TWJ फ्रॉड : संकेश घाग पोलिसांच्या जाळ्यात!
TWJ घोटाळ्यातील संकेश घाग अखेर
चिपळूण पोलिसांच्या जाळ्यात…

चिपळूण : हजारो कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक करून गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेला TWJ कंपनीचा संचालक संकेश घाग याला अखेर चिपळूण पोलिसांनी अटक करत बेड्या ठोकल्या. या अटकेमुळे संपूर्ण चिपळूण तालुक्यात खळबळ उडाली असून, फसवणूकग्रस्त गुंतवणूकदारांमध्ये न्याय मिळण्याची आशा पुन्हा जागी झाली आहे.
संकेश घाग याच्या अटकेचे वृत्त शहरात वाऱ्यासारखे पसरताच न्यायालय परिसरात गुंतवणूकदारांनी मोठी गर्दी केली होती. अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेला हा आरोपी पोलिसांच्या सततच्या शोध मोहिमेनंतर अखेर हाती लागला. चिपळूण पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले.
TWJ कंपनीच्या माध्यमातून आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून हजारो गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी नव्हे तर हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक उकळण्यात आली होती. मात्र, ठरलेल्या कालावधीनंतर ना परतावा मिळाला, ना मूळ रक्कम. यानंतर कंपनीचे एमडी समीर नार्वेकर, संचालक अचानक गायब झाले आणि गुंतवणूकदारांची मोठी फसवणूक झाल्याचे उघड झाले.
फसवणूकग्रस्त गुंतवणूकदारांनी वेळोवेळी आंदोलन, मोर्चे, निवेदने देत न्यायासाठी आवाज उठवला. मात्र दीर्घकाळ कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नाराजीचे वातावरण होते. अखेर चिपळूण पोलिसांनी तपासाला गती देत संकेश घाग याला शोधून काढले आणि अटक केली.
या अटकेनंतर गुंतवणूकदारांमध्ये समाधान व्यक्त केले जात असून, आता तरी आपले अडकलेले पैसे परत मिळावेत अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, या प्रकरणात आणखी कोणकोण सामील आहेत, कंपनीच्या आर्थिक व्यवहारांचा नेमका मागोवा काय आहे, तसेच फसवणूक केलेली रक्कम कुठे गुंतवण्यात आली, याबाबत पोलीस सखोल तपास करत आहेत.
TWJ घोटाळ्यातील ही अटक महत्त्वाची मानली जात असून, पुढील तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

