आम. किरण सामंत यांचे वेगळेपण!
*आम. किरण सामंत यांचे वेगळेपण!*
मकरंद भागवत, पत्रकार, चिपळूण.
मो. 9850863262
विधानसभा निवडणूक होऊन जवळपास दीड वर्ष होऊन गेलं आहे. निवडून आलेल्या आमदारांची काम करण्याची एकंदर पद्धत जनतेसमोर बऱ्यापैकी आली आहे आणि त्यामुळे आपण निवडून दिलेला माणूस योग्य आहे की अयोग्य याचे मूल्यमापन करण्याचा अधिकार जनतेला आहे. आपल्या कोकणाचा विचार केला तर काही अगदीच नवीन तर काही किमान चार टर्म आमदारकी आणि मंत्रिपद प्राप्त केलेले अनुभवी लोकप्रतिनिधी आहेत. प्रत्येकाची काम करण्याची, राजकारण करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. आणि ते साहजिकच आहे.
प्रथमच निवडून आलेले लांजा – राजापूरचे शिंदे गटाचे आमदार किरण तथा भैय्या सामंत यांनी आपल्या कामाच्या शैलीने जनतेच्या मनात समाधानाचे वातावरण तयार केल्याचे दिसून येते. अगदी रत्नागिरी असुदे, लांजा – राजापूरचा परिसर असुदे बहुसंख्य लोकं (यात सर्वपक्षीय) भैय्याशेठची कामाची पद्धत चांगली असल्याचे सांगतात. एका दृष्टीने ही सकारात्मक बाब आहे आणि ती तशीच कायम ठेवण्याची, लोकांच्या विश्वासाला, अपेक्षांना तडा जाणार नाही याची काळजी किरण सामंत यांना घ्यावी लागेल. तसं म्हटलं तर ते मूळचे व्यावसायिक असले तरी राजकारण त्यांना नवीन नव्हते. बंधू उदय सामंत यांनी गेल्या वीस – बावीस वर्षांत रत्नागिरी मतदारसंघावर आपली मजबूत पकड ठेवली आहे. मागच्या चार वर्षांत त्यांचे राज्याच्या राजकारणात वजन वाढले आहे. ते एक ‘चतुर’ राजकारणी आहेत. शह – काटशाह यात पारंगत आहेत. पक्षविचार, निष्ठा यापेक्षा त्यांना ‘अचूक टायमिंग’ साधण्यात स्वारस्य दिसून येते. भेटायला येणाऱ्या असंख्य प्रकारच्या लोकांचे ‘समाधान’ कसे करावे, त्यांना हसतमुखाने ‘मार्गी’ कसे लावावे याचे कौशल्य उदय सामंत यांच्याकडे भरपूर आहे. याउलट किरण सामंत यांचे आहे. ते आमदार आहेत, त्यांनी राजकारण जवळून पाहिलं आहे, पण ते पक्के राजकारणी झालेले नाहीत. वेळ मारून नेण्याचे ‘कौशल्य’ त्यांच्याकडे नाही असं लोकं सांगतात. कोणताही विषय समोर आला की संबंधित अधिकारी, जनता यांना एकत्र आणून त्या विषयांचा निपटारा झटपट कसा होईल, बसल्या जागेवर प्रश्न कसा सुटेल यासाठी त्यांचा प्रयत्न असतो असं ऐकण्यास मिळते. बघू, करू, सांगतो असली काही भानगड त्यांच्याकडे नाही. त्यांच्या कामातली महत्वाची गोष्ट म्हणजे जात, धर्म, पक्ष न बघता येणाऱ्या प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न करत असतात. ते बोलतात कमी. फार भाषणबाजी करत नाहीत. पण त्यांचे काम बोलताना दिसतेय. ते स्वतः व्यावसायिक आहेत, मोठे ठेकेदार आहेत मात्र मतदारसंघातील विकासकामे दर्जेदार हवीत अशी सक्त ताकीद त्यांनी आधीच दिली आहे. त्यांचा जनसंपर्कही जोरदार आणि अखंड दिसतो आहे. त्यांनी आमदार म्हणून राजकारणापेक्षा मतदारसंघातील विकासाला, विविध प्रश्न मार्गी लावण्याला प्राधान्य दिले आहे ही चांगली बाब आहे. खरं तर आणखी एक चांगली बाब माझ्या नजरेस पडली म्हणून थोडं लिहावं वाटलं. किरण सामंत यांच्या मतदारसंघातील दौऱ्याची माहिती देणाऱ्या इमेज सोशल मीडियावर पाहिल्या त्यात दौऱ्याची वेळ, ठिकाण याबरोबरच तीनचार गोष्टी लिहिलेल्या दिसल्या. त्या अशा… कोणीही पुष्पगुच्छ आणि भेटवस्तु आणू नये, स्वागतासाठी फटाके फोडू नयेत, बैठकीत कार्यकर्ते – पदाधिकारी यांनी आपले मोबाईल सायलेंट मोडवर ठेवावेत, निवेदन देणाऱ्यांनी त्यावर आपले नाव- नंबर अवश्य लिहावा. विशेषतः पुष्पगुच्छ, भेटवस्तु आणि फटाके याबाबतीत त्यांचे आवाहन निश्चितच कौतुकास्पद आहे. त्याचे पालन मात्र काटेकोरपणे होते का हा मुद्दा महत्वाचा आहे. एकंदर किरण सामंत आमदार म्हणून नवीन असले तरी त्यांनी त्यादृष्टीने लोकांच्यात एक आशेचा किरण निर्माण केला आहे. त्यांच्या अंगात विकासाची तळमळ कायम रहावी, राजकारणाचा किडा शिरू नये अशी अपेक्षा व्यक्त करूया. अणूऊर्जा, रिफायनरी अशासह अनेक प्रकल्पाबाबत भूमिका घेताना त्यांचा कस लागणार आहेच. त्याला ते कसे सामोरे जातात ते नजिकच्या काळात कळेलच.
ता. क. – सर्वसाधारणपणे आमदार, खासदार, मंत्री यांच्या आजूबाजूला ठेकेदार, ठेकेदार कम कार्यकर्ते, भाट, किटलीपेक्षा गरम पीए, लहानमोठे अधिकारी यांचे कडे असते. ते त्याला मोकळा सोडतच नाहीत. त्यामुळे समाजातील विविध क्षेत्रातील मंडळी, सर्वसामान्य माणूस याला मोकळेपणाने बोलण्याची, प्रश्न मांडण्याची संधी मिळत नाही. बाकीचा गराडा बघूनच ते बुजावतात. किरण सामंत यांच्यासह सर्वच राजकीय नेत्यांनी कधीतरी आपल्या चमच्यांना बाजूला ठेऊन समाजातील वेगवेगळ्या लोकांशी बोलावं, त्यांची मतं, भूमिका समजून घ्यावी. योग्य सल्ला अंगिकारावा अशी विनंती आहे. असं केलं तर तो नेता किंवा लोकप्रतिनिधी हा अधिक प्रगल्भ होईल असे वाटते.

