गाढवं, खेचरं आणि कुंभार्ली घाट!

गाढवं, खेचरं आणि कुंभार्ली घाट!

*गाढवं, खेचरं आणि कुंभार्ली घाट!*

 

मकरंद भागवत, पत्रकार, चिपळूण.

मो. 9850863262

 

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा आत्यन्तिक महत्वाचा कुंभार्ली घाट सुस्थितीत ठेवणे आता ठेकेदार, अभियंते, अधिकारी, मंत्री आणि एकूणच राज्य सरकारच्या प्रधान्याचा विषय राहिलेला नाही. गेली अनेक वर्षे चालू असलेली दुरावस्थेची रडकथा अजूनही थांबलेली नाही. हे नष्टचक्र कधी संपेल याचाही अंदाज येत नाही. फक्त दुरुस्तीच्या नावाखाली दरवर्षी कोट्यवधी रुपये हडप करायचे, आपली पोटं भरायची एवढं काम मात्र अगदी प्रामाणिकपणे सुरु आहे.

पोफळीपासून वर घाट चढून जाईपर्यंत अक्षरशः ‘ब्रह्माण्ड’ आठवतं. नरकयातना यापेक्षा वेगळ्या नसतात. या रस्त्याची सध्याची परिस्थिती ही आदिमानवाच्या काळालाही लाजवेल अशी आहे.

मागील काही काळापूर्वी ‘मेसर्स सोनाली विक्रांत कांबळे अँड कंपनी’ या भारतातीलच नव्हे तर जागतिक पातळीवरील ठेकेदार कंपनीने या रस्त्याचे दुरुस्तीचे काम केल्याचे सांगितले जाते. ही दुरुस्ती काय लायकीची असते ते पहायचे असेल, संबंधित अधिकारी किती कर्तव्यनिष्ठ आहेत हे अनुभवायचे असेल तर कोकणातील प्रत्येक माणसाने एकदा तरी या मार्गाने प्रवास केला पाहिजे. जे या रस्त्याने (नाईलाजाने रस्ता म्हणावं लागतंय) नियमित प्रवास करतात, गाडी चालवतात त्यातही विशेषकरुन कंटेनर, टँकर, ट्रकचालक यांचा तर राज्य सरकारने विशेष पुरस्कार देऊन सन्मान केला पाहिजे.

आता हा घाटमार्ग सार्वजनिक बांधकाम खात्याकडून महामार्ग विभागाकडे गेला आहे. आता त्याची दुरुस्ती करण्यात येणार आहे असं म्हणतात. त्यासाठी टेंडर प्रोसिजर झाल्याचे कळते. पण संबंधित ठेकेदार 38% बिलो जाऊन हे काम करणार आहे. 100 रुपयाचे काम मुळात 62 रुपयात करणार. या 62 रुपयातले बुडाला बाजार 10% तरी खालपासून वरपर्यंत टक्केवारी देण्यात जाणार. राहिले 52 रु. त्यात ठेकेदाराचे फायद्याचे किमान 25 रु. वजा झाले तर 100 रुपयाचे काम तो 27 रुपयात करणार… आता तो 27 रुपयात ‘थुका’ च लावणार ना! आणि संबंधित अधिकारी जनतेला ‘चुना’ लावणार हे ओपन सिक्रेट आहे… पाखाडी असो, गावातला रस्ता असो, राज्य मार्ग असोत नाहीतर राष्ट्रीय महामार्ग असोत वर्षानुवर्षे जनतेला चुना लावणेच चालू आहे. आणि तरीही आम्ही प्रगत राज्य आहोत! विकासात आघाडीवर आहोत! मुंबई – गोवा महामार्ग म्हणजे या विकासाचा, प्रगतीचा कळसच ठरावा. कळस असल्यामुळे ते काम संथगतीने आणि अपघात सत्र थांबणार नाही याची काळजी घेऊन चालू आहे.

कुंभार्ली घाटाची परिस्थिती बघता आता तिथे वाहनांची वाहतूक बंद करुन लवकरच घोडे, गाढवं आणि खेचरं यांच्यामार्फत माल आणि प्रवासी वाहतूक चालू ठेवावी लागेल असं वाटतं. तिकडे हिमालय पर्वत भागात नाईलाजाने घोडे, गाढवं आणि खेचरं वापरावी लागतात तर इकडे भ्रष्टाचार आणि बेजबाबदारपणामुळे त्यांची गरज लागेल. घोडे, गाढवं आणि खेचर मालकांना सुगीचे दिवस येतील. वाहने बंद झाल्यामुळे प्रदूषण कमी होईल.

इंग्रजांनी या परिसराचे महत्व लक्षात घेऊन सह्याद्रीच्या राकट खडकातून तंत्रज्ञान आणि साधनसामुग्री अत्यल्प असतानाही हा घाटमार्ग निर्माण केला. आज आधुनिक तंत्रज्ञान आहे, साधनसामुग्री आहे, पैसा आहे पण तरीही चांगल्या दर्जाचा रस्ता होत नाही कारण प्रत्येकाला आपला खिसा भरायचा आहे. अपचन झालं तरी खायचं आहे. महाराष्ट्रात सरकार कोणाचही असो चांगले रस्ते तयार करणे म्हणजे ‘पाप करणे’ असंच मानलं गेलं आहे.

टक्केवारीची कीड ही नष्ट होणार नाहीच पण, किमान नियंत्रित जरी झाली तर कदाचित पुढच्या पिढ्यांना चांगले रस्ते मिळतील. आपण मात्र खराब रस्त्यानेच प्रवास करणार आहोत हे वास्तव आहे. एखादा रस्ता 15/20 वर्ष टिकला तर ठेकेदार, संबंधित कर्मचारी, अधिकारी, मंत्री गरीब होतील. आणि ते राज्याला, देशाला परवडणारे नाही. कारण ते ‘असामान्य’ आहेत. व्हीआयपी आहेत. जनता सामान्य आहे. तिची किंमत किड्यामुंग्यांपेक्षा जास्त नाही.

संपादक मकरंद भागवत

पत्रकारितेचा तीस वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक विषयांवर परखड भाष्य.

Related articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *