चिपळूण निवडणूक – दैव देते आणि कर्म नेते..
नगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि राज्याच्या राजकारणाचा एक टप्पा पूर्ण झाला. आता महानगरपालिका आणि पाठोपाठ जि. प. निवडणुकीची रणधुमाळी चालू राहील. नगरपालिका निवडणुकीत राज्याचा विचार करता महायुतीचे आणि त्यातही भाजपचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यापाठोपाठ शिंदेची शिवसेना आहे. काँग्रेसनेही काही ठिकाणी लक्षणीय कामगिरी केली आहे, मात्र उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्यादृष्टीने हे निकाल चिंताजनक आहेत. या निकालांचे प्रतिबिंब होऊ घातलेल्या महानगरपालिका आणि जि. प. निवडणुकीत दिसणार यात शन्का वाटत नाही. कारण केंद्रात, राज्यात सत्ता असलेल्या पक्षाकडे लोकांचा कल दिसतो आहे. विकासाच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल असं जनमत असल्याचे दिसून येत आहे. अर्थात निवडणुकीची रणनीती, संघटन शक्ती, विविध तंत्र आणि मुद्द्यांची प्रभावी मांडणी या गोष्टीही तितक्याच महत्वाच्या आहेत. या बाबतीत आज तरी भाजपच आघाडीवर आहे. त्याचे चांगले परिणाम त्यांना मिळाले आहेत. अर्थात केवळ वरील गोष्टी आहेत म्हणूनही यश मिळतेच असं नाही तर कधीकधी विरोधी पक्ष, आघाड्या यांच्यातील बेबनावही फायद्याचा ठरतो.
आणि याचं ढळढळीत उदाहरण म्हणजे चिपळूण पालिकेची निवडणूक होय. आज जो निकाल, लोकांचा कौल समोर आला आहे त्यानुसार भाजप सेनेची सत्ता आली आहे. तर विरोधक अगदीच कमी आहेत असं म्हणता येणार नाही. नगराध्यक्षपदी युतीचे उमेश सकपाळ निवडून आले. त्याचवेळी रमेश कदम यांच्यासारख्या मातब्बर राजकारण्याचा पराभव हा त्यांच्यासह अनेकांना धक्कादायक वाटला असेल हे साहजिक आहे. पण…
हा पराभव महाविकास आघाडीने स्वतःहून ओढवून घेतला आहे. ‘ दैव देते आणि कर्म नेते ‘ ही म्हण चिपळूमधील महाविकास आघाडीच्या सर्वच पक्षांना, त्यांच्या नेत्यांना लागू होते. निवडणूक ही काही अचानक झालेली नाही. शहरातील राजकीय परिस्थिती आघाडीच्या नेत्यांना, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना माहिती नाही असं नाही. पण स्वतःच्या ताकदीचा अनावश्यक अहंकार, मुत्सद्देगिरीचा अभाव आणि मुख्य म्हणजे प्रसंगानुरूप राजकारणात जो लवचिकपणा आवश्यक आहे त्याचा अभाव या सर्व गोष्टींमुळे रमेश कदम यांचा पराभव आणि सत्ता मिळण्याचे चान्सेस स्वतःच्या कर्माने घालवले असंच म्हणावे लागेल. ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी थोडाजरी शहाणपणा दाखवला असता, लवचिक धोरण स्वीकारून समजुतीने जागावाटप केले असते तर आज चित्र हमखास उलट असते. या निकालातून बोध घेऊन जि. प. निवडणुका लढवल्या तर अजूनही तुल्यबळ लढतीची शक्यता नक्कीच आहे.
महायुतीच्या विजयात त्यांची एकी, मेहनत, मुद्दे आणि उमेदवारांचे वैयक्तिक संबंध याचा मोठा वाटा आहेच आणि शेवटी विजय हा विजयच असतो. त्यामुळे ते अभिनंदनास पात्र आहेतच. मात्र त्यांचा विजय सोपा करण्यात आघाडीच्या राजकीय मूर्खपणाचा मोठा वाटा आहे हेही नाकारून चालणार नाही.
दुसऱ्या बाजूला वरील म्हण महायुतीच्या नेत्यांना काही प्रमाणात लागू होते. अजित पवार राष्ट्रवादीला बरोबर घेऊन निवडणूक लढवली असती तर आज आघाडीतील बेबनाव आणि आणि युतीतील एकीचा डबल फायदा झाला असता. कदाचित 28 पैकी 25 तरी जागा सहज निवडून आल्या असत्या असं मतांची आकडेवारी पाहता लक्षात येतं.
असो. निवडणूक पार पडली आहे. झालेल्या चुका सुधारणारे राजकारणी यशस्वी होतात. हट्टीपणा आणि अहंकार कायम ठेवला तर नुकसान हे ठरलेलेच आहे. आता पुढच्या काही काळात होणाऱ्या जि. प. निवडणुकीत हुशार राजकारणी कोण आणि ढ राजकारणी कोण ते कळेलच.
इलेक्शन – विलेक्शन
मकरंद भागवत

