जठारांच्या ‘कौतुकाचे’ कौतुक!
*कोकण रिपोर्टर स्पेशल*
*## जठारांच्या ‘कौतुकाचे’ कौतुक!*##
चिपळूण : आजच्या काळातील राजकारण इतक्या खालच्या पातळीवर गेले आहे की विरोधक सोडाच पण एकाच पक्षातील नेतेही एकमेकांचे कौतुक करत नाहीत. दुसरा कोणी आपल्यापेक्षा ताकदवार होऊ नये यासाठी जो तो कधी उघडपणे, कधी छुप्या पद्धतीने राजकारण करत असतो. मात्र, या समजाला छेद देण्याचे मोठे कार्यही एक नेता करत आहे. ते आहेत कोकण भाजपचे नेते आणि आमदार प्रमोद जठार!
प्रमोद जठार आमदार झाल्यावर आणि विशेषतः कोकणाची संघटनात्मक जबाबदारी घेतल्यावर सातत्याने दौरे करत आहेत. त्यांना शिंदे गट आणि अजितदादा गटाला नामोहरम करुन कोकणात शत प्रतिशत भाजप करायचा आहे. 2029 मध्ये सगळीकडे फक्त कमळ आणि कमळच फुलल्याचे स्वप्नं ते आत्तापासूनच पहात आहेत आणि कार्यकर्त्यांनाही प्रोत्साहित करत आहेत. या थोडक्या कालावधीत ते दक्षिण जिल्हाध्यक्षांच्या कार्याने जबरदस्त प्रभावित झाले आहेत. त्यांच्या तोंडात कौतुकाचे मलईदार पेढे, श्रीखंड ठासून भरल्याचे दिसून येत आहे. जठार यांच्याकडून होणाऱ्या कौतुकाच्या वर्षावाने दक्षिण जिल्हाध्यक्ष आणि त्यांच्या समर्थकांना अक्षरशः आनंदाचे भरते आले आहे. प्रमोद जठार यांच्यासारखा मुंबईतच नव्हे तर थेट दिल्ली दरबारीं वजन असलेला नेता आपल्या पाठीशी असताना आता कसलीच चिंता नाही. उद्या अगदी मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष किंवा राणे मंडळी कदाचित पाठीशी नसली तरी चिंता करायचे कारण नाही. आपले ‘गॉडफादर’ प्रमोद जठार आपल्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत या विश्वासाने सर्वांना दहा हत्तीचे बळ आले आहे.
दक्षिण रत्नागिरीत पूर्वी कधी झाले नाही आणि पुढे कधी होणार नाही असं नेतृत्व भाजपला लाभल्याची खात्रीच प्रमोद जठार यांना दीड महिन्यात पटली आहे. त्यामुळे त्यांनी जिल्हाध्यक्ष हे केवळ आमदारच व्हावेत असं नाही तर मंत्री व्हावेत अशी प्रामाणिक इच्छा व्यक्त केली आहे. खरं तर राजकारणात जो तो मला आमदारकी कशी मिळेल, मीच मंत्री कसा होईन हे पहात असतो त्यासाठी डावपेच खेळत असतो. पण, प्रमोद जठार मात्र त्याला अपवाद ठरले आहेत. ते राजकारणात असले तरी दुधासारखे निर्भेळ, शुद्ध अंतःकरणाचे आहेत म्हणून दुसऱ्याला पुढे जाऊ देत आहेत. जिल्हाध्यक्ष यांचं कार्य, त्यांची ताकद, पक्षाविषयी असलेली आजन्म निष्ठा, तन – मन – धन अर्पून होत असलेलं काम यामुळे प्रमोद जठार कमालीचे प्रभावित झाले आहेत. प्रमोद जठार येणार म्हटल्यावर चिपळूणला आनंदाचे उधाण येते. जठार यांना ते आमदार होण्यापूर्वी या सर्वांची कल्पना असती तर त्यांनी स्वतःहून जिल्हाध्यक्ष यांनाच आमदारकी दिली असती अशी भावनाही व्यक्त होत आहे. भविष्यात यदाकदाचित जिल्हाध्यक्ष यांना आमदारकी किंवा मंत्रिपद मिळालं नाही तर जठार आपल्या आमदारकीचा त्याग करुन जिल्हाध्यक्ष यांना संधी देतील एवढा विश्वास भाजप कार्यकर्त्यांना वाटत आहे.
सुरवातीला जिल्हाध्यक्ष आणि कार्यकारिणी नियुक्ती यावरून विशेषतः रत्नागिरी, लांजा, राजापूरमधून विरोधाचे सूर आळवले गेले. काहींनी थेट देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यापर्यंत नाराजी पोचवली. त्या सर्व नाराज भुंग्यांना कमळाच्या पाकळ्यात बंदिस्त करुन ठेवण्यात आल्याचे कळते. आता जठार हेच कोकण भाजपचे सर्वेसर्वा आहेत. ते जिल्हाध्यक्ष यांच्या कार्याने प्रभावित झाले आहेत त्यामुळे जुन्यांना चरफडत बसण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे दिसून येत आहे. सर्व नवीन मंडळी सत्ता असो वा नसो मरेपर्यंत भाजप म्हणजे भाजप अशी प्रतिज्ञाच करुन आले आहेत त्यामुळे त्यांच्याबद्दल वरिष्ठ नेत्याना प्रेमाचे भरते आले आहे. त्यांना कुठें ठेऊ आणि कुठें नको असं झालंय. म्हणूनच प्रमोद जठार यांच्या कौतुकाचेही कौतुक होत आहे.
ता. क. – काहींना मात्र जास्त कौतुक करण्यात, गोड बोलण्यात धोकाही वाटतो. गोड बोलून पंख छाटणे राजकारणात नवीन नाही. काहींना जठार फक्त दक्षिण जिल्हाध्यक्ष यांचेच कौतुक करतात मात्र, उत्तरचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे जुने असून, मेहनत घेत असूनही त्यांचेबद्दल कौतुकाचे दोन शब्द का बोलत नाहीत याचे वैषम्य वाटते. दोन जिल्हाध्यक्षात हा भेद का? असा प्रश्नही विचारला जात आहे.
मकरंद भागवत
9850863262

