सत्तापिपासू राजकारण!
*सत्तापिपासू राजकारण !*
मकरंद भागवत, पत्रकार, चिपळूण.
मो. 9850863262
गेल्या काही वर्षांत आपल्याकडचे दिल्लीपासून ते अगदी गल्लीपर्यंतचे राजकारण हे सत्तापिपासू नेत्यांच्या, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या हातात गेले आहे. सत्तेतून संपत्ती, वर्चस्व मिळवता येते हे माहिती झाल्यापासून मोठ्यांपासून छोट्यापर्यंत जो तो कुरघोडीचे, कट – कारस्थानांचे, दादागिरीचे, पैशाचे, फोडाफोडीचे राजकारण करण्यात धन्यता मानत आहे. पक्ष बदलणाऱ्यांनी तर ऊत आणला आहे. सरड्याला रंग बदलायला जेवढा वेळ लागत असेल त्यापेक्षाही कमी वेळात निष्ठा, विचारधारा बदलली जाते आणि निर्लज्जपणे त्याचे समर्थन केले जाते. त्याला नैतिकतेची, प्रामाणिकतेची जोड दिली जाते. कधी ज्यांचे कपडे फाडले त्यांच्याच अंगावर कौतुकाच्या शाली घातल्या जातात तर कधी याउलटही होते. हल्ली पक्षप्रवेश किंवा बदल हा काही विचारांचे खरोखर परिवर्तन झाले म्हणून किंवा मला सत्ता – संपत्तीचा मोह नाही केवळ समाजसेवा करायचीय यामुळे होत नाही. सध्या तर ईडीच्या नावावर किंवा भीतीवर पक्षप्रवेश होत आहेत. (मला वाटतं कोणी ‘ईडी’ या नावाने पक्ष काढला तरी 75/80 टक्के राजकारणी त्यात जातील) जसे नेते तसे कार्यकर्ते. ते पण इकडून तिकडे फिरत असतात. आणि वैशिष्ट्य म्हणजे त्या पक्षातले मूळ कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते बाजूला फेकले जातात आणि नव्याने आलेले उपटसुम्भ त्या पक्षाचे बिनीचे शिलेदार होतात, मिरवतात, सत्तेचा लाभ घेतात. बाटगा हा नेहमीच आपण कडवट असल्याचे दाखवत असतो तसंच काहीसं इथे दिसतं. आजकाल सर्वपक्षीय मोठ्या नेत्यांनाही केवळ सत्ता कशी मिळेल, कशी टिकेल एवढीच चिंता असते. त्यासाठी उलटसुलट काहीही उपदव्याप केले जातात.
अशा राजकारण्यांना (गल्ली ते दिल्ली) चाणक्याची उपमा दिली जाते. काहीतर या सर्व कट – कारस्थानांना, डावपेचाना थेट कृष्णनितिशी जोडतात. जोडतात पण ते एक विसरतात, भगवान श्रीकृष्ण धर्माचे राज्य प्रस्थापित करू इच्छित होते. त्यांना स्वतःला काही हवे होते म्हणून नाही. आत्ताचे राजकारणी ना धर्माचे राज्य स्थापू इच्छित ना स्वतःला त्यापासून वेगळे ठेऊ इच्छित. त्यांना केवळ येनकेनप्रकारे सत्ता, संपत्ती, सात पिढ्याचं भलं यात इंटरेस्ट आहे. ते संधीसाधूच नव्हे तर सत्तापिपासू आहेत असं ठामपणे सांगावं वाटतं. सत्तेत किंवा पदावर असून अगदी गरीब नको पण किमान मध्यमवर्गीय राहिलेला राजकारणी भिंग घेऊन शोधावा लागेल. आलिशान बंगले हवेत, गाड्या हव्यात, नोकरचाकर हवेत, चमचे हवेत, भ्रष्टाचारतज्ज्ञ अधिकारी – कर्मचारी हवेत… एकीकडे गरीब अधिक गरीब होतोय, शेतकरी आत्महत्या करतोय आणि यांच्या प्रॉपर्टी वाढतायत.. यांच्याच शेतीत, डेअरीत, सूतगिरणीत, शेळ्या – कोंबडी पालनात, उद्योगात फायदा होतोय…खरंच चमत्कार आहे! शेतकरी कर्जमाफी, सबसिडी याचा सर्वात मोठा फायदा या पुढऱ्यांनाच होतो. एकीकडे सरकार मग ते कोणत्याही पक्षाचे असो नुसतं काटकसर म्हणतं पण मंत्री, अधिकारी यांच्या बंगले, दालनांच्या सुशोभीकरणावर वारंवार करोडो रुपये खर्च होतात त्याची लाज वाटत नाही. निम्मं पोलीस दल जनतेच्या रक्षणाऐवजी यांच्या मागेपुढे फिरतंय… कसला एवढा धोका आहे यांना? सगळी शोबाजी आणि बढेजाव.. बाकी काही नाही. असो. आहे यात बदल होण्याची सूतराम शक्यता नाही. जशी प्रजा तसा नेता! आज कोणताही पक्ष खात्रीचा राहिलेला नाही, विश्वासाचा राहिलेला नाही एवढं मात्र खरं.
*ता. क. – अजितदादांसारखा कामाचा माणूस अकाली गेला. सर्वांच्याच मनाला चटका लावून गेला. त्यांचे अंत्यविधीचे सर्व संस्कार होतात न होतात, पवार कुटुंब, महाराष्ट्र दुःखातून सावरत नाही तोच परवा रात्रीपासून राजकीय घडामोडीना वेग आला (खरं तर ऊत आला ) आणि काल संध्याकाळी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथही घेतली. त्यांनी काळजावर दगड ठेऊन, मन घट्ट करुन पक्षासाठी, कार्यकर्त्यासाठी हा निर्णय घेतला असेल. त्यांना दादांचे विकासाचे स्वप्नं पूर्ण करण्याचे बळ मिळो. पण…
पण जी घाई झालेली दिसते त्याचे समर्थन करताना असं सांगितलं जातंय की आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते इकडे तिकडे जाऊ नयेत यासाठी नेतृत्व करण्याची गरज होती. पण मला अजूनही एक गोष्ट कळत नाही की दादांवर एवढी निष्ठा होती, विश्वास होता तर ही मंडळी दादांच्या निधनानंतर तीनचार दिवसांत इकडे तिकडे कशी जाऊ शकतात? यांची दादांवर निष्ठा, प्रेम खरे की खोटं म्हणायचं? आज सरकार स्थीर आहे, देवेंद्रजी खंबीर आहेत, राष्ट्रवादीचे बाकी मंत्री कामं करतायत असं असताना आठ दहा दिवसांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे सूत्र देता आली असती. आठ दिवसांत इतकं मोठं आभाळ कोसळणार नव्हतं. पण, जाणारा गेला…शेवटी सत्ता महत्वाची हा धडा यातून जनतेला मिळाला. आपल्या देशातील राजकारण सत्तापिपासू झालंय याचा हा ढळढळीत पुरावाच म्हटला पाहिजे.

