RTO आणि पोलिसांत हिंमत असेल तर…!
*RTO आणि पोलिसांत हिंमत असेल तर…!*
मकरंद भागवत, पत्रकार, चिपळूण.
मो. 9850863262
गणेशोत्सव काळात वाहतुकीचे नियोजन करुन कोकणवासियांचा प्रवास सुखकर करण्यासाठी जिल्हा पोलिसांनी घेतलेल्या मेहनतीचे कौतुक आहेच मात्र, आताचा जो विषय आहे त्याबाबतीत जिल्हा पोलीस आणि RTO यांनी हिम्मत दाखविण्याची गरज आहे. अंगावर असलेल्या वर्दीचा आणि मिळालेल्या अधिकारांचा ‘रुबाब’ कायम ठेवायचा असेल तर त्यांनी तथाकथित मोठ्या लोकांवर नियम मोडल्याबद्दल कारवाई केली पाहिजे. आपल्याकडे सर्वसामान्य माणसांसाठी एक कायदा असतो, नियम असतो, न्याय असतो तर गल्लीपासून दिल्लीपर्यंत असलेल्या सर्वपक्षीय पुढऱ्यांना, आमदार, खासदार, मंत्री, त्यांचे नातेवाईक, निकटवर्तीय, मोठमोठे व्यावसायिक, दोन नंबरवाले, वरिष्ठ अधिकारी यांच्यासाठी सगळंच वेगळं असतं. खरं तर त्यांना नियम, कायदा, कर्तव्य काही लागू नसतं. ते करतील, जे बोलतील, जे वागतील ते सर्व ‘प्रमाण’! ते खरे देशभक्त, संविधानाचे पाईक! खरं तर पृथ्वीवर विशेषतः भारतभूमीवर अवतरलेले ‘फरिश्ते’च! त्यामुळे पोलीस काय किंवा RTO काय त्यांची हिम्मत नाही की बड्या पण बेजबाबदार लोकांना वर्दीचा, अधिकारांचा धाक दाखवतील!
वरील सर्व प्रकारच्या मोठ्या आणि देशभक्त लोकांनी वाहतुकीचे नियम पाळले नाहीत तरी चालतं. वाहन आणि वाहतूक याविषयींचे जे काही नियम, कायदे आहेत ते आपणा सर्वसामान्य लोकांसाठी आहेत. कारवाईचा बडगा आपल्यासाठीच आहे. आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला वर्दीचा रुबाब दाखवणाऱ्या पोलीस किंवा RTO च्या अधिकारी आणि कर्मचारी यांचा ‘पुरुषार्थ’ वरील ‘थोर’ मंडळीच्या पुढे संपतो.
हे चित्र राज्यात, देशात सर्वत्र आहेच, पण आपण केवळ रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करू. कित्येक आजी, माजी मंत्री, खासदार, आमदार, जि. प. सदस्य, पं. स. सदस्य, नगराध्यक्ष, नगरसेवक, गावपुढारी, बिल्डर्स, कॉन्ट्रॅक्टर्स, अन्य मोठे व्यावसायिक, दोन नंबरवाले, दादागिरी – भाईगिरी करणारे, आजीमाजी अधिकारी, कर्मचारी, या सर्वांची मुलंबाळं, सगेसोयरे आणि असे असंख्य देशभक्त (प्रत्येकाने आपापल्या आजूबाजूला पहावे म्हणजे दिसतील) यांना रस्त्यात अडवून पोलिसांनी, Rto ने कधी कारवाई केल्याचे कोणी पाहिले आहे का? 99.99% याचे उत्तर ‘नाही’ असेच आहे. (ज्या अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी अशी हिम्मत केली असेल किंवा करत असतील त्यांचे मनापासून अभिनंदन)
या मंडळींनी आपल्या गाड्यांना HSRP नंबर प्लेट बसवली नाही म्हणून त्यांना कोणी अडवत नाही, विचारत नाही, दंड करत नाही. त्यांनी फॅन्सी नंबर प्लेट बसवल्या तरी चालतात. त्यांच्या गाड्यांच्या काचा काळ्याभोर असल्या तरी चालतात. त्यांनी वाहतुकीचे नियम तोडले तरी चालतात. त्यांनी वाट्टेल तिथे पार्किंग केले तरी चालते. त्यांच्या पोराटोरांकडे लायसन्स नसले तरी चालते. त्यांनी गाड्या बेफामपणे चालवल्या तरी चालते. गाडीचं पियूसी नसलं तरी चालतं. गाड्या चालवताना स्टंटबाजी केली तरी चालते. दारू पिऊन गाडी चालवली तरी चालते. ‘हिट अँड रन’ चा पराक्रम केला तरी चालतो. आणि हे सर्व उघड्या डोळ्यांना दिसत असलं तरी पोलीस आणि RTO अधिकारी, कर्मचारी यांनी त्यांना अडवायचं नाही, जाब विचारायचा नाही. कारवाई करायची नाही कारण अशा बेजबाबदार लोकांना जाब विचारण्यासाठी जी हिम्मत लागते तीच त्यांच्यात नाही. (अपवाद सोडून)
या देशाचे कायदे, नियम, न्याय हा सर्वांसाठी एक असला पाहिजे. प्रत्येकाने नियम, कायदे पाळण्याचा जास्तीतजास्त प्रयत्न केला तर अनेक समस्या, प्रश्न सहज सुटतील. पण आज दुर्दैवाने सर्वसामान्य माणूस आणि वरील तथाकथित बड्या लोकांसाठी वेगवेगळी ट्रीटमेंट दिली जात आहे. हा मुद्दा वाहनाशी संबंधित असला तरी जवळपास प्रत्येक विभागात, खात्यात आणि एकंदरच सार्वत्रिक जीवनात ही दरी सहज दिसून येते.
नियम, कायदे, शिस्त पाळणारा माणूस या देशात ‘महामूर्ख’ म्हटला पाहिजे आणि नियम, कायदे लीलया मोडणारे, सर्वांना विकत घेऊ शकणारे आणि तरीही सर्वांना देशप्रेम, देशभक्ती, संविधानाचे डोस पाजणारे या देशाचे ‘महान सुपुत्र’ आहेत. वर्दीचा, अधिकारांचा वापर करताना भेदभाव करणारे अधिकारी, कर्मचारी हे या देशाचे खरे आधारस्तंभ आहेत.
ता. क. – वरील ‘थोर’ मंडळी राहुदेत. Rto आणि पोलीस खात्याच्या आजी – माजी अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी, त्यांच्या मुलाबाळांनी तरी आपण वाहतूक आणि वाहन संबंधी नियम किती पाळतो याचे आत्मपरीक्षण करावे. अनेकांच्या बुलेटचा सायलेंसर तपासावा. गाड्यांच्या काचा, नंबरप्लेट बघाव्यात.
शेवटी वरील महान मंडळींना एक विनंती आहे की त्यांनी स्वतःला इतकेही ‘मोठे आणि वेगळे’ समजू नये.

