Twj चा मालक समीर नार्वेकरला अटक…

महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आर्थिक घोटाळेबाजाला अखेर बेड्या; TWJ कंपनीचा मालक समीर नार्वेकर पत्नीसमवेत अटकेत

ठाणे :

महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांपासून ते राज्यातील बडे राजकारणी, मंत्री-आमदार तसेच प्रशासनातील आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावणाऱ्या TWJ कंपनीच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. TWJ कंपनीचा मालक व व्यवस्थापकीय संचालक समीर नार्वेकर, त्याची पत्नी नेहा नार्वेकर आणि संचालक अमीत पालम या तिघांना ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने शुक्रवारी अटक केली आहे.

राज्यात मोठ्या प्रमाणात चर्चेत असलेल्या या आर्थिक फसवणूक प्रकरणात TWJ कंपनीने विविध योजनांच्या माध्यमातून नागरिकांना मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले होते. मात्र काही काळानंतर कंपनीने अचानक व्यवहार बंद करून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले.

रत्नागिरीतून सुरुवात, आता मुख्य आरोपीही गजाआड

या प्रकरणात काही दिवसांपूर्वी रत्नागिरी पोलिसांनी TWJ कंपनीचा संचालक संकेश घाग याला अटक केली होती. त्यानंतर तपासाला गती मिळाली आणि आता कंपनीचा प्रमुख समीर नार्वेकर व त्याची पत्नी नेहा नार्वेकर यांनाही अटक झाल्याने या घोटाळ्याचा अधिकृत आकडा समोर येण्याची शक्यता आहे.

राज्याबाहेर पलायन, अखेर ठाणे पोलिसांची कारवाई

फसवणूक उघडकीस आल्यानंतर समीर नार्वेकर महाराष्ट्राबाहेर पळून गेल्याची माहिती होती. मात्र ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे त्याला ताब्यात घेत मोठी कारवाई केली आहे.

कोट्यवधींचा घोटाळा, आणखी आरोपींची शक्यता

  • TWJ घोटाळ्यात अनेक मोठ्या व्यक्तींची गुंतवणूक असल्याचे बोलले जात असून या प्रकरणात आणखी काही संचालक व मध्यस्थांचा सहभाग असण्याची शक्यता तपास यंत्रणा व्यक्त करत आहे. अटकेनंतर आरोपींकडून चौकशी सुरू असून फसवणुकीचा नेमका आकडा आणि आर्थिक व्यवहारांचे तपशील लवकरच समोर येणार आहेत.

संपादक मकरंद भागवत

पत्रकारितेचा तीस वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक विषयांवर परखड भाष्य.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *