गणेशोत्सव – राज्यमहोत्सव सोहळ्याला फक्त 25 प्रेक्षक!
*ना.आशिष शेलारजी-*
*कलाकारांचा ‘उत्कृष्ट’ गोंधळ!*
*सांस्कृतिक विभागाचा नियोजनाचा ‘गोंधळ’!!*
मकरंद भागवत, पत्रकार, चिपळूण.
मो. 9850863262
750 पैकी 725 रिकाम्या खुर्च्या आणि 25 प्रेक्षक…त्यात दोन नगरसेविका, तीन पत्रकार, फोटोग्राफर, साउंड सिस्टीमचे चार पाच जण, तहसीलदार, नायब तहसीलदार, चार पाच महसूल कर्मचारी आणि इतर काही हौशी नागरिक अशा ऑडियन्ससमोर हेरंब संस्थेच्या कलाकारांनी ज्या अपूर्व उत्साहात आपली कला सादर केली त्यांना खरं तर मानाचा मुजरा! या कलाकारांनी लोककला सादर करताना आदिशक्तीचा गोंधळ इतका उत्कृष्टरित्या घातला की डोळ्याचे पारणे फिटले! आणि त्याचवेळी सरकारी कार्यक्रम, त्यांचे ढिसाळ नियोजन कसे असते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ना. आशिष शेलार यांच्या सांस्कृतिक विभागाने आज चिपळूण येथे इंदिरा सांस्कृतिक केंद्रात आयोजित केलेला गणेशोत्सव राज्यमहोत्सव सोहळा! सांस्कृतिक खात्याचे मंत्री ना. आशिष शेलार यांनी या पूर्णपणे फेल गेलेल्या कार्यक्रमाची दखल घेऊन यापुढे त्यात सुधारणा करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात. त्यामुळे शासनाचे लाखो रुपये विनाकारण खर्च होणार नाहीत आणि शासनाचा सांस्कृतिक वारसा जपण्याचा हेतू साध्य होईल.
सांस्कृतिक विभाग, सांस्कृतिक महासंचलनालय आणि जिल्हा प्रशासन यांच्या विद्यमाने गणेशोत्सव हा राज्यमहोत्सव म्हणून साजरा करण्यासाठी विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. मात्र काळ, वेळ, दिवस न बघता, त्याची पुरेशी प्रसिद्धी न करता कार्यक्रम कुठून तरी उरकायचा असा एकंदर खाक्या आज चिपळूण येथे दिसून आला. असे कार्यक्रम आयोजित करताना लोकांचा सहभाग अपेक्षित ठेवायचा पण नियोजन चुकीच्या पद्धतीने करायचे त्यामुळे शासनाचे, प्रशासकीय अधिकाऱ्यांचे तोंड कसे फुटते, त्यांचे हसे कसे होते ते चिपळूणला दिसून आले.
या कार्यक्रमाला स्वतः ना. आशिष शेलार, पालकमंत्री ना. उदय सामंत, मंत्री योगेश कदम, जिल्हा परिषद अध्यक्षा, खासदार नारायण राणे, खासदार सुनील तटकरे, आमदार प्रमोद जठार, आमदार निरंजन डावखरे, आमदार अनिकेत तटकरे, आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, एसपी नितीन बगाटे, सिईओ वैदेही रानडे यांची उपस्थिती निदान निमंत्रण पत्रिकेत तरी दिसत होती. प्रत्यक्षात यातली एकही व्यक्ती कार्यक्रमाला आलेली नाही. पाहुणे नाहीत, प्रेक्षक नाहीत अशा परस्थितीत नेमकं काय करायचं अशी गोची तालुका पातळीवरील अधिकारी आणि कर्मचारी यांची झाली. शेवटी साडे सहाचा कार्यक्रम पावणे आठला 725 खुर्च्या आणि 25 प्रेक्षक यांच्या साक्षीने सुरु झाला.
एवढ्या मोठ्या कार्यक्रमात, एवढ्या मोठ्या प्रेक्षागृहात केवळ 25 प्रेक्षकांसमोर आपली कला सादर करायची म्हटल्यावर कलाकारांची मनस्थिती काय झाली असेल? त्यांना नैराश्य येणं स्वाभाविक असू शकतं, पण या कलाकारांनी, गायकांनी, निवेदकाने आणि वाद्यवृंदाने आपला जोश, कलेप्रति असलेली निष्ठा, अत्यल्प असले तरी प्रेक्षकांना आनंद, समाधान देण्याचा आपला प्रयत्न शेवटपर्यंत अखंड ठेवला. म्हणूनच त्यांचे अगदी मनापासून अभिनंदन!
अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशीपर्यंत सर्व नेते मंडळी गावोगावी गणेश दर्शनासाठी फिरत असतात, लोकही गणेश दर्शन आणि देखावे बघण्यासाठी जातात, अनेकांच्या घरी गणपती असतात, अनेक कार्यकर्ते मंडळाच्या गणपतीत व्यस्त असतात, या मंडळातही सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम असतात या कशाचाही विचार न करता असा राज्यमहोत्सव सोहळा आयोजित करण्याचा घाट का घातला गेला? तालुका किंवा जिल्हा प्रशासन या परिस्थितीबाबत अनभिज्ञ् कसे काय असू शकते? पालकमंत्री यांनाही या कार्यक्रमाच्या नियोजनात विश्वासात घेतले गेले की नाही? या प्रश्नाची उत्तरं मिळायला हवीत.
कलाकारांना त्यांचे योग्य ते मानधन मिळायला हवेच, मात्र सांस्कृतिक चळवळ, समाजप्रबोधन आदी हेतुचं काय? लोकांचा सहभाग नसेल तर अशा कार्यक्रमाचा उपयोग तो काय?
चूक कोणाची.. यात भविष्यात काय सुधारणा करायला हव्यात याचा मंत्री म्हणून ना. आशिष शेलार आणि सांस्कृतिक विभागाचे अधिकारी यांनी जरूर विचार करावा अशी अपेक्षा आहे.
ता. क. – योग्य नियोजन नाही, पुरेशी प्रसिद्धी नाही यामुळे चिपळूणकर नागरिक कमी आले. परंतु महसूल आणि इतर सरकारी खात्याचे कर्मचारी, त्यांचे कुटुंब यांना जरी आणले असते तरी सहज किमान शंभर – दिडशे प्रेक्षक झाले असते.

