोयत्याने खून करत नाही तोपर्यंत त्याला महत्व नाही, ते क्राईम नाही असं समजायचं का? बारीकसारीक चोरी किंवा गुन्हे करतच अट्टल दरोडेखोर, गुन्हेगार तयार होतात ना?
कोणी म्हणतंय आमच्या लाखो रुपयाच्या सिस्टीमचं काय करायचं… एक तर नियम माहिती असताना ती का घेतली? त्यातूनही घेतली तर नियम पाळून वापरायची तयारी का नाही? असा प्रश्न उरतोच.

