चिपळूणचे नवे कारभारी!
चिपळूणचे नूतन नागराध्यक्ष श्री. उमेश धोंडीराम सकपाळ हे आज दुपारी पालकमंत्री ना. उदय सामंत आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत आपल्या पदाची सूत्रं हाती घेत आहेत. त्यांच्या कारकिर्दीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. माजी आमदार आणि शहरावर ज्यांचे वर्चस्व मानण्यात येत होते त्या रमेश कदम यांचा पराभव करुन सकपाळ या पदावर पोहचले आहेत. ते स्वतः निवडून आले आहेतच पण आवश्यक असणारे बहुमतही शिवसेना – भाजप युतीकडे आहे. त्यामुळे शहराच्या विकासाच्या दृष्टीने धोरणात्मक निर्णयासाठी त्यांना कोणती अडचण नसेल. त्यातच ते स्वतः उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या अत्यंत विश्वासातले आहेत. त्यांचे लाडके आहेत हे एव्हाना सर्वांना कळले आहे. त्यामुळे शहराच्या समस्या सोडविताना आणि विकासाचे नवीन उपक्रम राबवताना निधीची कोणतीही अडचण असणार नाही. स्वतःच्याच इमारतीसाठी नगरपालिकेला 11 कोटींचा निधी देऊन पालकमंत्री ना. सामंत यांनी त्याची झलक दिली आहे. सामंत यांचे चिपळूण शहरावर खूप प्रेम आहे त्यातच त्यांचा ‘लाडका उम्या’ नगराध्यक्ष झाल्याने सामंतसाहेब कोणत्याच बाबतीत हात अखडता घेणार नाहीत उलट निधीची बरसात करतील यात वाद नाही. पण…
पण मूळ मुद्दा इथूनच सुरु होतो. नुसता निधी येऊन उपयोग नाही तर त्यातील प्रत्येक रुपया हा शहराच्या भल्यासाठी वापरला जाईल याची खात्री नवीन कारभाऱ्यांनी कृतीतून देणं आवश्यक आहे. चिपळूण पालिकेला भ्रष्टाचाराचे आरोप, प्रकरणे नवीन नाहीत. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या टक्केवारीच्या भानगडीत शहराची वाट लागली. अत्यन्त झापाट्याने वाढणाऱ्या आणि मध्यवर्ती अशा चिपळूण शहराला अतिशय नियोजनपूर्वक विकासाची गरज आहे. दूरदृष्टी आणि कठोर निर्णय यांची गरज आहे. ठेकेदार, आपले कार्यकर्ते, कर्मचारी किंवा नगरसेवक यांच्या विकासासाठी कामं काढण्याच्या प्रकाराला आळा बसला पाहिजे. मागच्या आठवड्यात पूज्य साने गुरुजी यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी ना. उदय सामंत यांनी सर्वात महत्वाचा आणि मोलाचा सल्ला दिला तो म्हणजे ‘टक्केवारी घेऊ नका…’
आजपासून उमेश सकपाळ यांचा कारभार सुरु होईल. पुढच्या आठवड्यात बाकी सभापती कदाचित निवडले जातील. सकपाळ यांनी निवडणूक प्रचारात स्वतः दिलेली आश्वासने, मा. एकनाथ शिंदे, मा. उदय सामंत आणि भाजपच्या नेत्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी ठोस प्रयत्न करावे लागतील तसेच त्यासाठी निश्चित कालावधी ठरवावा लागेल. मुख्याधिकारी, प्रशासन, नगरसेवक या सर्वांच्या सहकार्यातून, सल्ला घेऊन ‘ स्मार्ट सिटी ‘ साठी काम करावे लागेल. पण यांचबरोबर सकपाळ यांनी शहरातील विविध क्षेत्रातील अभ्यासू, जाणकार लोकांनाही विश्वासात घ्यावे, त्यांच्याशी सल्लामसलत करावी. त्यासाठी वेळ राखीव ठेवावा. नाहीतर आपल्याच कार्यकर्त्यांच्या, ठेकेदारांच्या, भाटगिरी करणाऱ्यांच्या कोंडाळ्यात राहण्याने शहराचे नुकसान होईल. चिपळूणकर जनतेने तुमच्यावर मोठ्या विश्वासाने ही जबाबदारी दिली आहे. त्याला तडा जाणार नाही यासाठी कायम प्रयत्न असले पाहिजेत. इतकेच नव्हे तर उदय सामंत यांनी पहिल्या सत्कारावेळी सांगितल्याप्रमाणे उमेश सकपाळ पुन्हा पुन्हा नगराध्यक्ष झाले पाहिजेत असं जनतेला वाटलं पाहिजे असं काम करण्याची, चिपळूणच्या इतिहासात कार्यक्षम नगराध्यक्ष म्हणून नाव नोंदविण्याची संधी मिळाली आहे याचा विसर पडू नये.
सूत्र हातात घेतल्यावर आगामी चार पाच महिन्यात नेमके कोणते प्रश्न प्राधान्याने सोडवणार तसेच विकासाचे नेमके कोणते प्रोजेक्ट करणार याचा आराखडा सकपाळ यांनी लोकांसमोर मांडवा अशी विनंती आहे. अपेक्षा आहे. तसेच होणाऱ्या कामात दर्जा असेल, तें टिकाऊ असेल याकडे स्वतः जातीने लक्ष द्यावे.
असो. नवीन कारभाऱ्यांकडून अपेक्षा खूप आहेत. त्यांनी काम सुरु केल्यावरच त्यांचा खरा खोटा जो काही असेल तो चेहरा समोर येईलच. मात्र आपण आत्ता सकारात्मक राहून त्यांना शुभेच्छा देऊया.
मकरंद भागवत, पत्रकार, चिपळूण.

