रत्नागिरी पोलिसांचे कौतुक…

रत्नागिरी पोलिसांचे कौतुक…

*रत्नागिरी पोलिसांचे कौतुक…*

 

गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या लाखो भाविकांची गैरसोय होऊ नये, त्यांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून प्राप्त परिस्थितीतीत ज्या काही उपाययोजना करणे शक्य होत्या त्या रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी केलेल्या आहेत आणि त्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग झाल्याचे दिसून येत आहे. मुंबई – गोवा महामार्ग वेळेत पूर्ण झाला असता तर पोलिसांवर किंवा एकूणच प्रशासनावर येत असलेला ताण कमी झाला असता. महामार्गचे काम रखडण्यास ठेकेदार आणि राज्यकर्ते जास्त जबाबदार आहेत. ही काही पोलिसांच्या किंवा जिल्हा प्रशासनाच्या अख्त्यारितील बाब नाही. मात्र, महामार्गाचा वाहतूक कोंडी टाळण्यासाठी म्हणावा तेवढा उपयोग होणार नाही हे वेळीच लक्षात घेऊन जिल्हाधिकारी मनुज जिंदल, त्यांचे सहकारी प्रांत, जिल्ह्याचे पोलीस प्रमुख नितीन बगाटे, त्यांचे सर्व सहकारी उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, पोलीस कर्मचारी, वाहतूक शाखा यांनी वाहतूक कोंडीची ठिकाणं लक्षात घेऊन त्यादृष्टीने पोलीस कर्मचारी तैनात केले आहेत. मदत केंद्र उभारली आहेत. अत्यावश्यक यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. चिपळूण शहरात होणारी संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उड्डाणपुलाखालील परिसर मोकळा करणे, सर्व्हिस रोड रुंद करणे, एसटी बसेसच्या पार्किंगचे नियोजन अशा उपाययोजना करण्यात आल्या. त्याचा निश्चितच उपयोग झाल्याचे दिसून येत आहे. तासंतास कोंडीत अडकून पडण्यापेक्षा दहा – पंधरा मिनिटे अडकून पडल्याची तक्रार करण्यात काही अर्थ नाही. कारण आहे त्या स्थितीत मार्ग काढणे आणि कमीतकमी त्रास होईल हे जिल्हा प्रशासनाचे, जिल्हा पोलिसांचे उद्दिष्ट आहे.

आता पुन्हा एकदा कसोटी लागेल ती विसर्जंनानंतर शनिवार संध्याकाळ ते अगदी रविवारच्या रात्रीपर्यंत. खासगी वाहनांची वाढलेली प्रचंड संख्या, त्यातच शेकडो एसटी बसेस, सीएनजी आणि पेट्रोल पंपावर होणारी गर्दी यामुळे पोलिसांवर मोठा ताण पडणार आहे हे निश्चित. पोलीस अधिकारी, कर्मचारी गेले आठ दिवस रात्रंदिवस सातत्याने फिल्डवर कार्यरत आहेत. पुढचे चार दिवस त्यांच्या मेहनतीची, कौशल्याची, संयमाची कसोटी आहे. ऊन – पाऊस झेलून, गाड्यांचा धूर, आवाज, बेशिस्त वाहनचालक अशाचा सामना करत, वेळप्रसंगी वडापावचा आधार घेऊन ते गणेशभक्तांच्या सुलभ आणि सुरक्षित प्रवासासाठी कर्तव्य बजावत आहेत. त्यांचे मनापासून अभिनंदन! लोकांनी, वाहनचालकांनीही शिस्त, नियम पाळले तर अधिक चांगले होईल.

पालकमंत्री उदय सामंत यांचेही या सर्वांना मार्गदर्शन लाभले आहेच, मात्र आता हे वर्ष संपण्यापूर्वी तरी महामार्ग पूर्ण होईल, ब्लॅक स्पॉटवर उपाय होतील, खड्डे, काँक्रीट जाऊन सळ्या दिसायला लागलेले सर्व्हिस रोड असे सर्वच गोष्टींचे निराकरण होईल आणि एकदम निर्धोक हायवे तयार होईल यासाठी विशेष लक्ष द्यावे अशी अपेक्षा आहे. तसे झाले तर किमान पुढच्या वर्षीच्या गणेशोत्सवासाठी येणारे लाखो भक्त आणि अनावश्यक ताण पडणारे पोलीस यांना दिलासा मिळेल.

 

मकरंद भागवत, पत्रकार, चिपळूण.

मो. 9850863262

संपादक मकरंद भागवत

पत्रकारितेचा तीस वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक विषयांवर परखड भाष्य.

Related articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *