आनंदवार्ता…संपूर्ण देशावर ढगांची दाटी!

आनंदवार्ता…संपूर्ण देशावर ढगांची दाटी!

इस्रोला अखंड भारतावर ढग दिसले…! 

                महाराष्ट्रासाठी आयएमडीचा अलर्ट

मुंबई : जून महिन्यातील प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर जुलैच्या मध्यात मान्सूनने देशात पुन्हा एकदा जोरदार कमबॅक केले आहे. इस्रोच्या INSAT-3DR उपग्रहाने पाठवलेल्या ‘व्हिज्युअल चॅनेल’ च्या छायाचित्रांवर सध्या संपूर्ण भारत घनदाट पांढऱ्या ढगांनी झाकलेला दिसत आहे. उपग्रह छायाचित्रांमधील हे आच्छादन मान्सून सिस्टीमच्या बळकटीकरणाचे आणि सक्रिय टप्प्याचे थेट संकेत देत आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.

‘व्हिज्युअल चॅनेल’च्या छायाचित्रांवर दिसणारे अत्यंत चमकदार भाग हे क्युमुलोनिम्बस आणि दाट ढग दर्शवतात, जे मुसळधार पावसाचे सूचक आहेत.

मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’, तर पालघर, रत्नागिरी आणि नाशिक घाटमाथ्यासाठी ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. जूनमध्ये निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती दूर होऊन जलसाठ्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या महाराष्ट्रात आता पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार:

ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, पालघर आणि रत्नागिरीत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. सिंधूदूर्गात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.

धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. नाशिकच्या घाटमाथ्यावर ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे .

पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता आहे. सातारा घाटमाथ्यावर येलो अलर्ट, तर कोल्हापूर घाटमाथ्यावर मध्यम पावसाचा अंदाज आहे.

छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता आहे. विदर्भातील जिल्ह्यांसाठी सध्या कोणताही विशेष इशारा देण्यात आलेला नाही.

मान्सूनच्या पुनरागमनामागील वैज्ञानिक कारणे

जून महिन्यात ‘वेस्टरली जेट स्ट्रीम’ दक्षिणेकडे सरकल्यामुळे मान्सूनचा प्रवाह कमकुवत झाला होता. मात्र, जुलैच्या उत्तरार्धात ‘मान्सून ट्रफ’ उत्तर भारतावर मजबूत झाला आहे. परिणामी, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दोन्ही शाखा एकाच वेळी सक्रिय झाल्या असून, देशावरील ढगांचे आच्छादन ६० टक्क्यांच्या पुढे गेले आहे.

उत्तर भारत, मध्य भारत आणि पूर्वोत्तर राज्यांमध्ये आगामी ३-४ दिवस मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह ४० ते ५० किमी/तास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

संपादक मकरंद भागवत

पत्रकारितेचा तीस वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक विषयांवर परखड भाष्य.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *