भास्कररावांची ‘वेगळी’ वाट!

भास्कररावांची ‘वेगळी’ वाट!

भास्कररावांची ‘वेगळी ‘ वाट!

        आपल्या आक्रमक स्वभावामुळे, वक्तृत्वामुळे आणि वागणुकीमुळे नेहमीच चर्चेत राहिलेले (कधी कधी वादात सापडलेले) आमदार भास्करराव जाधव यांनी आज एकदम शांततेचा आणि वैचारिकतेचा वेगळा मार्ग अवलंबून सर्वांना तसा म्हटलं तर सुखद धक्काच दिला. काही काळ ते राष्ट्रवादी झाले होते तरी त्यांचा मूळचा पिंड हा शिवसैनिकाचा! त्यामुळे त्यांचा एकंदर कारभार हा खरं तर रस्त्यावरची लढाई लढण्याचा… पण वयामुळे असेल, राजकीय शहाणपणातून असेल आता वैचारिक माध्यमातून विविध प्रश्नांना, विषयांना लोकांच्या सहभागातूनच लोकांसमोर मांडण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. त्याची सुरुवात त्यांनी आज ‘महिला आरक्षण बील’ संदर्भात सर्वपक्षीय लोकांना, पत्रकारांना एकत्र बोलावून चर्चा घडवून केली. या बिलासंदर्भात सत्ताधारी भाजप आणि विरोधक यांच्यात जे आरोप – प्रत्यारोप होत आहेत त्यासंदर्भात भास्करराव यांनी विरोधी पक्षाची भूमिका अत्यन्त अभ्यासपूर्ण आणि ठळकपणे लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. कदाचित काही मुद्दे अनुत्तरीत असतील, काही शंकाही शिल्लक असतील तरीही एकूण भास्करराव यांनी केलेला हा प्रयत्न 75/80 टक्के यशस्वी झाला असं म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. मुळात भास्कररावांनी ‘खुल्या चर्चेचा’ मार्ग स्वीकारला ही बाब अधिक कौतुकास्पद आहे. चर्चेदरम्यान त्यांनी विरोधकांवरील आक्षेपही योग्य रितीने समजावून घेतले आणि त्याला शांतपणे, खेळीमेळीच्या वातावरणात पण ठोस उत्तरे दिली.

महिला आरक्षण विधेयक त्याचबरोबर मतदारसंघ पुनर्रचना विधेयक, लोकसभेची सदस्य संख्या 850 करण्याचा सरकारचा विचार अशा मुद्द्यावर भास्करराव जाधव यांनी अभ्यासपूर्ण विवेचन करुन भाजपचा संधीसाधूपणा प्रभाविपणे लोकांसमोर आणला. पाच राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन महिला आरक्षण बिलाचा घाट घालून विरोधी पक्षाला सापळ्यात अडकविण्याचा प्रयत्न होता हे दूधपितं मुलही सांगू शकेल. बील पास झालं तर आमचं श्रेय आणि नामंजूर झालं तर त्याचं खापर विरोधी पक्षावर फोडायचं आणि निवडणुकीत फायदा मिळवायचा हे प्रोफेशनल राजकारण करणाऱ्या भाजपचे सूत्र. त्याप्रमाणे त्यांनी देशभर विरोधी पक्षाला महिला विरोधी म्हणून आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यास सुरुवात केली आहे. पण भास्करराव जाधव यांनी भाजपसाठी हे सर्व प्रकरण ‘ बूमरँग ‘ ठरेल असा इशारा दिला आहे. (भाजप आणि संघाचे जुनेजाणते आणि मुळात विचार करणारे नेते, कार्यकर्ते हाच विचार बोलून दाखवत आहेत) इतकेच नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले समोरासमोर चर्चेचे आव्हान आपण स्वीकारू असं भास्करराव यांनी ठामपणे सांगितलं. अर्थात सुप्रियाताई सुळेनी आव्हान स्वीकारल्यावर फडणवीस यांची कशी गोची झाली आणि आपणच दिलेल्या आव्हानापासून ते कसे पळ काढत आहेत हे आपल्या खास शैलीत मांडले.

आजचं चर्चासत्र आणि त्यासाठी भास्करराव यांनी स्वतः केलेली अभ्यासपूर्ण तयारी, यांचबरोबर पत्रकार, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते तसेच सामाजिक क्षेत्रातील अनेकांनी विचारलेले अनेकांगी प्रश्न, केलेल्या सूचना या सर्वांमुळे हा कार्यक्रम दर्जेदार झाला यात दुमत नाही.

जाधव यांच्या आवाहनानुसार भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष किंवा कोणीही अभ्यासू पदाधिकारी उपस्थित राहिले असते तर हे चर्चासत्र अधिक उंचीवर गेले असते. एकमेकांच्या भूमिका, आक्षेप अधिक स्पष्ट झाले असते. पण ती सुसंधी चिपळूणकर जनतेला लाभली नाही याची जरूर खंत वाटते. असो. पण एक प्रयत्न म्हणून भास्करराव जाधव यांना नक्कीच श्रेय दिले पाहिजे. त्यांनी यापुढेही ही ‘ वेगळी वाट ‘ कायम ठेवावी अशी अपेक्षा आहे. आज या विषयावर चांगले विचारमंथन झाले. पत्रकार म्हणून आमची एक सूचना वजा विनंती आहे की भविष्यात तालुका, जिल्हा असेल, शहर असेल येथील विविध प्रश्नाबाबत, विकासाबाबत अशी खुली चर्चा घडवून आणावी. आज कोकणात रासायनिक कारखानदारी आणि त्यामुळे होणारे प्रदूषण यावर सर्व बाजूने चर्चा होणे गरजेचे आहे. भास्करराव यांनी पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन कोकणातील एक आक्रमक नेतृत्व म्हणून अशा विविध विषयांना हात घालावा. त्याची सत्यअसत्यता जे काही असेल ते अशा खुल्या, मनमोकळ्या व्यासपीठावरून जनतेसमोर, कोणाचेही असो त्या शासनासमोर आणावी अशी अपेक्षा आहे. आजच्या उपक्रमाबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.

मकरंद भागवत, पत्रकार, चिपळूण.

संपादक मकरंद भागवत

पत्रकारितेचा तीस वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक विषयांवर परखड भाष्य.

Related articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *