‘ मा.’ च्या मोठेपणाची हौस!
*’ * मा.’ च्या मोठेपणाची हौस! **
मकरंद भागवत, पत्रकार, चिपळूण.
मो. 9850863262
हा विषय फार गंभीर आहे असं नाही. त्याचा समाजावर काही फरक पडत नाही हेही खरं. मात्र आपल्याकडचे राजकीय नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना खोट्या मोठेपणाची किती हौस आहे याचे दर्शन घडवणारा हा ‘ मा. ‘ आहे. हा साधसुधा मा. नाही. या एका अक्षरासाठी नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते हे स्वतःला फसवत असतातच पण, जनमताचाही अनादर करत असतात. अर्थात हे फॅड हल्ली काही वर्षांत आले आहे. राजकारणात प्रत्यक्ष कामापेक्षा दिखाऊपणाला जेव्हापासून चांगले दिवस आलेत तेव्हापासून हा मा. महत्वाचा ठरू लागला आहे. तो जीव की प्राण बनला आहे.
तर विषय असा आहे की, राजकारणात पदं येतात जातात. गल्लीपासून दिल्लीपर्यंत हे चालूच असतं. मग कोणी माजी मंत्री, माजी खासदार, माजी आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती- सदस्य, पंचायत समिती सभापती- सदस्य, ग्रामपंचायत सरपंच- सदस्य, वेगवेगळ्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, इतर पदाधिकारी, जिल्हा, तालुका, गाव पातळीवरील पदाधिकारी अशा अनेक प्रकारचे राजकारणी आपल्याभोवती वावरत असतात. चमच्यांना त्यांचे कौतुक फार असते. घरी इकडची काडी तिकडे न करणारे या पुढऱ्यांच्या पाठीपुढे गोंडा घोळत असतात. कोणी चप्पल सांभाळतोय, कोणी नॅपकिन, कोणी मोबाईल, कोणी गॉगल सांभाळतोय. अनेकांना साहेबाच्या गाडीचं दार आपणच उघडतो याचाही अभिमान असतो. असे कार्यकर्ते भेटले तर नेत्यांचे काय जातंय…मज्जाच!
पण या सर्व भानगडी करण्यात राजकारण फार ‘चीप’ झालंय. गेल्या दहा – बारा वर्षांत मी एक गोष्ट कायम पाहतोय ती म्हणजे जो मंत्री, आमदार, पदाधिकारी माजी झालेला असतो, लोकांनी किंवा पक्षाने घरी बसवलेला असतो ते सर्वजण स्वतःच्या नावामागे माजी लावत नाहीत. तर केवळ मा. लावतात. माननीय माजी मंत्री, आमदार किंवा जे काही आधीचे पद असेल ते तसंच लिहिलं तर काय बिघडते… त्यात कसला कमीपणा आलाय… पण खोटी प्रतिष्ठा हवी, खोटा मोठेपणा हवा असल्यामुळे असली लबाडी केली जाते. एकाच मतदारसंघात अनेक मा. खासदार, मा. आमदार म्हणून मिरवतात. जे विद्यमान मंत्री, खासदार, आमदार किंवा इतर पदाधिकारी असतील त्यांच्या नावामागे मा. (माननीय ) म्हणून लावला तर कळतं. पण विद्यमान नसलेलेही नावामागे फक्त मा. लावतात. त्यामुळे एकेका भागात अनेक खासदार, आमदार असल्यासारखं वाटते. मा. माजी मंत्री, खासदार, आमदार असं स्पष्ट लिहिलं तर काय मोठं नुकसान होतं हे त्यांना आणि त्यांच्या चमच्यांनाच माहित. इतर बारीकसारीक पदाधिकारी पण याच पंथाचे! खोट्या मोठेपणाचे अनुयायी!!
असो. पूर्वीचे राजकीय नेते, लोकप्रतिनिधी यांच्याशी आत्ताच्या मंडळींची तुलना करण्यात अर्थ नाही. आताचे युग दिखाऊपणाचे, काम कमी प्रसिद्धी जास्त, फोटोचं, रिल्स याचं आहे. विकास झाला नाही तरी चालेल (जनतेचा ) पण मोठेपणात, खोटी आश्वासने देण्यात एकमेकांशी स्पर्धा जोरात आहे. कुरघोडी, षडयंत्र करणारा यशस्वी राजकारणी असतो. याला कोणताही पक्ष अपवाद नाही. काम कमी आणि बॅनरवर मोठेपणा हे आजचे तंत्र आहे. यात बदल होण्याची शक्यता निदान नजिकच्या काळात तरी नाही. ‘मा.’ चं पण तसंच आहे!
ता. क. – वरील मुद्दा लक्षात येण्यासाठी मुद्दाम त्यांच्या गाड्यांवरच्या, घर – ऑफिसच्या पाट्या जरूर बघा. कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका आवर्जून बघा. मा. तला खोटा मोठेपणा नक्की दिसेल. आत्ता नुसता मा. लावतायत पुढे भावी म्हणून ‘भा.’ पण लावू शकतात नावामागे.

