रात्री-अपरात्री फटाके फोडणाऱ्यांचे अभिनंदन!

*रात्री – अपरात्री फटाके फोडणाऱ्यांचे अभिनंदन!

 

रात्री – अपरात्री शोभेचे पण आवाज करणारे फटाके फोडणाऱ्या आणि त्याद्वारे वृद्ध, आजारी, लहान मुलं अशांसह सर्वच लोकांना त्रास देणाऱ्या ‘सुशिक्षित, समाजभान जपणाऱ्या मंडळींचे’ मनापासून अभिनंदन! त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. खरं तर तेच खरे ‘आदर्श’ नागरिक आहेत.

सर्वसाधारणपणे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकजण रात्री साडे दहा – अकरापर्यंत झोपेच्या अधीन होतात. (मोबाईलवर ओव्हरटाईम करणारे सोडून) आजारी असतील त्यांची समस्या वेगळीच असते. अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही एकाग्रतेचा विषय असतो. दिवसभर काम करुन, कष्ट करुन आलेल्यानाही वेळेवर आणि शांत झोप हवी असते. पण वरील सुशिक्षित आणि सुज्ञ मंडळींना हे मान्य नाही. त्यांना रात्री – अपरात्री फटाके फोडून सर्वांची झोपमोड करुन ऐतिहासिक कार्य करण्याची खुमखूमी असते.

हल्ली वाढदिवस रात्री बाराच्या नंतर लगेच धूमधडक्यात साजरा करण्याचे पेव फुटले आहे. त्यासाठी हे फटाके फोडून आणि झोपलेल्यांची झोपमोड करुन त्यांची दुसऱ्या दिवसाची ‘बोंब’ केली म्हणजे आपला वाढदिवस सत्कारणी लागला असा समज या मंडळींचा असावा. अशांचा खरं तर जाहीर सत्कार करायला हवा. लग्न सोहळ्यातही तेच. एका विशिष्ठ वेळेत सेलिब्रेशन ठीक आहे पण रात्री अपरात्री फटाके, स्पीकर, डीजेचा गोंगाट करुन लोकांच्या शिव्या खाऊन कसले सेलिब्रेशन करता?

खरं तर आजच्या धावपळीच्या, स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला ठराविक वेळेत शांत झोप मिळणे आवश्यक झाले आहे. आजार, इतर ताणतणाव यामुळे असंख्य लोकं निद्रानाशाचे शिकार होत आहेत. त्याचे दुष्परिणाम त्यांच्या एकंदर जीवनावर होत आहेत. अशावेळी आपण आपले लग्न सोहळे असतील, बारशी असतील, वाढदिवस असतील तर किमान दुसऱ्याला त्रास होणार नाही इतपत तरी काळजी घेतली पाहिजे ना… काळ वेळ पाळली पाहिजे ना…बाकीच्यांना त्रास देऊन स्वतःचा आनंद शोधणारे मनुष्य म्हणण्यालायकीचेच नाहीत.

 

मकरंद भागवत, पत्रकार, चिपळूण.

संपादक मकरंद भागवत

पत्रकारितेचा तीस वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक विषयांवर परखड भाष्य.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *