स्मार्ट मीटर : सावर्डे शिवसेनेची महावितरणवर धडक!

स्मार्ट मीटर : सावर्डे शिवसेनेची महावितरणवर धडक!

*स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात सावर्डे शिवसेनेची महावितरणवर धडक; “जनतेला विश्वासात न घेता मीटर बसवले तर शिवसेना स्टाईलने उत्तर!”*

 

सावर्डे : कोकणातील वीज ग्राहकांच्या माथी स्मार्ट मीटर लादण्याचा महावितरणचा सुरू असलेला अट्टाहास आता जनतेच्या रोषाला सामोरा जाऊ लागला आहे. मुख्यमंत्री स्वतः “स्मार्ट मीटर बसविणे ऐच्छिक आहे, कोणतीही सक्ती केली जाणार नाही” असे जाहीरपणे सांगत असताना प्रत्यक्षात मात्र घरमालकांची परवानगी न घेता, कोणतीही पूर्वसूचना न देता मीटर बदलण्याचे प्रकार सुरू असल्याने संतप्त झालेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सावर्डे येथील महावितरण कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला.

 

उपकार्यकारी अभियंता खोडे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत शिवसैनिकांनी महावितरणच्या कारभारावर प्रश्नांची सरबत्ती केली. “स्मार्ट मीटर बसविणे बंधनकारक आहे का?”, “घरमालकाची परवानगी न घेता परस्पर मीटर का बदलले जात आहेत?”, “मुख्यमंत्री सक्ती नसल्याचे सांगत असताना महावितरणची ही घाई कशासाठी?” असे थेट प्रश्न उपस्थित करून अधिकाऱ्यांना कोंडीत पकडण्यात आले.

 

तसेच बिल भरण्यास उशीर झाल्यास स्मार्ट मीटर स्वयंचलित पद्धतीने वीजपुरवठा खंडित करतो का, याबाबतही अधिकाऱ्यांकडे खुलासा मागण्यात आला. ग्राहकांच्या मनात निर्माण झालेल्या भीती आणि संभ्रमाची दखल घेत शिवसेनेने महावितरणला स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, जनतेला विश्वासात न घेता किंवा त्यांच्या संमतीशिवाय मीटर बदलण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला तीव्र विरोध केला जाईल.

 

यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनीही यापुढे घरमालकांच्या माहितीशिवाय अथवा संमतीशिवाय मीटर बसविण्याचे प्रकार होणार नाहीत, तसेच अशा पद्धतीने काम करणाऱ्यांना समज दिली जाईल, असे आश्वासन दिल्याचे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

 

जनतेच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची शिवसेनेची परंपरा कायम राखत सावर्डेतील शिवसैनिकांनी स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात उभा केलेला हा आवाज आता संपूर्ण परिसरातील वीज ग्राहकांसाठी दिलासादायक ठरत आहे.

 

यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपतालुकाप्रमुख संदीप राणे, विभागप्रमुख सागर सावंत, संघटक सुभाष डिके, माजी विभागप्रमुख संजय कोकाटे, शाखाप्रमुख अशोक चव्हाण, विवेक सुर्वे, राजेंद्र गुरव, निलेश डिके, ज्येष्ठ शिवसैनिक सुनील गुरव, नियाज चिकटे, विनायक वास्कर, युवासेना उपतालुकाप्रमुख भूपेश सावर्डेकर यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

संपादक मकरंद भागवत

पत्रकारितेचा तीस वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक विषयांवर परखड भाष्य.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *