पाच रानगव्यांना जीवदान!
लोवले येथे कोरड्या विहिरीत पडलेल्या
पाच रानगव्यांना जीवदान!
वनविभाग व ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे यशस्वी रेस्क्यू
संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील मौजे लोवले येथे एका कोरड्या विहिरीत पडलेल्या पाच रानगव्यांना वनविभागाने स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढत जीवदान दिले. बुधवारी (दि. ११ फेब्रुवारी २०२६) रात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.
वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे ११.३० वाजता श्री. संतोष प्रदीप खेडेकर यांच्या मालकीच्या कोरड्या विहिरीत पाच रानगवे पडल्याची माहिती कृषी सहाय्यक श्री. समीर दोरखडे यांनी वनविभागाला दिली. माहिती मिळताच संगमेश्वर–देवरुख परिमंडळाचे वन अधिकारी व त्यांचे पथक आवश्यक साहित्य घेऊन तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
सुमारे १५ ते २० फूट खोल व १५ फूट व्यास असलेल्या या विहिरीत दोन पूर्ण वाढ झालेले रानगवे व तीन पिल्ले अडकल्याचे निदर्शनास आले. विहिरीची उंची जास्त असल्याने रानगव्यांना बाहेर पडणे शक्य नसल्याने वनविभागाने जेसीबीच्या साहाय्याने विहिरीच्या एका बाजूला मातीचा रॅम्प (उताराचा रस्ता) तयार करण्याचा निर्णय घेतला.
रात्री सुमारे १.३० वाजता रॅम्प पूर्ण झाल्यानंतर रानगव्यांचे कुटुंब नैसर्गिकरीत्या या मार्गावरून बाहेर पडले आणि जंगलाच्या दिशेने सुरक्षितपणे निघून गेले. विशेष म्हणजे या संपूर्ण बचाव कार्यात एकाही रानगव्याला इजा झाली नाही.
हे रेस्क्यू ऑपरेशन रत्नागिरी (चिपळूण) विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरीजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड व परिक्षेत्र वन अधिकारी श्री. प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सागर गोसावी, वनरक्षक आकाश कडुकर, सुरज तेली, सहयोग कराडे यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पाडले.
दरम्यान, वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास नागरिकांनी तात्काळ वनविभागाच्या १९२६ किंवा ९४२१७४१३३५ या टोलफ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरीजा देसाई यांनी केले आहे.

