चव्हाणांचे फडणवीसांनाच आव्हान?
*’कोकण रिपोर्टर’ स्पेशल*…
बाळ मानेंचा भाजप प्रवेश…
*रवींद्र चव्हाणांचे फडणवीसांनाच आव्हान?*
चिपळूण :
(मकरंद भागवत )
भारतीय जनता पक्षाच्या रत्नागिरी येथील मेळाव्यात बोलताना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नाव न घेता बाळ माने यांच्या पक्षप्रवेशाला विरोध दर्शवल्याने भाजपच्याच गोटात संभ्रमाचे वातावरण पसरले असून मतमतांतरे ऐकण्यास मिळत आहेत.
विधानपरिषद निवडणुकीत अत्यन्त नाटकीय घडामोडी घडल्या. अनिकेत तटकरे यांच्याविरोधात निवडणूक लढविणारे महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांनी अनपेक्षितरित्या आपला अर्ज मागे घेऊन कोकणच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिली. मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने ही खेळी खेळली आणि विशेषतः उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला. ठाकरेंनी तातडीने बाळ माने यांची शिवसेनेतून हकालपट्टी केली. अर्ज मागे घेण्याच्यादृष्टीने दोन तीन दिवस आधीपासून मुंबईत खलबतं चालू होती. त्यानुसार देवेंद्रजी यांचे खास विश्वासातले मंत्री नितेश राणे यांनी आपली कामगिरी चोख बजावली. ते बाळ माने यांना विमानाने घेऊन आले, अर्ज मागे घेतला आणि त्याच विमानाने मानेना घेऊन मुंबईला गेले. मुंबईला गेल्यावर बाळ माने यांच्या भाजप प्रवेशासंदर्भात बैठका झाल्याचे सांगण्यात येत होते. त्याचवेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनीही बाळ माने आमचे घरचेच आहेत अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे एक दोन दिवसांत बाळ माने यांचा पक्षप्रवेश निश्चित मनण्यात येत होता. मात्र, त्यात कुठें माशी शिंकली हे कोणालाच कळत नव्हते.
दरम्यान, रत्नागिरीत काल झालेल्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आपण पदावर असेपर्यंत तरी बाळ माने यांचा प्रवेश होणार नाही असं सूचित केल्यामुळे बाळ माने यांच्या प्रवेशासंदर्भातील! ‘सस्पेन्स’ अधिकच वाढला आहे. बाळ माने यांचा पक्षप्रवेश ही केवळ औपचारिकता मानून चाललेल्या आणि बाळ माने हवे असणाऱ्या भाजपच्या gअसंख्य कार्यकर्त्यांत चव्हाण यांच्या भूमिकेमुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण gझाल्याचे दिसून येत आहे. Gयातून अनेक मुद्दे चर्चीले जात आहेत. त्यातला प्रमुख मुद्दा म्हणजे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे बाळ मानेना प्रवेश नाकारून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच आव्हान देत आहेत का? कारण बाळ माने यांनी थेट नितेश राणे यांच्यासोबत येऊन अर्ज मागे घेतला म्हणजे हा सर्व प्लॅन देवेंद्र फडणवीस यांच्या समत्तीशिवाय होऊच शकत नाही हे एखादं शेम्बडं पोरही सांगू शकतं. त्यानंतर स्वतः फडणवीस म्हटले की, बाळ माने आमच्या घरचेच आहेत. असं असताना बाळ माने यांचा पक्ष प्रवेश निश्चित मानला जाणारच. अशावेळी चव्हाण हे मुख्यमंत्री विरोधी भूमिका घेत आहेत का असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.
दुसरा मुद्दा असा पुढे येत आहे की, नितेश राणे यांना या ‘ऑपरेशन’ ची जबाबदारी दिली गेली आणि त्यांनी ती यशस्वी केली. त्यामुळे त्यांना अधिकचे श्रेय मिळू नये किंवा रत्नागिरीत त्यांचे प्रस्थ वाढू नये या भूमिकेतून तर चव्हाण माने यांच्या प्रवेशाला विरोध करत नसतील? कदाचित या सर्व प्लॅनमध्ये चव्हाण यांना बाजूला ठेवले गेले असेल तर त्याची नाराजीही या विरोधामागे असू शकते असं काहींना वाटतं .
उदय सामंत यांच्याबरोबर असलेले मैत्रीपूर्ण संबंध लक्षात घेऊनही चव्हाण यांनी माने यांच्या प्रवेशाला विरोध केला असेल अशी शक्यताही काहींनी व्यक्त केली.
आत्ता जे नवीन पदाधिकारी नेमले गेले आहेत त्यांचाही बाळ माने यांना प्रवेश देण्यास विरोध आहे असं बोललं जात आहे. बाळ माने हे जुने – जाणते आणि जिल्ह्याच्या राजकारणात मुरलेले असल्यामुळे त्यांच्या प्रवेशामुळे नवीन नेत्यांची गोची होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अशा अनेक कारणांमुळे बाळ माने यांचा प्रवेश तूर्तास तरी लांबला आहे. रवींद्र चव्हाण यांचे ‘धुरंधर’ स्वीय सहाय्यकही यात महत्वाचा रोल पार पाडत असल्याचीही जोरदार चर्चा आहे. भाजपच्या जुन्या जाणत्या कार्यकर्ते, पदाधिकारी यांना बाळ माने हवे आहेत तर चव्हाण यांच्या गोटातील नव्यांना बाळ माने नको आहेत.
अर्थात, ज्याअर्थी बाळ माने यांच्याबाबतीत भाजपने एवढी मोठी खेळी केली त्याअर्थी देवेंद्र फडणवीस यांचा भक्कम पाठिंबा असणार हे उघड आहे. त्यामुळे चव्हाण यांनी विरोध केला असला तरी त्याला फार महत्व देण्याची गरज नाही असं मानणारा वर्गही भाजपमध्ये आहे.
रवींद्र चव्हाण यांनी मी प्रदेशाध्यक्ष असेपर्यंत तरी प्रवेश होणार नाही असं का म्हटलं याबाबतही संभ्रम आहे. फार काळ पदावर राहणार नाहीत याचे तर त्यांनी संकेत दिले आहेत का? कारण फडणवीस कोणत्याही परिस्थितीत बाळ माने यांना भाजपात घेणार याबाबत सर्वांनाच खात्री वाटत आहे.

