कुंभार्ली घाटरस्ता जगात अव्वल!
*देवाभाऊंच्या सरकारचे कौतुक करावे तेवढे कमीच!*

आज जाणता राजा छत्रपती शिवरायांची जयंती! महायुती सरकारही स्वतःला ‘शिवशाही’ समजते! त्याला अनुसरून त्यांचा कारभार सुरु आहे हे पाटण – कोयना – कुंभार्ली घाट – पोफळी या रस्त्यावरून कळते. त्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे हे थेट छत्रपतींच्या घराण्यातले! तिकडे शंभूराज देसाई आणि इकडे उदय सामंत हे शिवसेनेचे बिनीचे शिलेदार! सरकारचे प्रमुख तर खुद्द देवेंद्रजी! त्यामुळे वरील रस्ता हा अत्यन्त दर्जेदार, चकाचक, गुळगुळीत, कोणाच्याही पोटातले पाणी जराही हलणार नाही अशा पद्धतीने तयार करण्यात आला आहे. जागतिक पातळीवर ज्या रस्त्यांची दखल घेण्यात येते त्यात या रस्त्याचा क्रमांक फार वरचा आहे असे समजते. दावोसलाही या रस्त्याबाबत चर्चा झाली असे सांगण्यात येते. भारतातलेच नव्हे तर जगातले मोठमोठे उद्योजक हा ऐसपैस, दर्जेदार महामार्ग लक्षात घेऊनच कोकणात मोठमोठे कारखाने उभारण्यास तयार झाले आहेत. पर्यटनव्यवसायिकही या रस्त्यामुळेच कोकणात आकृष्ट होत आहेत. दोन दिवसांपूर्वी फ्रान्सचे अध्यक्ष मुंबईला आले होते तेव्हा त्यांनीही हा चमत्कार वाटावा (की चमत्कारिक ) असा रस्ता पाहण्याची इच्छा व्यक्त केली शिवशाही सरकारकडे… पण वेळेअभावी ते जमणार नव्हते आणि याचा खरा दर्जा पहायचा असेल तर पावसाळा चांगला असं त्यांना आवर्जून सांगण्यात आले.
असो. आता या रस्त्यावर औषधालाही खड्डा सापडत नाही. ट्रक किंवा अवजड वाहने अगदी रिक्षा न्यावी इतक्या सहजतेने घाट चढतात, उतरतात. लहान वाहने तर दोन बोटं वरूनच चालतात. आता पूर्वीसारखं ट्रक, गाड्या आपटणे, पलटी होणे, मधेच बंद पडणे असं काही म्हणजे काही घडत नाही. रुग्णवाहिका सुसाट जातात. त्यामुळे पेशन्ट वाचतात. ट्रॅफिक जाम होऊन आबाल- वृद्ध – स्त्रियांचे हाल होण्याचे दिवस इतिहासजमा झालेत. अमेरिकेतल्या रस्त्यांना लाजवेल इतका सुंदर, देखणा, दर्जेदार, ऐसपैस रस्ता महाराष्ट्रात झालाय आणि तोही शिवशाही सरकारच्या काळात! किती कौतुक करावं आणि किती नाही असं होऊन गेलंय प्रत्येक प्रवशाला! सरकारला धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत.
इतका अप्रतिम रस्ता केल्याबद्दल बांधकाम, महामार्ग चे अधिकारी, अभियंते, कर्मचारी, ठेकेदार, पोटठेकेदार यांची महाराष्ट्र दिनी याच रस्त्यावर हत्तीवरून मिरवणूक काढण्यात येणार आहे. तर देसाई, सामंत आणि भोसले या मंत्र्यांचा विशेष गौरव देवाभाऊ आणि एकनाथभाई यांच्या हस्ते मुंबईत होणार आहे.
ता. क.- उद्या कदाचित मुख्यमंत्री आणि अनेक मंत्री सावर्डेत येणार असल्याची व ते कुंभार्ली घाटरस्त्याने येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ते नाही जमलेच तर म या रस्त्याचे ‘विहंगम दृष्य’ हेलिकॉप्टरमधून पाहतील असं सूत्रांकडून समजते.
मकरंद भागवत, पत्रकार, चिपळूण.

