रत्नागिरीचा ‘मौल्यवान’ कचरा!
*रत्नागिरीतील ‘मौल्यवान’ कचरा!*
मकरंद भागवत, पत्रकार, चिपळूण.
मो. 9850863262
रत्नागिरी शहरातील कचरा किती मौल्यवान आहे हे आठ दिवसांपूर्वी पालकमंत्री उदय सामंत यांना आणि त्यांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे रत्नागिरी शहरातील, जिल्ह्यातील नागरिकांना कळले. गेली अनेक वर्षे ‘कचरा कितना अच्छा लगता हैं’ असं म्हणत पालिकेला करोडो रुपयांचा चुना लावणाऱ्यांना पालकमंत्री उदय सामंत यांनी चाप लावल्याच्या बातम्या सर्वत्र पहिल्या पानावर झळकल्या. सफाईचे (त्यात अन्य काही तत्सम सेवा आहेत )ठेके 19 कोटीवरून एकदम 9 कोटीवर आणून उदय सामंत यांनी पालिकेतील भ्रष्ट कारभारावर हातोडा मारल्याचे कौतुक सध्या सुरु आहे. त्यांनी तसे केले असेल तर चांगलंच आहे. जिल्ह्याचे पालक म्हणून त्यांची ती जबाबदारीही आहे. मात्र त्यांनी जे काही केलंय ते पुरेसं नाही. त्यांना खरोखरंच हातोडा मारायचा असेल तर त्यांनी कचऱ्यासंदर्भातील ठेक्यामध्ये मागच्या काळात जो काही करोडो रुपयांचा घोटाळा प्रथमदर्शी दिसतोय तो खणून काढून संबंधितांविरोधात कडक कारवाई कशी होईल हे पहावे. जनतेच्या पैशाची लूट करणारे अधिकारी, कर्मचारी आणि जे कोणी ठेकेदार आहेत त्यांच्याकडून तेवढी रक्कम वसूल करुन घ्यावी. जेव्हा 9 कोटीत होणाऱ्या कामासाठी 19 कोटी रुपये मोजले जातात आणि हे गेली काही वर्षे चालू असेल तर उदय सामंत तुमचे पालिकेतील विश्वस्त नगरसेवक नेमकं काय करत होते? तुमच्या संमतीशिवाय रत्नागिरीत झाडाचे पानही हलत नाही असं असताना, तुमचा चौफेर दबदबा असताना एवढा मोठा घोटाळा तुमच्या इतका उशिरा कसा लक्षात आला? तुमचे नेटवर्क एवढे मजबूत आहे की रत्नागिरी शहरात आणि मतदारसंघात कुठें टाचणी पडली तरी तुम्हाला त्याचक्षणी कळते मग एवढा मोठा भ्रष्टाचार कळायला इतका वेळ का लागला? हे सर्व सहज पचनी न पडणारे आहे. त्यामुळे केवळ ठेक्याची रक्कम कमी झाली म्हणून पाठ थोपटून घेण्यात तसा काही मोठेपणा नाही. तुम्ही खरंच या संपूर्ण भ्रष्टाचाराची प्रामाणिकपणे चौकशी लावाल आणि दोषींना शिक्षा द्याल, सफाई कामगारांची पिळवणूक करुन वर जनतेच्या पैशावर ऐश करणाऱ्यांना त्याच कचऱ्यात गाडाल तरच तुमचं खरं कौतुक वाटेल. स्वभावानुसार तुम्ही हे धाडस दाखवाल याबाबत रत्नागिरी शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील नागरिकांना खात्री वाटते आहे.
19 कोटींचे ठेके 9 कोटीवर आणलेत म्हणजे जवळपास 60 टक्के रक्कम इतकी वर्ष जास्त हडपली गेली. त्यावर अनेकांचे आलिशान बंगले उठले असतील, आलिशान गाड्या आल्या असतील, आणखीही काही भ्रष्टाचाराच्या पैशाबरोबर जे येतं तेही आलं असेल. टक्केवारी आणि मूळ मार्जिन या गोष्टी समाविष्ट असूनही 9 कोटीत ठेका परवडत असेल तर मग जी काही वर्षे ही लूट चालू आहे त्यामुळे नगरपालिका तोट्यात नसेल तर काय? डोक्यावर कर्ज नसेल तर आणखी काय वेगळं असणार… असले भ्रष्ट अधिकारी, कर्मचारी आणि मुळात जे विश्वस्त म्हणून तुमचेच नगरसेवक तिथे आहेत ते नेमकं काय करतायत? कसला विकास होणार आहे? स्मार्ट सीटी कशी आणि कोणत्या युगात होणार आहे? आत्ता केवळ कचरा आणि तत्सम सेवांच्या ठेक्याबाबत तुम्ही मोठेपणा घेत आहात पण बाकीच्या बाबतीत काय? बांधकाम, पाणीपुरवठा असे जे मलईदार विभाग आहेत तिथे तर भ्रष्टाचार अधिक असणार हे ओपन सिक्रेट आहे.
आजची रत्नागिरी शहराची एकंदर परिस्थिती पाहिली तर स्मार्ट सीटी नका करू त्यापेक्षा जशी होती तशी नीट नेटकी ठेवलीत तरी भरपूर झाले असं लोकं बोलतात त्यात काही चुकीचे आहे असे वाटत नाही. तुमच्यासारख्या तरुण नेत्याला रत्नागिरी शहराला वेगळी ओळख देण्याची खरं तर फार मोठी संधी मतदारांनी आणि श्री भैरी बुवाने दिली आहे, पण त्यासाठी केवळ ‘चतुर’ राजकारणी असून चालत नाही, तर मनापासूनची इच्छा लागते. केवळ छान भाषणे करुन, कार्यकर्ते, पदाधिकारी यांना सांभाळून स्मार्ट सीटी होऊ शकत नाही. खरं तर उदय सामंत यांना फार मोठा स्पर्धक पक्षात किंवा विरोधकांत राहिलेला नाही. आणखी किमान 25 वर्ष तरी उदयजी यांचं साम्राज्य कोणी खालसा करू शकत नाही असं त्यांचे हितचिंतक अभिमानाने सांगतात. एवढंच नाही तर उदय सामंत आज शिवसेनेत सर्वात हुशार आणि प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात. मंत्री म्हणूनही त्यांचा दबदबा आहे. ते केवळ एकनाथ शिंदे यांचेच विश्वासू आहेत असं नाही तर देवेंद्र फडणवीस हेही त्यांच्यावर विश्वास दाखवत असतात. उदय सामंत यांना राजकीय हवामानाचा अंदाज इतरांपेक्षा लवकर आणि अचूक कळतो. वारे कोणत्या दिशेला वाहत आहेत, कोणत्या पक्षात दुष्काळ पडेल, कोणत्या पक्षात सुगीचे दिवस येतील हे सर्व ते अचूक ओळखतात. त्यांचं याबाबतीत कौतुक करायला हवं. मात्र, मूळ प्रश्न कायम राहतो… तुम्ही विकासाच्या नावाखाली नेमकं काय केलं? केलं असेल तर ते दीर्घकाल उपयुक्त पडेल असं दर्जेदार आणि दूरदृष्टी ठेऊन केलंय का? जे केलंय किंवा करणार आहात ते खरंच जनतेसाठी आहे की आपले कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मित्रमंडळ यांच्या भल्यासाठी आहे? असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत. त्याची उत्तरं तुम्ही जनतेला नाही दिलीत तरी चालतील, पण स्वतःला हे प्रश्न विचारा आणि स्वतःलाच उत्तरं द्या. थोडक्यात, आत्मपरीक्षण करा. तुम्ही ज्या खात्याचे मंत्री आहात त्या रत्नागिरी एमआयडीसी ची काय परिस्थिती आहे… उद्योग नाहीत ते नाहीत साधे रस्ते पण धड नाहीत. शहरात आणि शहराच्या बाहेरच्या परिसरात रस्त्यांची कामं ज्या पद्धतीने चालली आहेत किंवा झाली आहेत ते पाहिलं की हसावं की रडावं तेच कळत नाही.
असो. विषय असंख्य आहेत. घोषणाही होत असतात. आज नाहीतर तर कधीतरी रत्नागिरी खरंच स्मार्ट सीटी असेल किमान जिल्ह्याचे ठिकाण म्हणून तरी बरं असेल अशी अपेक्षा सर्वचजण करत आहेत. जिल्ह्याला उदय सामंत यांच्या रूपाने तरुण आणि राज्याच्या राजकारणात झापाट्याने वरच्या पायऱ्या चढणारे नेतृत्व लाभले आहे. त्यांना जिल्ह्याच्या इतिहासात खऱ्या अर्थाने ‘ विकासाचे शिल्पकार ‘ म्हणून नाव लिहिण्याची संधी नियतीने खूप लवकर दिली आहे. अजून पुढेही ती मिळेल यात शन्का नाही. पण या संधीचं सोनं करायचं की केवळ ‘चतुर’ राजकारणी म्हणूनच ओळख ठेवायची हे त्यांच्या हातात आहे. कचऱ्याचा ठेका हा भ्रष्टाचाराचा आणि लूटमारीचा छोटासा तुकडा आहे. या प्रकरणात पक्षांतर्गत आणि सामंत यांच्याच जवळच्या मंडळीतील ‘राजकारण’ हाही मुद्दा महत्वाचा असल्याची चर्चा रत्नागिरी शहरातून ऐकण्यास मिळते. खरं खोटं तेच जाणोत. आपल्याला उत्तम दर्जाचा शहर विकास महत्वाचा आहे. लोकांना त्यांच्या राजकारणात इंटरेस्ट नाही. भ्रष्टाचार संपणार नाही पण उदय सामंत त्याला ब्रेक तरी लावतील अशी अपेक्षा सर्वसामान्य रत्नागिरीकर व्यक्त करत आहे.
ता. क. – वरील मतं , भूमिका सर्वांनाच पटेल असं नाही. आत्ताच्या काळातले भाटगिरीचे राजकारण पाहता काही मंडळी ‘सूर्यावर’ थुंकण्याचा प्रयत्न करू नका, साहेबांना तुम्ही शिकवायची गरज नाही अशा प्रतिक्रिया येऊ शकतात. हा अनुभव नवीन नाही. स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता किंवा कोणीही नेत्यांना आवडत नाही. नेत्यांनाही केवळ कौतुक आवडते ही सध्याची परिस्थिती आहे, पण उदय सामंत त्याला अपवाद असुही शकतात असा विश्वास वाटतो.

