व्यक्तीला नाही.. प्रवृत्तीला विरोध!

*व्यक्तीला नाही.. प्रवृत्तीला विरोध!*

 

मकरंद भागवत, पत्रकार, चिपळूण.

 

चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. सुभाषराव चव्हाण यांना एका वर्तमानपत्राचा ‘ आदर्श जीवनगौरव ‘ पुरस्कार मिळाल्याचे कळल्यानंतर मी आज माझ्या स्टेटसला त्यांचे अभिनंदन करणारी पोस्ट ठेवली तसेच काही व्हाट्सअप ग्रुपवर शेअर केली. सध्या पत्रकार मारहाण प्रकरण गाजत असताना आणि त्यात या पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांविरोधात आणि कथित सूत्रधाराविरोधात पोलिसांत तक्रार दाखल असताना सुभाषराव चव्हाण यांचे अभिनंदन का करण्यात आले असा प्रश्न काहींनी उपस्थित केला.

प्रश्न अगदीच गैरवाजवी नसला तरी मला एक गोष्ट ठळकपणे नमूद करायची आहे ती म्हणजे माझी लढाई ही वैचारिक पातळीवरची आहे. ही लढाई कोणा व्यक्तीविरोधात नाही तर प्रवृत्तीविरोधात आहे. एखाद्या व्यक्तीला पैसा, सत्ता किंवा शक्तीचा अहंकार झाला की ती विवेक सोडते. दादागिरी, गुंडगिरी आणि पैशाच्या माध्यमातून ती दडपशाहीवर उतरते. आपल्याविरुद्ध कोणी बोलू नये, लिहू नये किंवा तक्रार करू नये अशा पद्धतीने आवाज दाबण्याचा प्रयत्न करते. केव्हा केव्हा आपल्या पैशातून कोणालाही विकत घेता येते अशी धारणा दृढ होते. ही वाईट प्रवृत्ती समाजासाठी धोकादायक असते. अशावेळी त्याविरुद्ध आवाज उठवणे आवश्यक ठरते. विशेषतः सार्वजनिक जीवनात पुढारीपण करणाऱ्यांनी आपलं वागणं, बोलणं नम्र ठेवलं पाहिजे. त्यांनी संवेदनशील असलं पाहिजे आणि मुळात आपल्या विचारांशी, कार्याशी प्रामाणिक असलं पाहिजे. आपण कोणीतरी खास आहोत, मोठे आहोत, समाजापेक्षा वेगळे आहोत अशी भावना बाळगणारे विनाशाकडे जातात. टोकाचे स्वार्थी होतात. निष्ठा, त्याग त्यांच्या गावीही नसते. गेल्या काही वर्षांत आपल्याकडे असे राजकारणी खरं तर अपप्रवृत्ती खूपच फोफावली आहे. तिला वेळीच आवर घातला नाही तर सामाजिक, राजकीय, धार्मिक स्वास्थ्याला मोठा धोका निर्माण होईल.

जो कोणी चांगलं काम करेल, भूमिका घेईल त्याचं मनापासून कौतुक करणं आणि चुकीचं करत असेल, वागत असेल तर त्याचा योग्य त्या आणि सभ्य भाषेत समाचार घेणं हे पत्रकार म्हणून माझं कर्तव्य आहे. मात्र, आजकाल फक्त कौतुकच आवडणाऱ्या नेत्यांची, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची संख्या बहुतांश आहे. त्यांना सूचना, टीका आवडत नाही. सहन होत नाही. पत्रकार म्हणून मला कोणाच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावण्याचा अधिकार नाही आणि मी गेली तीस वर्ष हे तत्व पाळले आहे. एखादी व्यक्ती सार्वजनिक जीवनात वावरते, पुढारीपण करते तेव्हाच ती बातमीचा, कौतुकाचा, टीका – टिपण्णीचा विषय ठरते. राजकारणात हा समतोल सांभाळता आला पाहिजे. सहनशीलता, संयम ही तर अतिशय गरजेची आणि महत्वाची बाब. ती असेल तरच व्यक्ती राजकारण किंवा समाजकारणात टिकून राहते. आणि ज्यांना हे जमत नाही त्यांनी राजकारण – समाजकारण न करता घरीच बसलेलं बरं. असे नेते ‘लंबी रेस के घोडे’ नसतात. केवळ पैशावर निवडणुका जिंकता येतात हा भ्रम आहे. लक्ष्मी चंचल असते. मस्ती आली की ती थांबत नाही.

राजकारणात टीका सहन करण्याची क्षमता किती टोकाची असते हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, स्व. अटलबिहारी वाजपेयी, स्व. विलासराव देशमुख, स्व. आर. आर. पाटील, ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिलं की कळतं. अगदी स्थानिक पातळीवर विचार केला तर माजी आमदार रमेशभाई कदम यांचं याबाबतीत कौतुक वाटतं.

त्यामुळे एखादी व्यक्ती सार्वजनिक किंवा राजकीय जीवनात काय करते यानुसार ती कौतुक किंवा टीका याची धनी होते. एक पत्रकार म्हणून आमची तीच भूमिका आहे. आणि पुढेही कायम राहणार! गेल्या तीस वर्षांत अनेक मोठमोठे राजकीय नेते, मंत्री, खासदार, आमदार किंवा स्थानिक पातळीवरचे नेते यांच्यावर प्रसंगी टिकाही केली आणि कौतुकही! त्यांनी हे दोन्ही मोठ्या मनाने स्वीकारलं. याबाबत मला प्रामुख्याने आमदार भास्करराव जाधव यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. टीका सहन करण्याचा एक खिलाडूपणा, मोकळेपणा आणि पोक्तपणा नेत्याच्या अंगी असावा लागतो. मला स्वतःला एक आठवण मुद्दाम सांगावीशी वाटते. माझे पत्रकारितेतील गुरु, दैनिक सागरचे संपादक स्व. नानासाहेब जोशी यांच्या राजकीय भूमिकेबाबत (चिपळूण न. प. निवडणूक ) मी त्यांच्यावर ‘ श्रीकृष्णच कौरवांच्या पक्षात ‘ (सतीश कदम यांच्या कोकण एक्सप्रेसमध्ये )असा टिकात्मक लेख लिहिला होता. त्यावेळी नानांनी मला बोलावून घेतलं. मनात धास्ती होतीच. नाना म्हणाले, ‘माझ्याविरुद्ध लिहिलंयस, पण छान, अभ्यासपूर्ण लिहिलंयस.’ नाना का मोठे होते त्याचं एक छोटंसं उदाहरण.

असो. सुभाषराव चव्हाण बुजुर्ग व्यक्तिमत्व आहे. त्यांचे अभिनंदन करणं मला उचित वाटलं. उद्या पत्रकार म्हणून पतसंस्थेतील गैरव्यवहार असेल, मारहाण करणारे कर्मचारी असतील, त्यांचे मास्टरमाईंड असतील त्याविरुद्ध लढाई चालूच राहील. पतसंस्थेत राजकारण येऊ नये यासाठी सुभाषराव फार काळजी घेत होते, पण वयानुसार आणि एकूणच परिस्थिती पाहता आता त्यांच्या हातात ‘ मम ‘ म्हणण्यापलीकडे काही राहिलेले आहे असे वाटत नाही. तरीही त्यांची इतक्या वर्षांची मेहनत, शिस्त यामुळेच पतसंस्था नावारूपाला आली हे मान्य करावे लागेल. आता त्यात जर गैरकारभार होत असेल, कोणी उजेडात आणत असेल तर त्यावर कारवाई ही झालीच पाहिजे. पुरस्कारांच्या झगमगाटात गैरव्यवहार दाबले गेले नाही पाहिजेत. आणि योग्य चौकशीत निर्दोषत्व सिद्ध झाले तरी ते मान्य करावेच लागेल. पण चौकशीचे आव्हान न स्वीकारता मारझोड करावी लागणे ही बाब संशय अधिक बळकट करते आहे एवढं मात्र खरं. आग धूमसते आहे, धूर निघतोय नक्की.

 

ता. क. – मी माझी भूमिका मांडली. हिच भूमिका बहुतांशी पत्रकार मित्रांची असेल अशी खात्री वाटते.

संपादक मकरंद भागवत

पत्रकारितेचा तीस वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक विषयांवर परखड भाष्य.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *