‘विभा अरविंद’ ग्रंथालयाचे थाटात उद्घाटन…
वाचनालय म्हणजे तरुण पिढीच्या भविष्याचा
राजमार्ग – डॉ तानाजीराव चोरगे
*’विभा अरविंद’ ग्रंथालयाचे थाटात उद्घाटन*
चिपळूण : समाजातील नवीन पिढी वाचन प्रक्रियेत येणे फार गरजेचे आहे. यासाठी वाचनालय चळवळ सुरू राहिली पाहिजे. सुसंस्कृत पिढी घडवण्यासाठी वाचनालये निर्माण होणे फार गरजेचे आहे. कारण वाचनालयातूनच तरुण पिढीच्या भविष्याचा रस्ता जातो, असे प्रतिपादन कृषीभूषण आणि साहित्यिक डॉ. तानाजीराव चोरगे यांनी व्यक्त केले.
चिपळूण शहरातील खेंड स्प्रिंग हॉस्पिटल येथे ‘विभा अरविंद वाचनालय’ रविवारी दि. 24 मे रोजी सुरू करण्यात आले आहे. या वाचनालयाचे उद्घाटन आमदार शेखर निकम, नगरसेवक अंकुश आवले आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री. चोरगे बोलत होते. कार्यक्रमात पुढे बोलताना डॉ. चोरगे म्हणाले की, कितीही वाचनालय सुरू केली तरी ती कमीच पडणार आहेत. प्रत्येक घराघरात वाचनाची आवड लागणे गरजेचे आहे. वाचन हे मेंदूचे अन्न आहे. त्याने आपले मस्तक सुधारते. नवीन पिढीचे आयुष्य सुसंस्कृत होण्यासाठी वाचनालयाची भूमिका महत्वाची आहे. पूर्वी वाचनालयाची संख्या जास्त होती. मात्र, आता जशा शाळा बंद होत आहेत. तशीच वाचनालय सुद्धा बंद होताना दिसतात. मोबाईलच्या युगात वाचन हरवले आहे. आताची पिढी घडवण्यासाठी जुन्या लोकांनी काय केले हे समजून घेताना त्यांची चरित्र वाचली पाहिजे. यावेळी त्यांनी आताच्या शिक्षण व्यवस्थेवर सुद्धा ताशेरे ओढले. आताची गुणवत्ता म्हणजे गुणांची खैरात आहे, त्यांनी सांगितले. यावेळी आ. शेखर निकम यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला ज्येष्ठ मार्गदर्शक प्रकाश देशमुख, माजी आमदार रमेशभाई कदम, नगरसेवक अंकुश आवळे, नगरसेविका नीलिमा जाधव, नगरसेवक निहार कोवळे, अजय भालेकर, नगरसेविका राणी महाडिक, लोस्टिमा कार्याध्यक्ष अरुण इंगवले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालय अध्यक्ष राष्ट्रपाल सावंत, विभा अरविंद ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रकाश काणे, प्रसाद प्रशांत डमढेरे, प्रसाद रिसबूड, डॉ. यतीन जाधव, डॉ. वैशाली जाधव, उदयशेठ गांधी, संतोष देशमुख, आदी मान्यवर उपस्थित होते. विभा अरविंद ग्रंथालय उद्घाटन झाल्यानंतर सर्वांनी डॉ. यतीन जाधव आणि परिवाराचे कौतुक केले. त्यांनी वाचनालयासाठी जागा देत आर्थिक योगदान सुद्धा दिले आहे. त्यामुळे हे वाचणालय निश्चितच आप्पांच्या कार्याचे प्रतीक असणार आहे. विभा अरविंद ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रकाश काणे यांनी वाचनालयाची निर्मिती कशी झाली याबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.जोशी आणि आभार प्रदर्शन विजय कदम यांनी केले.

