देवेंद्रजींची समयसूचकता!

*प्रचारसभा आणि देवेंद्रजींची समयसूचकता!*

मकरंद भागवत, पत्रकार, चिपळूण.

मो. 9850863262

 

सरकारमधील वरिष्ठ सहकारी, दिलदार मित्र आणि खऱ्या अर्थाने कामाचा माणूस असलेल्या अजितदादा यांच्या अकाली जाण्याने मुख्यमंत्री देवेंद्रजी यांना खूप मोठा धक्का बसला आहे. एक माणूस म्हणून त्यांची मनस्थिती, दुःख आपण जाणू शकतो. परंतु शेवटी राज्याचा प्रमुख, सार्वजनिक आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गज नेता म्हणून मनातलं दुःख लपवून त्यांना आपलं कर्तव्यही पार पाडणे आवश्यक ठरते. तरीही त्यांनी दोन दिवसांपूर्वी घेतलेला एक निर्णय त्यांची समयसूचकता, दादांविषयी असलेलं प्रेम, आदर दाखवून देतो. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार रंगात येत असतानाच काळाने घाला घातला आणि संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला. खरं तर 28 रोजी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी कोकण दौऱ्यावर येणार होते. चिपळूण येथे त्यांची भव्य सभा होणार होती. भाजप सेनेच्या कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण होते. विशेषतः भाजपला कोकणात बूस्टर देण्यासाठी म्हणून ही सभा महत्वाची होती. तिकडे स्वतः अजितदादा बारामती दौऱ्यावर होते. महानगरपालिका निवडणुकीतील अपयशाने खचून न जाता त्यांनी राष्ट्रवादीला पुन्हा भक्कम करण्यासाठी, ग्रामीण भागात आपली ताकद सिद्ध करण्यासाठी प्रचारदौरे सुरु केले होते. त्याच दिवशी एकनाथजी शिंदे परभणी दौऱ्यावर प्रचारासाठी जाणार होते. पण, नियतीने सर्व नियोजन उध्वस्त केले. देवेंद्रजी आणि एकनाथजीनी आपला सहकारी गमावला आणि त्याचबरोबरीने महाराष्ट्रातील निवडणूक प्रचारही थंडावला.

खरं तर स्वतः मुख्यमंत्री राज्यभर 27 सभा घेणार होते. मात्र दुःखाचा प्रसंग लक्षात घेऊन, समयसूचकता पाळून त्यांनी संपूर्ण प्रचारदौरा रद्द केला आहे. त्याबद्दल ते अभिनंदनास पात्र आहेत. कारण भाजप शिवसेनेचा प्रचार करताना त्यांना बहुतांश ठिकाणी अजितदादांच्या राष्ट्रवादी विरोधातच बोलावं लागलं असतं. जे महानगरपालिका निवडणुकीत झालं तशीच राजकीय परिस्थिती या निवडणुकीत निर्माण झालेली आहे. राज्यात सरकारमध्ये मांडीला मांडी लावून बसणारे स्थानिक निवडणुकीत मात्र एकमेकांविरोधात ठाकले आहेत. त्यामुळे आरोप – प्रत्यारोप होत राहणार नक्की. पण हे सर्व अजितदादा हयात असताना ठीक होतं. आता अजितदादा अकाली गेल्यावर त्यांच्याच पक्षाविरोधात बोलणं, प्रचार करणं योग्य ठरणार नाही त्याचबरोबर जनतेचा मूडही प्रचारसभाना प्रतिसाद देण्याचा वाटत नाही. कारण राजकारण काही चालू दे… सर्वसामान्य माणूस अजूनही दादांसाठी हळहळतो आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी संपूर्ण प्रचार दौरा रद्द करण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे असे वाटते. त्यांचे अजितदादा यांच्याविषयी असलेले मित्रत्वाचे नाते सिद्ध करणारे आहे. राजकीय नेतृत्वातील पोक्तपणा दाखवून देणारा आहे.

 

*ता. क. – या सर्व पार्श्वभूमीवर मनाने संवेदनशील असलेले, सामान्य माणसात कार्यकर्ता म्हणून मिसळणारे, काम करणारे एकनाथजी शिंदे यांची चिपळूण येथे जाहीर सभा होते आहे. त्यात ते शिवसेना – भाजप उमेदवारांचा प्रचार करणार असले तरी तालुक्यात त्यांचा प्रमुख विरोधक दादांचाच राष्ट्रवादी आहे. ही बाब महत्वाची आहे. चिपळूण तालुक्याचा विचार केला तर आमदार शेखर सर आणि अजितदादा यांचे केवळ राजकीय नाही तर कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध होते. शेखर सर हे त्यांचे लाडके आमदार होते. सर सांगतील ती विकासकामे करण्यासाठी दादांनी निधीसाठी कधी हात आखडता घेतला नाही. चिपळूण शहरातच नव्हे तर तालुक्यातील असंख्य विकासकामांसाठी, प्रश्न सोडवण्यासाठी दादांची भूमिका महत्वाची ठरली आहे. अशावेळी शिवसेना – भाजप युतीचा प्रचार हा नाही म्हटलं तरी शेखर सरांच्या विरोधातला आणि त्याअनुषंगाने दादांच्या विरोधातला प्रचार ठरणार. कारण खरी लढत ही युती आणि राष्ट्रवादी दादा गट यातच आहे. पालिका निवडणुकीत अपयश आल्यामुळे स्वतः शेखर सरांना जिल्हा परिषद, पंचायत समितीत आपली ताकद सिद्ध करावी लागणार आहे. जास्तीत जास्त यश मिळवून दादांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली द्यायची आहे. त्यामुळे एकनाथजी शिंदे यांची प्रचारसभा युतीच्या फायद्याची ठरते की दादांविषयी सर्वसामान्य जनतेत असलेल्या भावनेमुळे नुकसानीची ठरते हे 9 फेब्रुवारीला कळेल.*

संपादक मकरंद भागवत

पत्रकारितेचा तीस वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक विषयांवर परखड भाष्य.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *