आंतरराष्ट्रीय सहजयोग महोत्सव – गणपतीपुळे

गणपतीपुळे: निर्मलानगरी गणपतीपुळे: परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी प्रणित सहज योग ध्यान केंद्र, द लाईफ इंटरनल ट्रस्टच्या वतीने निर्मल नगरी मालगुंड येथील समुद्रकिनाऱ्यावर सहजयोग आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे (दि. २२ ते २५ डिसेंबर) भव्य दिव्य आयोजन करण्यात आले. या महोत्सवात देश-वदेशातील 7000 साधकांनी उपस्थित राहून चैतन्याच्या महासागराचा अनुभव घेतला.
या चार दिवसांच्या महोत्सवात प्रातःकालीन ध्यान, नृत्य संगीत कार्यक्रम, सामूहिक भजन, विविध सामाजिक धार्मिक विषयावर परिसंवाद व चर्चासत्र, युवकांना मार्गदर्शन, सहज कृषी व बालसेमिनार, धार्मिक विधी अशा विविध उपक्रमांचा समावेश होता.
पहिल्या दिवशी दिनांक 22 डिसेंबर रोजी निर्मल नगरी येथे येणाऱ्या भाविकांचे स्वागत झाले दुपारी हवन घेण्यात आले. सायंकाळी चंद्रशेखर वझे यांनी शास्त्रीय गायन सादर केले. त्यांच्या अनुभवी शैलीतील बहारदार सादरीकरणास उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी मेवाती घराण्याचे गायक साईप्रसाद पांचाळ यांनी हवेली संगीत सादर केले. श्रीकृष्णांची स्तुती करणाऱ्या या भजनांनी उपस्थितांना अलौकिक भक्तीचा आनंद दिला. पंडित अजित कडकडे यांचे शिष्य योगराज धुरी यांनी अभंगवाणी सादर केली. कोल्हापूरच्या शिवशंकर प्रतिष्ठानतर्फे प्रियंका पाटील व राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवकालीन युद्ध प्रत्यक्षिके सादर करून आपल्या कौशल्यांचे दर्शन घडवले. चौथ्या दिवशी श्री माताजी निर्मला देवी यांच्या पूजनाने महोत्सवाचा समारोप झाला.
विदेशी साधकांची उपस्थिती
या महोत्सवाला अमेरिका, रशिया, जपान, चीन, जर्मनी यासह दक्षिण आफ्रिका, नेपाळ अशा विविध देशांमधील सहजयोग साधकांनी उपस्थिती लावली. भारतीय साधकांच्या सोबतीने त्यांनी भारतीय पोशाख परिधान करून सहभाग घेतला होता. श्रीमाताजी निर्मलादेवी यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांच्या जीवनात आलेल्या परिवर्तनाबद्दल बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता.
समुद्रकिनारी स्वच्छता
या महोत्सवाच्या निमित्ताने निर्मल नगरी समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यामध्ये युवा महिलांसह सर्वच वयोगटातील साधकांनी सहभाग घेत परिसरातील सर्व कचरा व अस्वच्छता दूर केली. त्यामुळे येथील भक्तिमय वातावरणात प्रसन्नतेचा अनुभव मिळाला.
व्यवस्थापन व भोजन व व्यवस्था
द लाईफ इटरनल ट्रस्ट मुंबईच्या वतीने 7000 साधकांच्या राहण्यासह भोजन व्यवस्था व इतर व्यवस्थापन अतिशय काटेकोरपणे करण्यात आले होते. साधकांना ध्यानासह सामूहिक आनंद मिळावा यासाठी सर्वतोपरी व्यवस्था करण्यात आली होती.
युवाशक्तीचा सहभाग व कार्य
या महोत्सवात युवक युवतींचा मोठा सहभाग असतो. व्यवस्थापनामध्ये स्वयंसेवक म्हणून कार्य करण्यात ते पुढाकार घेतात. श्रीमाताजींनी सांगितलेले अध्यात्मिक कार्य करण्यात वेगळाच आनंद मिळत असल्याचे यावेळी सांगताना युवकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
सहजयोगा विषयी
सहजयोग ही एक अनोखी ध्यान पद्धती आहे. प्रत्येक मानवाच्या शरीरामध्ये माकड हाडाच्या तळाशी कुंडलिनी नावाची शक्ती सुप्त अवस्थेत असते. ती जागृत होऊन साधकाच्या टाळातून बाहेर पडते आणि मनुष्यामध्ये योग घटित होतो. त्याची अनुभूती थंडचैतन्य लहरींच्या रूपाने दोन्ही तळहात आणि टाळुवर होते. त्यायोगे साधकाच्या शरीरातील सप्तचक्र गतिमान होऊन त्याच्यामध्ये पावित्र्य, नवनिर्मिती, समाधान, आत्मविश्वास, व्यवहारचातुर्य, क्षमाशीलता व चैतन्याशी एकरूपता हे गुण विकसित होतात.
श्री माताजी निर्मला देवी यांच्याविषयी
परमपूज्य डॉ. श्री. निर्मला श्रीवास्तव यांना सहजयोगी साधक श्रीमाताजी निर्मलादेवी संबोधतात. त्यांचा जन्म 21 मार्च 1923 रोजी मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे झाला. लहानपणापासून त्यांची निसर्गाशी जवळीक होती. महाविद्यालयीन जीवनात त्यांनी वैद्यकशास्त्राचा अभ्यास केला. तसेच शालेय जीवनात स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला. 5 मे 1970 रोजी त्यांनी सहजयोगाची स्थापना केली. हा सहजयोग आधुनिक मानवासाठी वरदान ठरला आहे. या योगामुळे देश-विदेशातील लाखो नागरिकांच्या जीवनात परिवर्तन घडून आले आहे.
“आंतरराष्ट्रीय सहजयोग महोत्सव हा देश विदेशातील साधकांच्या सहभागामुळे भक्ति, समर्पण आणि निर्मल प्रेम यांचा त्रिवेणी संगम झाला आहे. गणपतीपुळेच्या समुद्रकिनाऱ्यावर श्री माताजी निर्मलादेवी यांनी मनुष्यामधील दैवी गुणसंपदेचा जागर केला. तो पुढे नेण्याचे कार्य घडत आहे, याचा आम्हा सर्वांना आनंद होतो. ”
– प्रवीण जावळकर, विश्वस्त, द लाईफ इटर्नल ट्रस्ट मुंबई

