‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’- पिंपळी येथे कार्यशाळा!

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’- पिंपळी येथे कार्यशाळा!

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानासाठी सर्वांनी

        एकजुटीने काम करावे : विनोद झगडे

      * जनजागृतीसाठी जर्नालिस्ट असोसिएशनचा पुढाकार *

पिंपळी ग्रामपंचायत कार्यालयात जनजागृती कार्यशाळा उत्साहात

 

चिपळूण : माझं गाव आरोग्यसंपन्न गाव या शासनाच्या महत्त्वाकांक्षी अभियानासाठी जर्नालिस्ट असोसिएशन चिपळूणने जनजागृती कार्यशाळा आयोजित करून पुढाकार घेतल्याबद्दल जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य सभापती तथा विद्यमान पंचायत समिती सदस्य विनोद झगडे यांनी कौतुक केले. ही योजना केवळ बक्षीसापुरती मर्यादित न राहता ती लोकचळवळ बनली पाहिजे. लोकप्रतिनिधी, पत्रकार, नागरिक आणि आरोग्य विभाग यांनी एकत्रितपणे काम केल्यास चिपळूण तालुका या अभियानात निश्चितच सरस ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

प्राथमिक आरोग्य केंद्र दादर आणि जर्नालिस्ट असोसिएशन चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळी ग्रामपंचायत कार्यालयात माझं गाव आरोग्य संपन्न गाव, अभियानाच्या जनजागृतीसाठी आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते.

 

कार्यक्रमास कामथे उपजिल्हा रुग्णालयाच्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. कांचन मदार, जर्नालिस्ट असोसिएशन चिपळूणचे अध्यक्ष सुनील साळवी, कार्याध्यक्ष सतीश कदम, पंचायत समिती सदस्य सुप्रिया देवरुखकर, सरपंच अंजली जांभुर्गे, दादर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समुदाय आरोग्य अधिकारी प्रज्ञा यादव, जिजाऊ ब्रिगेडच्या मिलन गुरव, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र सागवेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधा गुंजाळ, माजी सरपंच मीनाक्षी कोठारे, तंटामुक्त समिती अध्यक्षा सुषमा कोठारे, पोलीस पाटील दिपाली बाबर, ग्रामसेवक श्री. कदम, आरोग्य सहाय्यक अभिजित यादव, राजेंद्र मोलाज आदी मान्यवर उपस्थित होते.

 

यावेळी ज्येष्ठ पत्रकार, अध्यक्ष सुनील साळवी, कार्याध्यक्ष सतीश कदम, ज्येष्ठ पत्रकार मकरंद भागवत, सरपंच अंजली जांभुर्गे आणि डॉ. सुधा गुंजाळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

 

डॉ. कांचन मदार यांनी माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानाची पंचसूत्री सांगताना स्वच्छता, शुद्ध पाणी, वैयक्तिक आरोग्याची काळजी आणि प्रतिबंधात्मक आरोग्य यांचे महत्त्व पटवून दिले. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, असे सांगत त्यांनी प्रत्येकाने आपल्या गावाला आरोग्यदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. माझा आरोग्य मी चांगले राखेन, अशा आशयाची शपतही त्यांनी उपस्थित त्यांना दिली.

 

विनोद झगडे यांनी अभियान लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली. आपल्या गावाला या अभियानात पुरस्कार मिळवून देण्यासाठी सर्वांनी जबाबदारीने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश बांडागळे यांनी केले, तर आभार संतोष पिलके यांनी मानले.

 

कार्यशाळेला पत्रकार ललेश कदम, ओंकार रेळेकर यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी, आशा सेविका, ग्रामस्थ आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादक मकरंद भागवत

पत्रकारितेचा तीस वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक विषयांवर परखड भाष्य.

Related articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *