राष्ट्रवादी (SP)ची 24 मे रोजी चिपळूणला बैठक…

राष्ट्रवादी (SP)ची 24 मे रोजी चिपळूणला बैठक…

*जिल्हाध्यक्ष सुरेश उर्फ बारक्याशेट बने यांच्या नेतृत्वाखाली २४ मे रोजी चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची महत्त्वपूर्ण संघटन बैठक*

 

*प्रदेश निरीक्षक विजय देसाई व आमदार रोहित पाटील यांच्या उपस्थिती; नव्या पदनियुक्तींसह संघटन मजबुतीवर भर*

 

चिपळूण : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सुरेश उर्फ बारक्याशेट बने यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण तालुक्यात पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने रविवार, दिनांक २४ मे रोजी सकाळी १०.३० वाजता प्रांत कार्यालय शेजारील शिक्षक पतपेढी हॉल, हायवे, चिपळूण येथे महत्त्वपूर्ण संघटन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

 

राज्यातील महागाई, बेरोजगारी, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठवण्यासाठी पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात येणार असल्याची माहिती युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हा कार्याध्यक्ष अक्षय केदारी यांनी दिली.

 

रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सुरेश उर्फ बारक्याशेट बने यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात पक्ष संघटन नव्या जोमाने कार्यरत असून विविध आघाड्या, सेल व विभागांमध्ये नव्या पदनियुक्तीद्वारे संघटन अधिक गतिमान करण्यावर भर दिला जात आहे. या बैठकीत चिपळूण तालुकाध्यक्षपदी राजेश केळसकर, शहराध्यक्षपदी समीर दिवाकर देसाई, महिला तालुकाध्यक्षपदी अरुता अडविलकर तसेच महाराष्ट्र ओबीसी सेलच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी वासुदेव (वासुआप्पा) मेस्त्री यांच्या नियुक्तीची घोषणा अपेक्षित आहे.

 

अल्पसंख्यांक समाजामध्ये पक्षाची ताकद वाढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष रईस अलवी तसेच महिला शहराध्यक्ष रुक्सार अलवी यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते संघटन बांधणीत सक्रिय सहभाग घेत आहेत. त्याचप्रमाणे महिला जिल्हाध्यक्ष दीपिकाताई कोतवडेकर यांनीही चिपळूण विधानसभा मतदारसंघात महिला संघटन अधिक सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला असून नव्या महिला नेतृत्वाला संधी देण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. महिला तालुकाध्यक्ष पदासाठी सक्षम नेतृत्व शोधून संघटन उभारणीमध्ये त्यांनी मोलाची भूमिका बजावली असल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगितले जात आहे.

 

या बैठकीच्या आयोजनासाठी महिला पदाधिकारी, माजी नगरसेवक, विविध सेलचे पदाधिकारी, युवक कार्यकर्ते तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी पुढाकार घेतला आहे. युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हा कार्याध्यक्ष अक्षय केदारी यांनी युवकांमध्ये पक्ष संघटन वाढवण्यासाठी सातत्याने सक्रिय भूमिका घेतली असून नव्या युवकांना पक्षाशी जोडण्याचे काम प्रभावीपणे सुरू ठेवले आहे. युवकांमध्ये नव्या प्रेरणास्त्रोताच्या रूपात त्यांच्याकडे पाहिले जात असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.

 

तसेच सेवादलचे जिल्हाध्यक्ष शेख साहेब, सामाजिक न्याय विभागाचे महेंद्र कदम साहेब, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुजाताई तांबे, निलिमताई भुवड तसेच शरद पवार साहेबांच्या विचारांशी एकनिष्ठ राहून कार्य करणाऱ्या विविध ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्त्यांचेही या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मोलाचे सहकार्य लाभले असल्याची माहिती आयोजकांतर्फे देण्यात आली.

 

आगामी नगरपरिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन अधिक सक्षम करण्यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

 

“विधानसभा निवडणुकीनंतरही पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साह कायम असून शरद पवार साहेबांच्या विचारांशी एकनिष्ठ राहून पदाधिकारी नव्या उमेदीने काम करत आहेत. जिल्हाध्यक्ष सुरेश उर्फ बारक्याशेट बने यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी जिल्ह्यात पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक वातावरण आहे,” असा विश्वास अक्षय केदारी यांनी व्यक्त केला.

 

या बैठकीला पक्षाचे प्रदेश निरीक्षक तथा रत्नागिरी जिल्ह्याचे निरीक्षक विजय देसाई, महिला जिल्हाध्यक्ष दीपिकाताई कोतवडेकर, विविध सेल व आघाड्यांचे जिल्हाध्यक्ष, सेवादल, सामाजिक न्याय विभागाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. दिवंगत नेते तथा माजी गृहमंत्री आर. आर. पाटील (आबा) यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणारे युवा नेते आमदार रोहित पाटील उपस्थित राहणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

 

चिपळूण तालुका व शहरातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक, महिला आघाडी, शेतकरी, व्यापारी तसेच शरद पवार साहेबांच्या विचारांवर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. बैठकीनंतर सर्व उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहितीही देण्यात आली.

संपादक मकरंद भागवत

पत्रकारितेचा तीस वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक विषयांवर परखड भाष्य.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *