लाचखोरांचे संमेलन!

लाचखोरांचे संमेलन!

*कोकण रिपोर्टर स्पेशल*

 

*लाचखोरांचे संमेलन!*

 

 

मकरंद भागवत, पत्रकार, चिपळूण.

मो. 9850863262

 

 

लाचखोर महासंघाचे राज्यस्तरीय संमेलन नुकतेच रत्नागिरी येथे अपूर्व उत्साहात संपन्न झाले. संमेलनाला प्रचंड उपस्थिती लाभली त्यामुळे अर्थातच राज्यातील सरकारी कार्यालये जवळपास ओस पडली होती. मोजकेच प्रामाणिक अधिकारी आणि कर्मचारी मूर्खासारखे कामावर आले होते. बाकी जीवाची रत्नागिरी करत होते. लाच म्हणून मिळालेली दारू रिचवत होते. लाचेतून आलेल्या माशांवर ताव मारत होते. या संमेलनाला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहून संघटनेचे पुढारी उत्साहित झाले आहेत. पुढचे संमेलन वर्षभरात जो जिल्हा भ्रष्टाचारात अव्वल असेल तिथे घेण्याचे ठरले आहे. देश पातळीवरचे संमेलन घ्यायचे झाल्यास सर्वात योग्य ठिकाण मंत्रालयापेक्षा दुसरे कोणतेच असू शकत नाही याबाबतीत सर्वांचे एकमत झाले आहे. लाचखोरीचा महामेरूच जणू!

संमेलनाच्या तयारीसाठी लाचखोर महासंघाचे रत्नागिरी जिल्यातील तरुण अधिकारी, कर्मचारी ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गेले महिनाभर मेहनत घेत होते. संमेलनामुळे अधिकची लाच गोळा करणे हेच मोठे आव्हान होते. पण, सरावलेल्या हातांनी हे आव्हान सहज पेलले. मैदानावर मंडप न उभारता महाकाय ‘टेबल’ तयार करण्यात आले होते. सर्वांची बसण्याची व्यवस्थाही टेबलाखाली करण्यात आली होती. कारण सर्व व्यवहार, कारभार टेबलाखालूनच करण्याची परंपरा आहे. आधुनिक काळात काही बदल जरूर झाले पण ‘परंपरा’ विसरून चालणार नाही या हेतूने टेबलाखालीच संमेलन घेतले गेले. व्यासपीठ नोटांच्या बंडलांचे बनवले होते. मागे भव्य बॅनर लक्ष वेधून घेत होता. “लाच हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि आम्ही तो जगाच्या अंतापर्यंत सोडणार नाही” असं घोषवाक्य ठळकपणे लिहिलं होतं. संमेलनस्थळी पाचशेच्या नोटांच्या पताका लावण्यात आल्या होत्या. प्रवेशद्वार तर वैशिष्ट्यपूर्ण होतं. आत टेबलाखाली जाण्यासाठी योग्य ती लाच दिली तरच दार उघडत असे. लाचखोरीचे एक प्रकारे ट्रेनिंगच म्हणा ना! संमेलनस्थळी लाच कशी घ्यावी, काय काळजी घ्यावी, घेतलेली लाच, टक्केवारी कशी कुठें जिरवावी वा सुरक्षित ठेवावी याचे मार्गदर्शन करणारे फलक, रांगोळ्या लक्ष वेधून घेत होते.

संमेलनाच्या अध्यक्षपदी लाचखोरीतील बुजुर्ग अधिकारी होते तर प्रमुख पाहुणे टक्केवारीतील बुजुर्ग मंत्री होते. या सर्वांचे नोटा आणि नाणी उधळून स्वागत करण्यात आले. ‘लाच आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची’, ‘हमसे जो टकरायेगा मिट्टी में मील जायेगा’, ‘लाचखोर एकजुटीचा विजय असो’, ‘आमचं एकच लक्ष्य , देश बुडवायचं’ अशा घोषणांनी पूर्ण रत्नागिरी शहर दाणाणुन गेले. या संमेलनामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील विविध खात्यातील ज्येष्ठ, अनुभवी आणि नव्याने लाचखोरीत आलेल्यांच्या अंगात विलक्षण उत्साह संचारला होता. आता आपण लाचखोरीत महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यापेक्षा तसुभरही मागे रहायचे नाही अशी प्रतिज्ञाच त्यांनी केली आहे. लाचखोर महासंघाची महिला विंग तर फारच जोरात. प्रसंगी पुरुषांपेक्षाही पुढे. त्यांच्या अध्यक्षा तर नोटा छापलेली साडीच नेसून आल्या होत्या. त्या उपस्थितांचा उत्साह वाढवत होत्या. लाचेसंदर्भातील त्यांची रिल्स आधीपासूनच लोकप्रिय होती. त्यामुळे त्या संमेलनाच्या आकर्षण बनल्या होत्या, केंद्रस्थानी होत्या. या संमेलनात लाचखोरीत कायमच भाव खाणाऱ्या महसूल, पोलीस, फ़ॉरेस्ट, जलसंपदा, शिक्षण, आरोग्य, समाजकल्याण, सहकार, नगरविकास या विभागांशिवाय जी सहसा पटकन डोळ्यासमोर येत नाहीत अशा खात्यातील लाचखोर अधिकारी, कर्मचारी पण मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे जिल्ह्यातील सामान्य माणसाला याबाबतीत अधिक माहिती मिळाली.

या संमेलनात लाचखोरीत ‘तू जग नाहीतर मर, मला माझी लाच मिळाली पाहिजेच’ या निचपणाने सामान्य माणसाला पिळून काढणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती लक्षणीय होती. त्याखालोखाल थोडीफार दया बाळगून सूट देणारे यांची उपस्थिती होती. सर्वात कमी उपस्थिती ‘जे देशील ते चालेल, पण दे’ या गटातील लाचखोरांची होती. त्यातील काहींनी अत्यन्त प्रभावी मार्गदर्शन केले. लाचखोरीचे तेज त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होते. हातातील सोन्याच्या अंगठ्या, गळ्यातील चेन, महागडे मोबाईल लक्ष वेधून घेत होते. संमेलनस्थळी तर आलिशान गाड्यांशिवाय काहीच दिसत नव्हतं. यात आयएएस, आयपीएस किंवा त्यातल्या त्यात वरिष्ठ अधिकारीच नव्हे तर चतुर्थी श्रेणी कर्मचारीही आलिशान गाड्या घेऊन आले होते.

काहींनी कोकणचे सौंदर्य अनुभवता येईल तसेच आपल्या मुलाबाळांना, नातवंडाना लाचखोरीतील मोठे मासे प्रत्यक्ष पाहता येतील, त्यांचे मार्गदर्शन लाभेल, त्यापासून प्रेरणा घेता येईल या हेतूने घेऊन आले होते. आपल्या लाचखोर वडिलांचाच नव्हे तर आईचाही दबदबा बघून मुलांना प्रचंड अभिमान वाटत होता. काहींनी तर आपण महाराष्ट्रातील सर्वात मोठा लाचखोर होण्याचा निर्धार व्यक्त केला. तुकाराम मुंढे किंवा त्यांच्यासारखे जे कोणी भ्रष्टाचाराला विरोध करणारे नतद्रष्ट अधिकारी असतील त्यांना तातडीने निलंबित करण्याची मागणीही करण्यात आली.

संमेलनात लाचखोरीचे ‘स्किल’ वाढविण्याच्या दृष्टीने महासंघाच्या वतीने प्रत्येक तालुक्यात लाचखोरी, टक्केवारी व अन्य स्वरूपाचा भ्रष्टाचार कसा करावा याचे मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. यात शक्यतो सचिव आणि तत्सम अनुभवी आणि मोठं नाव असणारे अधिकारी यांचा समावेश असेल.

शासनाने मंत्री, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी दरवर्षी ‘लाचरत्न’, ‘टक्केभूषण’ अशा स्वरूपाचे पुरस्कार देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली आहे. समाजाचे, राज्याचे, लवकरात लवकर ‘भले’ करण्यासाठी, देश महासत्ता होण्यासाठी अशी लाचखोर पिढी तयार झाली पाहिजे असा यामागचा हेतू आहे. सरकारनेही या मागणीची दखल घेतली असून त्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. नाहीतरी आजकाल नेत्यांनी , सरकारमधील मंत्र्यांनी , अधिकाऱ्यांनी स्वतःसाठी, स्वतःच्या सात पिढ्यांची सोय करण्यासाठी जी व्यवस्था लावली आहे तिला सरकार म्हणतात एवढंच वास्तव आहे….

एकंदरीत रत्नागिरीचे संमेलन संस्मरणीय ठरल्याचे सांगण्यात येत आहे.

 

ता. क. – लाचखोर संमेलनात दलाल, लाचखोरीला उत्तेजन देणारे श्रीमंतापासून गरीबापर्यंतचे नागरिक, उद्योजक, गावपुढारी, नोकरदार अशा सर्वांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. लाच देण्याचे सहकार्य कायम मिळावे अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.

संपादक मकरंद भागवत

पत्रकारितेचा तीस वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक विषयांवर परखड भाष्य.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *