हाय व्होल्टेज लढती आणि नेत्यांची प्रतिष्ठा!
( इलेक्शन – विलेक्शन )
*हाय व्होल्टेज लढती आणि नेत्यांची प्रतिष्ठा*
(चिपळूण तालुका )
मकरंद भागवत, पत्रकार, चिपळूण.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार एकदम अंतिम टप्प्यात आला आहे. अजितदादांच्या अकाली मृत्यूने पाच- सहा दिवस सर्वपक्षीय प्रचार थंडावला होता. मात्र, आता शेवटचे दोन दिवस उरले असताना प्रचाराला वेग आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चिपळूण येथे महायुतीच्या प्रचारार्थ जाहीर सभा मोठ्या प्रतिसादात पार पडली. एकनाथ शिंदे यांच्या येण्याने युतीचा विजय निश्चित असल्याचे मानले जाते. शिवसेना – भाजप – रिपाईचे चिपळूण तालुक्यातील जिप व पंस च्या उमेदवारांचा आत्मविश्वास उंचावला आहे. त्याचवेळी नगरपालिकेप्रमाणेच राष्ट्रवादी दादा गट आमदार शेखर निकम यांच्या नेतृत्वाखाली युतीविरोधात दंड थोपटून उभा आहे. या स्थानिक पातळीवरच्या महत्वाच्या निवडणुका लढवायच्या असतात हे राष्ट्रीय पातळीवरील पक्ष असलेल्या काँग्रेसच्या गावीही नाही. मुळात या निवडणुका सुरु आहेत याची जाणीव तरी त्यांना आहे का असा प्रश्न पडावा अशी शोचनीय परिस्थिती आहे. भाजपवाले सदासर्वदा ‘ इलेक्शन मोड ‘ मध्ये असतात. याउलट काँग्रेसचे आहे. ते आपापसात ‘भांडण्याच्या मूड’मध्ये असतात. कसा पक्ष वाढणार? कसे कार्यकर्ते तयार होणार? जुनी खोडं उगाचच जागा अडवून बसलेली दिसतात तर धडाडीच्या जिल्हाध्यक्ष सोनललक्ष्मी या निवडणुकीत कुठेच दिसलेल्या नाहीत.
शरद पवार गटाचीही हिच दयनीय परिस्थिती आहे. रमेशभाईंच्या रूपातील माणूसच तुतारी टाकून गेल्याने या निवडणुकीत तुतारी वाजलीच नाही. त्यातल्या त्यात उद्धव ठाकरे गटाची उपस्थिती तरी दिसते आहे. मात्र पक्षातील नेते, पदाधिकारी यांच्यातच एवढा बेबनाव आहे की त्यामुळे उमेदवार आणि मतदारही सरबरीत झाले आहेत. विनायक राऊत आणि भास्करराव जाधव यांच्यातला ‘ताळमेळ’ कौतुकास्पद आहे. विधानसभा क्षेत्राध्यक्ष बाळा कदम संपूर्ण चिपळूण – संगमेश्वर पिंजून काढू शकतात, उमेदवार निवडून आणू शकतात, पण नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीपासून त्यांची बॅटरी डाऊन झाली आहे. ती पुन्हा केव्हा चार्ज होईल हे माहिती नाही. उबाठाचे उमेदवार आपापल्या जीवावर निवडणूक लढवत आहेत.
राजकीय पक्षांची सर्वसाधारण परिस्थिती वरीलप्रमाणे आहे. मात्र त्याचवेळी विविध नेत्यांची प्रतिष्ठा आणि भवितव्यही पणाला लागले आहे. माजी आमदार आणि शिवसेना उपनेते सदानंद चव्हाण नगरपालिका निवडणुकीपासून सक्रीय झाले. त्यात यश मिळाल्यावर त्यांचा उत्साह अधिक वाढला. त्यांनी मधल्या काळात जुन्या पण इकडे तिकडे गेलेल्या शिवसैनिकांना साद घातली. सर्वांचे नेतृत्व करण्याची तयारी दाखवली. त्याच उत्साहाच्या जोरावर ते या निवडणुकीला सामोरे जात आहेत. पंचायत समितीवर भगवा फडकला की त्यांचे वजन वाढेल. एकनाथ शिंदे यांनीही चिपळूणच्या सभेत चव्हाण यांना मोठी जबाबदारी देण्याचे सुतोवाच केले आहेच. सदानंद चव्हाण निवडणुकीनंतरही असेच सक्रीय राहिले तर भविष्यात विधानसभा स्वतंत्र लढविण्याची वेळ आलीच तर ते तयार असतील.
आमदार शेखर निकम यांच्यासाठी तर ही निवडणूक ‘करो या मरो’ अशीच आहे. सत्तेत असूनही त्यांना आज आपल्याच मित्रांविरोधात लढावे लागत आहे. नगरपालिकेत तेच झाले. आमदार म्हणून चिपळूण शहरात मोठी विकासकामे करुन आणि संपर्क असूनही सरांना अपेक्षित यश मिळाले नाही. उलट अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांना या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत ग्रामीण भागातील वर्चस्व सिद्ध करावे लागेल. या निवडणुकीतील यशापयश त्यांची भविष्यातील राजकीय वाटचाल निश्चित करेल.
भाजपकडून ज्येष्ठ नेते पी. बी. यादव यांनाही चिपळूण पालिकेतील यशाची परंपरा कायम राखण्यासाठी मेहनत घ्यावी लागत आहे. त्यांना पक्षात मोठे पद मिळायचे असेल तर या निवडणुकीत यश मिळवण्याची गरज आहे. पक्षाचे उमेदवार निवडून आणायचे आहेतच, पण घरातल्या उमेदवार सौ. नैना पवार तसेच खेर्डीतील स्वतःच्या गावातील उमेदवार विनोद भुरण यांना निवडून आणण्याचा दबाव त्यांच्यावर असणार आहे.
भाजपचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनी लढाऊ वृत्ती दाखवून, पक्षाकडे आग्रह धरून आपल्या सौभाग्यवती रावी यांना थेट राष्ट्रवादीच्या मातब्बर उमेदवार दिशा दाभोळकर यांच्याविरुद्ध मैदानात उतरवले आहे. त्यामुळे सतीश मोरे यांना जिल्ह्यातले भाजप उमेदवार निवडून आणायचे आहेतच पण स्वतःच्या पत्नीलाही निवडून आणावे लागणार आहे. रावी मोरे यांच्या आव्हानामुळे दशरथ आणि दिशा दाभोळकर यांना निवडणूक लढण्यात वेगळाच आनंद मिळत असेल. विनोद भुरण यांच्यामुळे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आणि सुनील तटकरे, शेखर सर यांचे अगदी विश्वासू अबूशेठ ठसाळे यांचीही प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. मागील विधानसभा निवडणुकीत तुतारीचे तत्कालीन उमेदवार पी. बी. यादव यांना दशरथ आणि अबू यांनी चांगलीच ठसण दिली होती. तरीही यादव यांना खेर्डीत मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे खेर्डीच्या रणात दशरथ, दिशा, अबू, विनोद यांच्यामुळे निकम आणि यादव यांच्यातील सुप्त संघर्षही रंगणार आहे.
तिकडे सावर्डेत खुद्द आमदार सौभाग्यवती आणि माजी सभापती सौ. पूजा निकम आणि मशाल विझवून धनुष्यबाण हाती घेतलेल्या माजी सभापती सौ. धनश्री शिंदे आमनेसामने आहेत. सावर्डेचा गड मोठ्या मताधिक्याने राखणे आमदार म्हणून शेखर सरांसाठी ते कितीही नाही म्हटले तरी आवश्यक आहे. दसपटी ही आपली कर्मभूमी, कर्तृत्वभूमी असूनही आणि येथून कार्यकर्त्यातून प्रचंड आग्रह होत असतानाही सौ. धनश्री यांनी एकदम नवख्या मतदारसंघात आपले कर्तृत्व सिद्ध करण्याचा निर्धार केला आणि थेट पूजा निकम यांना त्यांच्याच होम पिचवर आव्हान दिले आहे.
चिपळूण तालुक्यात प्रामुख्याने सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे ते खेर्डी जि. प. गट आणि पं. स. गण, सावर्डे जिल्हा परिषद गट, शिरगांव पंचायत समिती गण येथे. कारण नेत्यांची प्रतिष्ठा येथे या ना त्या कारणाने पणास लागली आहे.

