चिपळूण पोलिसांची शरणागती?
*चिपळूण पोलिसांची शरणागती?*
चिपळूण येथे खुद्द घटनाकार, लोकशाहीचे प्रणेते, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांनी (ही सर्व थोर मंडळी भाजपची प्राथमिक सदस्य असल्याचीही चर्चा आहे) एका उपोषणकर्त्याला आणि एका पत्रकाराला भर दुपारी, भर गर्दीत तुफान मारहाण केली. त्यांच्या या पराक्रमाला आता 15 दिवस झाले. या पराक्रमाचे ‘सेलिब्रेशन’ गेले 15 दिवस दिमाखात सुरु आहे. कदाचित पुढील काळात त्यांना भाजपकडून ‘ शौर्य पुरस्कार ‘ दिले जातील आणि तेही चिपळूणच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते! कारण चिपळूण पोलिसांचा एकंदर तपास हा कायद्याची, स्वतःच्या वर्दीची पत सांभाळण्यापेक्षा संस्थेची पत सांभाळण्याच्या दृष्टीने होताना दिसतोय. देवेंद्रजी फडणवीस यांचे पोलीस ज्या पद्धतीने प्रकरण हाताळत आहेत ते पाहता गुन्हेगार शरण येण्याऐवजी चिपळूणचे कर्तव्यदक्ष, तडफदार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचे डोळे पतसंस्थेच्या झगमगाटामुळे दिपून गेले आहेत असे दिसते. त्यामुळे त्यांना आता कायद्यापुढे सर्व समान आहेत, कायदा सर्वांना सारखा आहे अशी जी घोषवाक्य पोलीस स्टेशनच्या भिंतीवर लिहिली आहेत ती दिसत नाहीत. त्यांना आता कायदा हा सत्ता, संपत्ती असणाऱ्याच्या बाजूने वापरावा, तांत्रिक बाबींचा कीस काढून त्यातील पळवाटा कशा काढव्यात यासाठी मेहनत घ्यावी लागत आहे. खुनाच्या केसचा तपास करण्यात जेवढं थ्रील असतं तेवढं असल्या किरकोळ मारहाण प्रकरणात नसतं. त्यामुळे पोलिसांना तपासात मजा वाटत नाही. हा, त्यातून पत्रकाराचा मृत्यू झाला असता तर ‘ कदाचित ‘ पोलिसांना गांभीर्य वाटले असते.
त्यातच व्हिडिओ, सीसी टीव्ही फुटेजमध्येही संशयित आरोपी दिसतंच नाही असं म्हणतात. प्रत्येक आरोपीच्या चेहऱ्याच्या ठिकाणी कमळ दिसतं. कमळात बसलेली लक्ष्मी दिसते. मग आरोपिंचा शोध कसा घ्यायचा असा गहन प्रश्न पोलिसांसमोर असल्याचे कळते. कदाचित याकामी मोठमोठ्या देशी – परदेशी तपास यंत्रणांची गरजही लागू शकते. कदाचित या प्रकरणाचा तपास आणि कारवाई 22 / 23 व्या शतकात होऊ शकते. तोपर्यंत आपण सर्वांनी धीर धरला पाहिजे. पोलीस तपास, कारवाई कुर्म गतीने व्हावा अशी खुद्द इंद्र देवाचीच इच्छा असेल तर आपण पामर काय करणार?
पोलीस, कायदा हे शेवटी सर्वसामान्य माणसासाठी थोडेच असतात? पोलीस आणि कायदा यांचा आधार हवा असेल तर तुमच्याकडे सत्ता – संपत्ती पाहिजे. जोडीला मसल पॉवर असेल तर उत्तम. दोन नंबरचे धंदे असतील तर तुम्हाला मोठा मान मिळेल. उठबस होईल. असेल नसेल ती यंत्रणा तुमच्यासामोर अक्षरशः झुकेल. लाचार होईल. तुमच्यासाठी पळेल. पण,
तुम्ही सामान्य असाल तर एक औपचारिकता म्हणून, आपली प्रशासन व्यवस्था म्हणून पोलीस ठाण्यात जायचं. तुम्ही हेलपाटे मारायचे. ते जे काही सभ्य भाषेत बोलतील ते गोड मानून घरी यायचं. आरोपी बिनकामाचा असला तर लगेच कारवाई होईल. कामाचा असला तर तांत्रिक पळवाटा शोधण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतील.
पत्रकार मारहाण प्रकरणात यापेक्षा दुसरं काही असेल असं वाटत नाही. वर्दीची पत गेल्यात आणि संस्थेची पत वाढल्यात जमा आहे. संत दरेकर आधीच सांगून गेलेत, ‘ तुम्हाला सांभाळून घेतलं आहे, तुम्ही आता स्वच्छ झाला आहात.’ फक्त कारवाईच्या विलंबाचा जो डाग चिपळूण पोलिसांच्या वर्दीवर पडला आहे आणि दिवसेंदिवस वाढत आहे तो पुसून जाईल असं वाटत नाही. कदाचित तांत्रिक आधारावर हा डाग 60 दिवसापर्यंत तरी मिरवला जाऊ शकतो.
मकरंद भागवत, पत्रकार, चिपळूण.
मो. 9850863262

