देवेंद्रजी : जिथे शिव्या तिथेच ओव्या!
*देवेंद्रजी : जिथे शिव्या तिथेच ओव्या!*
मकरंद भागवत, पत्रकार, चिपळूण.
मो. 9850863262
नियतीच्या मनात काय असेल हे कोणी सांगू शकत नाही. वरचा खाली, खालचा वर, इकडचा तिकडे, तिकडचा इकडे असं काही घडू शकतं. ‘ वक्त बडा बलवान होता हैं ‘ असं म्हटलं जातं आणि ते पूर्णपणे सत्य आहे. असंच काहीसं मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या बाबतीत चिपळूणमध्ये घडतं आहे. चिपळूण नगरपालिकेतील विजयाचा आनंद आणि जि. प. निवडणुकीत चांगले यश मिळवण्याचा उद्देश ठेऊन देवेंद्रजी यांची चिपळूणला जाहीर सभा होत आहे. या सभेची अत्यन्त दिमाखदार, भव्यदिव्य तयारी (रत्नागिरी भाजपाचे तसे नवे असले तरी एका अर्थी सर्वेसर्वा मानले जात असलेले) प्रशांत यादव यांच्या नेतृत्वात, मार्गदर्शनात सुरु आहे. प्रशांत यादव यांच्यासारखा आर्थिकदृष्ट्या मातब्बर नेता मिळाल्यामुळे जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते ‘ रिलॅक्स ‘ झालेले दिसतात. यादव यांच्या प्रवेशापासूनच प्रत्येक गोष्ट भव्यदिव्य होत आहे. त्यांच्या पत्नी सौ. स्वप्ना यादव आणि पतसंस्थेची त्यांची टीम यांचे मॅनेजमेंट जबरदस्त असते. कौतुकास्पद असते. त्यामुळे भाजप आणि संघाच्या जुन्या, साधेपणात वावरणाऱ्या कार्यकर्त्यांनाही आता दिमाखदार कार्यक्रमांची सवय होऊ लागली आहे. तसेच ते निश्चिन्तही वाटत आहेत. यादव आहेत, पतसंस्थेची यंत्रणा आहे मग टेन्शन नाही, आपण जाऊन फक्त कार्यक्रमाची शोभा वाढवायची. बस्स!
प्रशांत यादव यांचा मुंबईत भाजप प्रवेश झाला तेव्हाच खरं तर मुख्यमंत्री येणार असं सांगितलं गेलं होतं. त्यामुळे यादव यांनी सर्वप्रकारे शक्तीप्रदर्शन केले होते. प्रवेशाची जबरदस्त तयारी केली होती. मात्र काही अपरिहार्य कारणाने देवेंद्रजी आले नाहीत. ती खंत सर्वांनाच होती. मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्रजी यांना चिपळूणला आणून त्यांचे भव्यदिव्य स्वागत करण्याची संधी यादव आणि त्यांच्या समर्थकांना मिळाली आहे. चिपळूण नगरपालिकेत भाजपला चांगले यश मिळाल्याने यादव पती पत्नीचे पक्षात वजन वाढले आहे. आता होऊ घातलेल्या जि. प. आणि पं. स. निवडणुकीत प्रशांत यादव आणि त्यांची टीम कशाप्रकारे यश प्राप्त करते याबाबत उत्सुकता आहे. त्यांना मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे मोठे बळ मिळेल यात शन्का नाही. नगरपालिका आणि त्यापाठोपाठ महानगरपालिकातील मोठ्या यशामुळे भाजपचे मनोबल प्रचंड उंचावलेले आहे. मुख्यमंत्री दौऱ्यामुळे वैयक्तिक प्रशांत यादव यांना नजिकच्या काळात कोणती मोठी जबाबदारी मिळते याकडेही त्यांच्या समर्थकांचे लक्ष लागून राहिले आहे. देवेंद्रजींचा हा दौरा चिपळूण, जिल्हा आणि कोकणासाठी मात्र फालदायी ठरो एवढीच अपेक्षा आहे.
अगदी सुरवातीला लिहिल्याप्रमाणे आणखी एक योगायोगाचा मुद्दा आहे. नियतीचा न्याय आहे. प्रशांत यादव यांनी दोन वर्षांपूर्वी राजकीय चातुर्य दाखवून आय काँग्रेसला हात दाखून शरद पवार यांच्या पुरोगामी विचारांची तुतारी हातात घेतली. चिपळूण – संगमेश्वर विधानसभा निवडणुकीत उभे राहायचे असेल तर पवार साहेबांच्या पक्षात जाणे गरजेचे होते. त्यांनी पवार साहेबांच्या पुरोगामी विचारांची तुतारी याच स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानावर अत्यन्त जोशात फुंकली होती आणि भाजप, मोदी, शहा आणि देवेंद्रजींच्या राजकारणावर, त्यांच्या भूमिकांवर अक्षरशः टिकेचे आसूड ओढले होते. भाजप आणि त्यांच्या नेत्यांचे दैवत असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाच्या मैदानावर हे सर्व घडत होतं. निवडणूक प्रचारात खासदार अमोल कोल्हे, चव्हाण आणि यादव कुटुंबाचे हितचिंतक, मार्गदर्शक, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी भाजप आणि नेत्यांची अक्षरशः लक्तरं वेशीवर टांगली. खुद्द प्रशांत यादव यांनी आजन्म ‘शरदाच्या शीतल चांदण्यात, पुरोगामी विचारांच्या डोहात विहार करण्याचा’ निर्धार केला तोही हजारो लोकांच्या उपस्थितीत आणि टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात! निवडणूक प्रचारातही यादव यांनी भाजपच्या हुकूमशाहीवर, ईडीसारख्या संस्थांचा गैरवापर, प्रतिगामी विचारसरणीवर जोरदार प्रहार केला. शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली म्हणून देवेंद्र फडणवीस यांना ‘ टार्गेट ‘ केले. पण…
योगायोग बघा, ज्या मैदानावर देवेंद्र फडणवीस यांना शिव्या (शब्दश: नव्हे.. कठोर शब्दांत टीका या अर्थाने ) घातल्या गेल्या त्याच सावरकर मैदानावर टीका करणारे, खलनायक ठरवणारे आज देवेंद्रजींच्या भव्यदिव्य सभेसाठी, त्यांच्या दिमाखदार स्वागतासाठी अहोरात्र झटत आहेत. तेच उद्या त्यांच्या कौतुकाचे पूल बांधणार आहेत. तेच आज त्यांचा ‘ धुरंदर ‘ म्हणून जयजयकार करत आहेत. हा फरक केवळ आठ महिन्यात घडला आहे. भाजपने काय जादू केली ते त्यांनाच माहिती. (फारतर नितेशजी राणे, प्रवीण दरेकर यांना अधिक माहिती ) पण देवेंद्रजी आणि खुद्द सावतंत्र्यवीर सावरकर मैदान खूपच भाग्यशाली म्हटले पाहिजेत. सव्वा वर्षांपूर्वी शिव्या ऐकल्या तिथे उद्या ओव्या गायल्या जातील. फुलं उधळली जातील. याला म्हणतात नियतीचा न्याय अर्थात चांगल्या अर्थाने!
प्रशांत यादव यांच्या विचारांचे परिवर्तन होणे शक्य आहे. त्यांना मोदीजी, देवेंद्रजी यांचे नेतृत्व आवडणे, भाजपची विचारसरणी आवडणे यांत गैर काहीच नाही. उलट भाजपलाही यादव यांच्या रूपाने कोकणात मातब्बर नेतृत्व मिळाले आहे. त्यामुळे पक्षाची ताकद वाढणार आहे यात वाद नाही. यादव यांच्यामुळे मोदीजी आणि देवेंद्रजी यांचे हात बळकट होत असतील तर भाजपच्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांना आणखी काय हवं!

