शून्य समस्या! लोटे MIDC म्हणजे जणू स्वर्गच!!
*शून्य समस्या! लोटे MIDC म्हणजे जणू स्वर्गच!!*
मकरंद भागवत, पत्रकार, चिपळूण.
मो. 9850863262
आठ दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी लोटे औद्योगिक वसाहतीची पाहणी केली आणि येथील उद्योजकांशी संवाद साधला. चाकण MIDC तील सुविधांची बोंबाबोंब चर्चेत आल्यावर राज्यातील इतर औद्योगिक क्षेत्रही सरकारच्या आणि विरोधकांच्या रडारवर आले. आपले अपयश झाकून आपणच कसे नंबर वन आहोत हे पटवून देण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री पुढे सरसावले. त्याचवेळी विरोधी पक्षातील नेते, आमदारांनी औद्योगिक वसाहतीची कशी दयनीय परिस्थिती आहे हे दाखवण्याचा जोरकस प्रयत्न केला. त्यासाठी पाहणी दौरे केले. अर्थात आपल्याकडे एकंदर स्वार्थी राजकारण पाहता यातून काही चांगलं निर्माण करण्यापेक्षा आपला राजकारणाचा धंदा म्हणा, कारखाना म्हणा किंवा उद्योग म्हणा (दुकान आता जुनं झालं )चालू कसा राहिल यासाठीच प्रयत्न होतात हे वास्तव आहे. आजचे राजकीय नेते मग ते विरोधी असोत वा सत्ताधारी फार कोत्या मनाचे, विचारांचे आहेत असं माझं स्पष्ट मत आहे. केवळ राजकीय कुरघोड्या करण्यात त्यांना इंटरेस्ट आहे. राज्याच्या, देशाच्या, समाजाच्या हितासाठी राजकीय स्वार्थ बाजूला ठेऊन एकत्र येण्याचे दिवस फार पूर्वीच संपले. आज तेवढ्या उंचीचे, दूरदृष्टीचे नेते नाहीत हे दुर्भाग्य आहे.
तरीही आपण गृहित धरू की आदित्य ठाकरे हे व्यापक विचार घेऊन आले असतील, त्यांना या midc तील प्रश्न जाणून घेऊन ते सोडविण्यात रस असेल. पण येथील उद्योजकांबरोबर जी चर्चा झाली त्यात त्यांना या लोटे औद्योगिक वसाहतीत कोणत्याच समस्या नसल्याचे सांगण्यात आले. त्याचबरोबर सुभाष देसाई उद्योगमंत्री असताना उत्तम सहकार्य मिळाले आणि सध्या उदय सामंत यांचे तर प्रचंड सहकार्य मिळत आहे असे कौतुक करुन ‘राजकीय शहाणपणा किंवा समतोल’ साधला गेला याबद्दल डॉक्टर आणि वकिलांचे जोरदार कौतुक सुरु असल्याचे कळते. तशी चर्चा ऐकण्यास मिळते.
लोटे औद्योगिक वसाहतीत काहीच समस्या नसल्याचे कळल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात याविषयी चर्चा चालू आहे. चाकणसह इतर औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांना लोटेतील आपल्या बांधवांचा खूप हेवा वाटत आहे. त्यातील काहीजणांनी उत्सुकतेपोटी गुप्तपणे लोटे वसाहतीची पाहणी केली. आम्हीही पत्रकार म्हणून पाहणी केली आणि खरं सांगतो, डोळ्यांवर विश्वास बसेना. लोटेतील उद्योजक आणि त्यांच्या लीडर्सनी आदित्य ठाकरेंना जे सांगितलं त्यापेक्षा जास्तच सुंदर चित्र पाहण्यात आलं. संपूर्ण midc फिरल्यावर आपण साक्षात स्वर्गात आहोत असं वाटलं. ना कसले प्रश्न, ना समस्या. सर्व कसं अगदी सुखात, आनंदात, सुरळीतपणे चालू. रस्ते एवढे ऐसपैस आणि गुळगुळीत की, टँकर मधून जर एखादं रसायन सांडलं तर अगदी सहज गोळा करावं. अर्थात हे शक्यच नाही. एवढे सुंदर रस्ते असताना बाकी काही दुर्घटना घडण्याची शक्यताच नाही. चालक मंडळींनाही याच क्षेत्रात ट्रक, कंटेनर, टँकर चालवावेसे वाटतात. बाहेर जायला त्यांचे मन तयार होत नाही. रस्ते सुंदर त्याचबरोबर वीजपुरवठा अतिशय अखंडितपणे सुरु असतो. खरं तर वीज मंडळ 24 तासापेक्षाही जास्त तास वीज पुरवठा करू शकतं, पण अडचण ही झालीय की दिवस 24 तासांचा आहे. वीज पुरवठा गेली कित्येक वर्ष अखंड सुरु असल्यामुळे कारखान्यांचा जनरेटरचा खर्च अनावश्यक ठरला आहे. त्यांना खरं तर गंज आला असता पण स्वर्गात असल्यामुळे ते सुस्थितीत आहेत. एकदातरी जनरेटर वापरायला मिळावा असं त्यांना वाटतंय. उद्योग म्हटलं की रस्ते, वीज आणि पाणी हे अत्यावश्यक घटक. येथील औद्योगिक क्षेत्रात पाण्याची अजिबात समस्या नाही. विजेप्रमाणेच पाणी पुरवठा पुरेशा दाबाने आणि अखंडित. मे महिन्यात स्वर्गाच्या हितशत्रूनी त्यात गडबड करण्याचा प्रयत्न केला, पण भविष्यात असा प्रकार घडू नये यासाठी डॉक्टर, वकील यांचे नेतृत्व आणि उद्योगमंत्री सक्षम आहेत.
इथे प्रदूषण अजिबात नाही. ना हवेचे, ना पाण्याचे. रोज ताजी, स्वच्छ हवा मिळते म्हणून बाहेरचे लोकही इथे मोठ्या संख्येने येतात. मुंबई- गोवा महामार्गचा काही भाग या स्वर्गातून जातो. यावरून प्रवास करणारे या हवेमुळे प्रफुल्लित होतात. कारखाने आणि कारखानदार हे नियम काटेकोरपणे पाळतात त्यामुळे प्रदूषित पाणी बाहेर ओढ्या नाल्यात, नदीत सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. दाभोळ खाडीतील मासे मरतात ते फार शुद्ध पाणी सोडले गेल्यामुळे. येथे सुरक्षाविषयी शंभर टक्के काळजी घेतली जाते. आग, स्फोट किंवा इतर अपघात या स्वर्गातीत midc ला ज्ञातच नाहीत. यासदृश जे काही आपण ऐकतो तो ‘मॉक ड्रिल ‘ चा भाग असतो. कारखानदार किंवा त्यांचे व्यवस्थापन कामगारांची ‘माणूस’ समजून काळजी घेतात. त्यांचे आरोग्य, सुरक्षा यासाठी सर्व सुविधा उपलब्ध असतात. येथील लेबर कॉन्ट्रॅक्टर तर कामगारांना इतकं प्रेम देतात की बोलायलाच नको. त्यांचे वेतन, खाणंपिणं, राहणं, पीएफ आणखी बरंच काही उत्तम दर्जाचे असतं. प्रदूषण मंडळाचे अधिकारी, कामगार विभागाचे अधिकारी, इन्कमटॅक्स, सेल्सटॅक्स, जिएसटी अधिकारी यांनी फक्त दर महिन्याला एक ‘चक्कर’ मारायची आणि आनंद खिशात मावेना म्हणत परत जायचं.
इतर औद्योगिक वसाहतीत राजकीय विशेषतः स्थानिक लहान मोठ्या पुढऱ्यांचा कॉन्ट्रॅक्टचा, देणग्या, खंडणी याचा जो त्रास असतो तो इथे नाही. मुळात असं कोणी असतं हेच येथील उद्योगाना माहिती नाही. स्वर्गवत midc असल्यामुळे येथील सर्वपक्षीय पुढारी कॉन्ट्रॅक्टसाठी नाही तर समाजसेवेसाठी उत्सुक असलेले दिसतात.
एक मात्र आहे. स्वर्ग असूनही काही लोकांना गुजरात, तेलंगणा येथील आकर्षण जास्त. इथे काहीतरी खोड काढून बाहेर जायला बघायचं. हे बरोबर नाही. याबाबत अध्यक्षानी वकिली पॉईंट काढला होता, पण डॉक्टरांनी त्यांना सरकार आणि सामंत साहेब यांचे महात्म्य नजरेस आणून दिलं आणि आपल्या गोड भाषेत ‘डोस’ दिला. त्यानंतर जी काही थोडीफार खळखळ चालू होती त्यावर सर्व उद्योजकांनी पडदा टाकला. आत्ता कोण महत्वाचा आहे याचे ज्ञान डॉक्टरांना जास्त आहे. सामंत साहेबांच्या विषयी त्यांना खूपच प्रेम आहे. विश्वास आहे. ते जोपर्यंत उद्योगमंत्री आहेत तोपर्यंत तरी ही midc पंचतारांकितच काय सप्ततारांकित होईल याची त्यांना खात्री आहे. नाटकाच्या रंगमंचावरचा वावर इथेही कामी येतोय. त्यामुळे सर्व उद्योजक खूष आहेत. काहींना मात्र एवढ्या मोठ्या औद्योगिक क्षेत्राचा अध्यक्ष एखाद्या मोठ्या कंपनीचा असावा असं वाटतं. सूक्ष्म उद्योगातील अध्यक्ष आता पुरे असं म्हटलं जातं पण, कदाचित तसं होणार नाही कारण इथे लहान मोठा हा भेदभावच नाही. कसला त्रासच नाही तर खुर्चीवर कुणीपण बसला तर काय फरक पडतो? प्रश्न असते, समस्या असत्या तर ठीक होतं. कोणीतरी खमकेपणाने बोलणारा, सरकारकडे भांडणारा गरजेचा होता. इथे तर काय गोड गोडच बोलायचंय… आज सामंत आहेत, उद्या दुसरा कोणी येईल… आपलं नाटक रंगल्याशी कारण!
असो. आपल्या जिल्ह्यात अशी स्वर्गवत midc आहे याचा आपल्याला आनंद आहे. पुढचं पुढे!
ता. क. – लोटेबरोबरच खेर्डी, गानेखडपोली, रत्नागिरी, देवरुख, मंडडणगड, लांजा असे स्वर्गवत midc चे उपभाग आहेत. फक्त एकच प्रश्न सतावतोय सर्व काही सुरळीत चालू आहे, शून्य समस्या आहेत मग तरीही भंगार व्यवसाय, भंगार चोरी दिवसेंदिवस का वाढतोय? त्याचा राजकारणासाठी का उपयोग केला जातो? एरवी वीजचोरी, पाणीचोरी, टॅक्सचोरी नावाला पण नाही.

