तानाजीरावांनी सर केला ‘संमेलनाचा गड’

*तानाजीरावांनी सर केला ‘संमेलनाचा गड’ !*

 

मकरंद भागवत, पत्रकार, चिपळूण.

मो. 9850863262

*आ. क.*- ताजा कलम लिहितात तसं मला हे आधी लिहावंसं वाटलं म्हणून आ. क.! सर्वसाधारणपणे कोणत्याही संमेलनाचा शुभारंभ हा मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते होत असतो. पाहुणे राजकीय नेते असतील तर वेळेत येत नाहीत आणि त्यामुळे शुभारंभ तसेच पुढील सर्व कार्यक्रम रखडत जातात. नियोजन बिघडत जाते. साहित्य रसिकांचा निरस होतो, हिरमोड होतो. या संमेलनाचा शुभारंभही उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार होता, पण त्यांचा दौरा रद्द झाला आणि जो उत्साह होता तो एकदम कमी झाला. आता निदान पालकमंत्री तरी वेळेत येतील आणि शुभारंभ होईल अशी अपेक्षा होती, पण तीही मावळली. अशा वेळी संमेलनाध्यक्ष आणि प्रमुख संयोजक या नात्याने डॉ. तानाजीराव चोरगे यांनी शुभारंभ सोहळा पाहुणे आल्यावर करू, परिसंवाद आधी चालू करू अशी भूमिका घेतली. ही भूमिका अतिशय योग्य आणि भविष्यातील संमेलनाना मार्गदर्शक ठरेल अशी होती. त्यांच्या या भूमिकेमुळे संमेलनाचे नियोजन बिघडले नाही आणि साहित्यरसिकही सुखावले. वेळेत न येणे हा आपल्याकडच्या राजकीय नेत्यांच्या मोठेपणाचा एक भाग आहे. मात्र कधी कधी एकापाठोपाठ कार्यक्रम, बैठका, भेटीगाठी, प्रवास यामुळेही अनेक नेते वेळेत येऊ शकत नाहीत हेही खरं आहे. असं असलं तरीही साधारणपणे लोकं किती उशीर सहन करू शकतात याचे भानही त्यांनी ठेवणे नक्कीच आवश्यक आहे. या संमेलनाचा शुभारंभ सोहळा प्रत्यक्षात दोन परिसंवाद झाल्यावर भरदुपारी दोन वाजता झाला ही एक आगळी वेगळी घटना म्हटली पाहिजे.

 

महाराष्ट्रातील पहिले वहिले ग्रामीण – कृषि आणि सहकार मराठी साहित्य संमेलन दिनांक तेरा ते पंधरा फेब्रुवारी असे तीन दिवस मांडकी – पालवण या ठिकाणी अतिशय चांगल्या रितीने पार पडले. संमेलनातील विविध विषयांवरील परिसंवाद, शेतकऱ्यांची यशोगाथा, डॉ. चोरगे यांची मुलाखत, शुभारंभ सोहळ्याप्रसंगी पालकमंत्री ना. उदय सामंत यांचे भाषण, संमेलनाध्यक्ष म्हणून डॉ. तानाजीराव चोरगे यांनी मांडलेले परखड विचार, स्वागताध्यक्ष असलेले कुलगुरु डॉ. संजय भावे यांचे मनोगत, समारोपप्रसंगी अखिल भारतीय साहित्य मंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी केलेले सुंदर विवेचन, डॉ. सागर देशपांडे यांचे सडेतोड विचार अशामुळे हे संमेलन एका वेगळ्या उंचीवर गेले असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

या संमेलनात झालेल्या विविध विषयांवरील परिसंवादात अनेक अभ्यासू, जाणकार आणि कृतिशील वक्त्यांनी आपली मतं अतिशय मुद्देसूद आणि दिलेल्या वेळेत मांडली. अगदी एकदोन वक्त्यांनी श्रोत्यांच्या संयमाचा अंत पाहिला. परिसंवाद अध्यक्ष वेळ जात नाही म्हणून बेल वाजवत असावेत असं समजून त्याकडे दुर्लक्ष करुन आपलं भाषण रेटणाऱ्या वक्त्यांनी भविष्यात वेळेचे भान राखावे. बरं वक्त्याचे ऐकावं असं वाटलं तर श्रोते वेळ वाढला तरी कुरकुर करत नाहीत. पण उपस्थितांशी आपला संबंध नाहीच असं समजून रटाळ बोलणं चालूच ठेवण्याचा एका प्रकाशक महाशयांनी दाखवलेला चिवटपणा ‘कौतुकास्पद’ होता. दिलेल्या वेळेत (फारतर दोन मिनिटं इकडे तिकडे ) आपलं मत, विचार मांडणे ही वक्त्याची जबाबदारी आहे. ते कौशल्य असणं आवश्यक आहे. आणि मुळात उपस्थितांशी संवाद साधणे आवश्यक. अर्थात काहीवेळा विषयाच्या व्याप्तीच्या मानाने वेळ कमी पडतो हे नाकारून चालणार नाही. अशावेळी संयोजकांनी एक तर वक्ते संख्या कमी करुन वेळ वाढवून द्यावी किंवा परिसंवादाचाच वेळ वाढवावा. अर्थात तो कंटाळवाणा होणार नाही हेही पाहिले पाहिजे.

‘ग्रामीण साहित्यातील कोकण’ या परिसंवादात एल. बी. पाटील, कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे, सुभाष लाड, विजय हटकर यांनी आपापली मतं, व्यथा चांगल्या पद्धतीने मांडल्या. ग्रामीण कथाकथनाचा कार्यक्रमही प्रा. अप्पासाहेब खोत, भास्कर बडे, संजय एरणे, बाबा परीट, विजय जाधव यांच्या कथांनी रंगतदार झाला. ग्रामीण साहित्य – काल, आज आणि उद्या तसेच सहकार साहित्य व सहभागातून समृद्धी हे परिसंवादही प्रबोधन करणारे होते. सांमेलनाच्या तिसऱ्या दिवशी कृषि, सहकार व ग्रामीण साहित्य या विषयावरील परिसंवाद डॉ. बाळासाहेब जमदग्नी, शेखर गायकवाड, रावसाहेब पुजारी आदींनी आपल्या अभ्यासपूर्ण विवेचनाने सार्थकी लावला. प्रयोगशील शेतकऱ्यांची यशोगाथा ऐकण्यास खूपच चांगला प्रतिसाद मिळाला.

या संमेलनाचा प्रमुख उद्देश असलेला आणि अत्यन्त गंभीर असलेला प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या…’आता आत्महत्या थांबवूया’ या परिसंवादात पद्मश्री पोपटराव पवार, शेतकरी नेते पाशा पटेल, डॉ. जालिंदर पाटील, डॉ. राजेंद्र कुंभार, जयू भाटकर, जयदेव बर्वे या सर्वांनीच गंभीर समस्येचे अनेक पदर उलगडले. आत्महत्या थांबविण्यासाठी विविध अंगानी विचार करण्याची, त्यानुसार उपाय योजण्याची गरज अधोरेखित केली. पाशा पटेल यांच्या बोलण्याच्या वेगळ्याच पण रोखठोक ढंगाने संमेलनात एक वेगळीच जान आणली.

या संमेलनात विविध विषयांवर, समस्यांवर चांगले विचारमंथन झाले यात शंका नाही. पण या सर्वाला कृतिशील जोड पाहिजे हेही तितकेच खरं आहे. संमेलन म्हणून बघितलं तर ते नक्कीच चांगलं झालं, यशस्वी झालं. परंतु त्याचं खरं यश हे जे विषय डोळ्यासमोर ठेवले त्यात काही सकारात्मक बदल झाले, त्या त्या विषयांना योग्य दिशा मिळाली, त्यातून भविष्यात काही निर्माण झालं तर असणार आहे हेही मान्य करायला हवं.

एकंदरीत संमेलनाचे आयोजन, नियोजन यात स्वतः डॉ. तानाजीराव चोरगे यांचा रोल महत्वाचा होता. ते स्वतः कृषि, साहित्य आणि सहकार क्षेत्रात गेली अनेक वर्षे लिलया वावरत आहेत. रांगडा स्वभाव, रोखठोक बोलणं, भारदस्त आवाज यामुळे चोरगे सरांचे व्यक्तिमत्व वेगळ्या प्रकारचे आहे. संमेलनाध्यक्ष म्हणून त्यांचे भाषण हे त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसे असे परखड होते. त्यांना खरं तर माईक, स्पीकर याची गरजच नाही एवढा खणखणीत आवाज त्यांना लाभला आहे. भाषणाच्या सुरवातीलाच त्यांनी शेवटच्या विद्यार्थ्यांना ज्या आवाजात ‘खाली बसा’ म्हणून दर्डावले ते ऐकून तेच काय आजूबाजूच्या शाळातील विद्यार्थीही गप जागेवर बसले असतील… मुलाखतीतही त्यांनी अतिशय ठाम मतं व्यक्त केली. त्यांनी स्वतःला ‘ क्रॅक ‘ संबोधलं आणि अशीच माणसं आव्हानांना सामोरी जातात, ती पेलतात असं सांगितलं. अतिविचारी माणसं असं धाडस करू शकत नाहीत असंही ते म्हणाले. हे वास्तव आहे. सरांनी आपली पत्नी, सून आणि मुलगा निखिल अशा सर्वांना या संमेलनाच्या जबाबदारीत सहभागी करुन घेतलं. निखिल यांनी आपले सर्व सहकारी प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी, ग्रामस्थ अशांचे उत्तम टीमवर्क दाखवून दिले. साहित्य संमेलन म्हटले की प्रकाश देशपांडे सर, अरुण इंगवले आणि त्यांचे सर्व साहित्य चळवळीतले कार्यकर्ते यांचा पुढाकार, सक्रीय सहभाग हा असणारंच! तो या संमेलनातही होताच. म्हणून तर या सर्वांच्या साथीने तानाजीरावांनी ‘संमेलनाचा कठीण गड सहज सर केला’ असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

या साहित्य संमेलनाला प्रोत्साहन देणारे आणि सहकार्य करणारे पालकमंत्री ना. उदय सामंत आणि आमदार शेखर निकम हेही या यशस्वी संमेलनाचे प्रमुख आधारस्तंभ होते. पालकमंत्री यांनी आदर्श गाव योजना पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्यात राबविण्याचा निर्धार या संमेलनात बोलताना व्यक्त केला आहे तो पुढील काळात कृतीत उतरेल आणि कोकणाला त्याचा लाभ मिळेल अशी अपेक्षा नक्कीच करायला हरकत नाही.

एकंदरीत या संमेलनात कोणतेही अनावश्यक वाद झाले नाहीत.. वैचारिक मतमतांतरे चांगल्या रितीने मांडली गेली हे वैशिष्ट्य म्हणावे लागेल तसेच गावातल्या ठिकाणी संमेलन घेऊनही अत्यन्त सुंदर नियोजन, सोई सुविधा दिल्या गेल्या, वेळा पाळल्या गेल्या यामुळेही संमेलनाच्या यशस्वीतेत भर पडली.

एक चांगले संमेलन आयोजित केल्याबद्दल चोरगे सर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन. (आणि ‘आता काही नको, बस्स झालं ‘ असं म्हणत म्हणत पुढच्या वर्षी पुन्हा संमेलन आयोजित करतील अशीही अपेक्षा आहे.)

संपादक मकरंद भागवत

पत्रकारितेचा तीस वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक विषयांवर परखड भाष्य.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *