चिपळूणच्या डॉक्टर्सना पुन्हा एक आवाहन..
*चिपळूणच्या डॉक्टरांसाठी पुन्हा एक आवाहन…*
मागच्याच आठवड्यात मी चिपळूणमधील डॉक्टर्स रुग्णांना भेटण्यासाठीच्या सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन्ही वेळा(इमर्जन्सी सोडून) पाळत नसल्याबाबत समाजमाध्यमातून लिहिले होते. हा स्वतः घेतलेला अनुभव आहेच, परंतु मी जी वस्तुस्थिती लिहिली त्यावर रुग्ण, त्यांचे नातेवाईक, समाजातील जाणते-प्रतिष्ठित व्यक्ती, खुद्द काही डॉक्टर्स यांच्याकडून कॉल, मेसेज याद्वारे मिळालेला प्रतिसाद आणि त्यातील वेळ न पाळण्याबाबत असलेली तीव्र नाराजी प्रचंड आहे.
त्यामुळे चिपळूणमधीलच नव्हे तर जिल्ह्यातील डॉक्टर्सनी याचा गांभीर्याने विचार करावा. वेगवेगळ्या डॉक्टरांच्या वेगवेगळ्या संघटना आहेत. त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा आहे.
** वेळ पाळली जात नसल्याचे लिहिले त्यावर प्रतिक्रिया देताना अनेकांनी आणखी एक तक्रार केली की, अनेक दवाखाने, थोडी मोठी हॉस्पिटल्समध्ये सोईस्कर असूनही फोनद्वारे नंबर लावून घेत नाहीत. जेव्हा संपर्क यंत्रणा नव्हती तेव्हा ठीक होतं. पण आता सर्व सुविधा असताना केवळ नंबर लावण्यासाठी खेडोपाड्यातल्या लोकांना इतक्या लवकर यावं लागलं तर त्यांचे काय हाल होत असतील हे डॉक्टर मंडळींना नक्कीच कळायला हवं. **
फोनवर नंबर लावून त्याला वार, वेळ देणं यात काय मोठी अडचण आहे अशा डॉक्टरांना त्यांचे तेच जाणोत. सुविधा न वापरता रुग्णाला, नातेवाईकांना त्रास देण्याचा आडमुठेपणा कशासाठी?
स्टाफला सौजन्य आणि रुग्णाला व्यवस्थित माहिती दिली जाईल एवढं प्रशिक्षण द्यायलाही काही हरकत नसावी.
ता. क. – चिपळूण अगर रत्नागिरी हे मेडिकल हब बनण्यासाठी, इथले पेशन्ट इथेच येतील, परंतु बाहेरचेही पेशंट विश्वासाने येथे येतील यासाठीची मोठी जबाबदारी ही डॉक्टर मंडळींची आहे. त्यासाठी त्यांनी आवश्यक त्या सुधारणा कराव्यात हिच अपेक्षा आहे.
मकरंद भागवत, पत्रकार, चिपळूण.
मो. 9850863262

