गतिरोधक नको.. बांध घाला! शासनाचे आदेश!!

*गतिरोधक नको! बांध घाला!!*

शासनाचे आदेश…

 

महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडून नव्याने एक आदेश काढण्यात आल्याचे कळते. त्यानुसार गल्लीतल्या रस्त्यापासून राष्ट्रीय महामार्गापर्यंत जे जे वेगवेगळ्या दर्जाचे रस्ते आहेत किंवा होतील तिथे गतिरोधक न घालता वेगवेगळ्या आकाराचे, उंचीचे, अर्धेमुर्धे बांध घालण्यात येतील. अर्थात हे काम तसे आधीपासून सुरूच आहे. रस्ते अभियंते, ठेकेदार आणि त्यांचे कामगार आपापल्या कल्पनेनुसार हे काम करत होतेच, पण त्या कामाला आता शासनाने आदेश काढून नियमित केल्याचे कळते.

अपघात टाळण्यासाठी धोकादायक ठिकाणी वाहनांच्या गतीला ब्रेक लावणे हा गतिरोधकाचा सर्वसाधारण उद्देश. त्यामुळे अपघात कमी होऊन लोकांचे प्राण वाचतील. पण अभियंते, ठेकेदार यांना असला ‘फालतू’ उद्देश मान्य नाही. आपल्या प्रगत राज्यात कुठेही जा गतिरोधक न घालता सरळसरळ बांध घातलेले दिसतात. त्याचा उद्देश असा की गती कमी होईल पण प्रवासी गाडीतल्या गाडीत दणके बसून जायबंदी झाले पाहिजेत. गाड्या आपटून, घासून त्यांची काशी झाली पाहिजे. या बांधावर पांढरे पट्टे बिल्कुल मारायचे नाहीत आणि आधी सूचनाफलकही लावायचे नाहीत अशा सक्त सूचनाही देण्यात आल्या आहेत. चालकाला आणि प्रवाशांना सरप्राईज द्या त्यामुळे अचानक ब्रेक लावून त्यांची तोंडं फुटली पाहिजेत. अशा पद्धतीने काम करणाऱ्या ठेकेदारांचीच बिलं पास होतील असेही शासनाने स्पष्ट केले आहे. चांगले, गती कमी करणारे पण त्रासदायक न होणारे, योग्य उंची – रुंदी ठेवलेले, पांढरे पट्टे आणि सूचनाफलक असलेले गतिरोधक जो ठेकेदार टाकेल त्याला काळ्या यादीत टाकण्यात येईल तसेच त्या अभियंत्याला निलंबित करण्याचा इशाराही शासनाने दिला आहे.

भविष्यात महाराष्ट्रा सारख्या प्रगत राज्यात सर्वत्र कोकणातल्या भाषेत ‘अडू ‘ घातलेले दिसले तर नवल वाटायला नको. काही काही गावं, ठिकाणे तर ‘ गतिरोधकग्रस्त ‘ आहेत. अगदी हौस फिटेल इतके अडू घालून ठेवण्यात आलेत. पुढे पुढे तर लोकं चला गतिरोधक कम बांधावरच्या प्रवासाचा आनंद घेऊया म्हणून पर्यटन करतील.

धन्य तो आपला सार्वजनिक बांधकाम विभाग, धन्य तो महामार्ग विभाग आणि धन्य ते हुशार अभियंते, ठेकेदार!

 

मकरंद भागवत, पत्रकार, चिपळूण.

मो. 9850863262

संपादक मकरंद भागवत

पत्रकारितेचा तीस वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक विषयांवर परखड भाष्य.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *