कोकणात सुरु होतोय जलवाहतुकीचा नवा अध्याय!

*कोकणात सुरू होतोय जलवाहतुकीचा नवा अध्याय; १ मार्चपासून सुरू होणार मुंबई ते विजयदुर्ग रो-पॅक्स फेरी सेवा*

                  मंत्री ना. नितेश राणे यांची मोठी घोषणा

 

मुंबई : देशात जलवाहतुकीला प्रोत्साहन देण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी दृष्टिकोनाला अनुसरून आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली, राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी कोकण किनारपट्टीवर मुंबई ते विजयदुर्ग (जि. सिंधुदुर्ग) दरम्यान १ मार्च पासून रो-पॅक्स प्रवासी फेरी सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. या नवीन सुविधेमुळे मुंबई आणि कोकण दरम्यान सागरी मार्गाने जलद, आरामदायी व आनंददायी प्रवास उपलब्ध होणार आहे.

महाराष्ट्र सागरी मंडळाने या मार्गावर फेरी सेवा चालवण्यासाठी ‘एमटूएम फेरीज् प्रा.लि.’ या प्रदीर्घ अनुभव असलेल्या संस्थेला परवानगी दिली असून, ही संस्था सध्या मुंबई ते मांडवा दरम्यान यशस्वीपणे सेवा देत आहे.

या सेवेसाठी ‘एम२एम प्रिन्सेस’ हे आधुनिक व सर्व सुविधायुक्त जहाज चालविले जाणार असून, एका फेरीमध्ये ६२० प्रवासी व ३५ वाहने वाहून नेण्याची या जहाजाची क्षमता आहे. या सेवेद्वारे अवघ्या ६ ते ७ तासांत मुंबईहून विजयदुर्ग येथे पोहोचता येणार आहे. या सुविधेचा उद्घाटन सोहळा १ मार्च २०२६ रोजी सकाळी ८:०० वाजता फेरी व्हार्फ, मुंबई येथून मंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होईल.

या फेरी सेवेचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून, मुंबईहून दर बुधवारी व शनिवारी सकाळी ८:०० वाजता प्रस्थान होईल, तर विजयदुर्गहून दर गुरुवारी व रविवारी दुपारी १२:०० वाजता जहाज सुटेल. प्रवासासाठी इकॉनॉमी क्लासचे भाडे ३,००० रुपये, प्रीमियम इकॉनॉमी ५,००० रुपये, बिझनेस क्लास ७,००० रुपये आणि फर्स्ट क्लाससाठी ९,००० रुपये आकारले जातील.

वाहनांच्या वाहतुकीसाठी दुचाकीचे भाडे १,००० रुपये, सायकल ६०० रुपये, तर कारसाठी त्यांच्या आकारानुसार ७,००० ते ९,००० रुपयांपर्यंत भाडे असेल.

कोकणातील सणासुदीच्या काळात रेल्वे आरक्षणाची अडचण आणि रस्ते वाहतुकीतील कोंडी लक्षात घेता ही सेवा कोकणवासीयांसाठी मोठा दिलासा ठरेल. यामुळे पर्यटन, व्यापार आणि प्रादेशिक संपर्काला नवी गती मिळेल, अशी अपेक्षा मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केली आहे. या फेरी सेवेसाठी तिकीट विक्री सुरू झाली असून, नागरिक www.m2mferries.com या संकेतस्थळावर जाऊन बुकिंग करू शकतात.

ना. नितेश राणे यांच्या या घोषणेमुळे महाराष्ट्रात जलवाहतुकीचा नवा अध्याय सुरू होणार असून देशातील दळणवळण अधिक मजबूत होण्याच्या दृष्टीने ना. राणे यांनी उचललेले हे महत्त्वाचे पाऊल आहे.

संपादक मकरंद भागवत

पत्रकारितेचा तीस वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक विषयांवर परखड भाष्य.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *