खून प्रकरणी चिपळूण पोलिसांची धडाकेबाज कारवाई

खून प्रकरणी चिपळूण पोलिसांची धडाकेबाज कारवाई

*रामपूरजवळ जळालेल्या हाडांनी आणला खुनाचा थरार समोर 

 

रामपूरमधील गंभीर घटनेचा अखेर उलगडा 

 

पैशाच्या व्यवहारातून वाद विकोपाला 

 

अवघ्या 24 तासात दोन संशयित आरोपीना अटक

 

चिपळूण पोलिसांनी दमदार कामगिरी 

 

चिपळूण : तालुक्यातील रामपूर येथील आवटेवाडी परिसरात आंब्याच्या बागेजवळ दरीत जळालेल्या अवस्थेत मानवी अवशेष आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा वेगाने तपास करत चिपळूण पोलिसांनी अवघ्या २४ तासांत खुनाचा गुन्हा उघडकीस आणत दोन संशयित आरोपींना अटक झाली असून त्यात मुंबई येथील महिलेचाही समावेश आहे. तर एजाज कुरेशी (वय 54, रा. मुंबई )असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 

 

पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन या खून प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. दि. २८ मार्च २०२६ रोजी सकाळी सुमारे ११ वाजता रामपूर येथील डॉ. रावराणे यांनी पोलिसांना माहिती दिली की, त्यांच्या आंब्याच्या बागेच्या पूर्वेस सुमारे ७० मीटर अंतरावर दरीतील झाडीमध्ये काहीतरी संशयास्पद जळाल्याचे दिसत आहे तसेच त्या ठिकाणी लहान आकाराची हाडे विखुरलेली आहेत. या माहितीवरून उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले, पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे व पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

 

घटनास्थळी पाहणी केली असता जळालेल्या अवस्थेत हाडांचे तुकडे, अंगठी, रिंग व इतर साहित्य आढळून आले. यानंतर अधिक पोलीस फौजफाटा व चिपळूण येथील फॉरेन्सिक पथकाला घटनास्थळी बोलावण्यात आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करून सर्व साहित्य जप्त करण्यात आले.

 

जप्त केलेल्या हाडांच्या तुकड्यांची तपासणी कामथे रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून करण्यात आली. त्यावेळी ही हाडे मानवी असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे प्राथमिक मत देण्यात आले. त्यामुळे हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय अधिक बळावला. त्या नंतर जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक महामुनी यांचे मार्गदर्शन घेतले.

 

या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ८८/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३(१) (खून) व २३८ (पुरावा नष्ट करणे) अन्वये ३१ मार्च रोजी पहाटे १.४२ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच त्याचा तपास पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी स्वतः आपल्याकडे घेत तपासाची चक्रे फिरवली.

 

दरम्यान, गोपनीय माहितीच्या आधारे तपास करताना घटनास्थळाची जागा विशाल विजय खोडदेकर (वय २८, रा. रामपूर) याच्या मालकीची असल्याचे समोर आले. तसेच तो चार महिने पसार असल्याची माहिती मिळाली. याच दरम्यान मालाड पोलिसदेखील त्याच्या शोधात चिपळूणमध्ये आल्याचे उघड झाले. त्यामुळे त्याच्यावर संशय अधिक बळावला.

 

पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवून विशाल खोडदेकर याला ३१ मार्च रोजी रात्री १०.५० वाजता अटक केली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच या गुन्ह्यात त्याची मैत्रीण जन्नतुनिसा जिन्नत खान (रा. मालाड, मुंबई) हिचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. तिला १ एप्रिल रोजी सकाळी १०.३५ वाजता अटक करण्यात आली.

 

जन्नतुनिसा जिन्नत खान हिने एजाज कुरेशी या व्यक्तीला सदनिकासाठी काही लाखांची डिपॉझिट दिले होते. ही रक्कम कुरेशी हा देण्यास टाळाटाळ करत होता. ही गोष्ट जन्नतुनिसा जिन्नत खान हिने विशाल खोडदेकर याला सांगितली. या पैशांच्या व्यवहारातून खोडदेकर व खान या दोघांनी एजाज कुरेशी यांना मुंबईत जबर मारहाण केली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकाराने घाबरलेल्या या दोघांनी तो मृतदेह एका बागेत भरून तो रामपूर येथे आणला व बॅगेसह खोडदेकर याच्या जमिनीत पुरला. मात्र काही दिवसांनी ती बॅग काही वन्य प्राण्यांनी बाहेर काढली. काही महिन्यांनी खोडदेकर हा परत तेथे आला तेव्हा त्याला तेथे काही हाडे वर आलेली दिसली. हे पाहताच तो पुरावा नष्ट करण्यासाठी डिझेल ओतून ते अवशेष जाळल्याची माहिती खोडदेकर याने पोलिसांना दिली. दरम्यान, या दोन्ही संशयित आरोपीना पोलिसांनी अटक केली असून दोन्ही आरोपींना न्यायालयाने ६ एप्रिल २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

हा गंभीर गुन्हा जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक महामुनी व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले यांच्या मार्गदर्शनाखाली उघडकीस आणण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी दिली.

 

दरम्यान अवघ्या 24 तासांत चिपळूण पोलिसांनी खुनाचा छडा लावल्याने पोलीस प्रशासनाचे कौतुक होत आहे.ळील जंगलात आढळलेल्या हाडांचे गूढ उकलले

संपादक मकरंद भागवत

पत्रकारितेचा तीस वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक विषयांवर परखड भाष्य.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *