मुंबई – गोवा हायवेचा ‘मायक्रो’ सर्व्हे करा…

मुंबई – गोवा हायवेचा ‘मायक्रो’ सर्व्हे करा…

*सामंत साहेबांना विनंती…*

##*महामार्गाचा ‘मायक्रो’ सर्व्हे करा…*##

 

मकरंद भागवत, पत्रकार, चिपळूण.मो. 9850863262

 

मुंबई – गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम जवळपास 97% झाल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी काही महिन्यापूर्वी जाहीर केले होते. त्यानंतर खुद्द गडकरी साहेबांनी 31 मे ची डेडलाईन दिली होती. ती पाळली गेली नाही, परंतु आता पुन्हा एकदा या सर्वांनीच चंग बांधला आहे की, गणपतीपूर्वी हा रस्ता पूर्ण करायचाच! त्यादृष्टीने सर्वत्र काम चालू असल्याचे दिसत आहे. चिपळूणच्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. हा पूल पूर्ण झाला तरी प्रांत ऑफिसदरम्यान जर भरावाचे काम पूर्ण झाले तरच त्याचा उपयोग होईल. अन्यथा गणपती काळात शहरातूनच सर्व्हिस रोडवरून ट्रॅफिक चालू राहिल. आणखी आठ – दहा दिवसांत या कामाचा अंदाज येईल. एकंदरीत हा रस्ता चालू करुन प्रवाशांना दिलासा देण्याचा जो प्रयत्न सुरु आहे त्याबद्दल समाधान आहेच. पण…

हा रस्ता चालू करतानाच त्याचा एकदा ‘मायक्रो’ सर्व्हे व्हायला हवा. महामार्गचे अधिकारी, ठेकेदार कंपनीचे अधिकारी, ओव्हरसियर आदींच्या दोन तीन टीम करुन (जमलं तर त्रयस्थ तज्ञांना घ्या) त्यांनी या रस्त्याची बारकाईने पाहणी करावी. त्यामुळे कुठें रस्ता खराब झाला आहे, कुठें काँक्रिट उडाले आहे, कुठें खड्डे पडले आहेत, कुठें ‘V’ आकाराचा खोलगटपणा झाला आहे, डायव्हर्जन आणि सिंगल लेन चालू असेल तिथे दिवसा – रात्री योग्य अंतरावरून स्पष्ट दिसेल असे सूचना फलक आहेत का, गतिरोधक आहेत ते स्टॅण्डर्ड साईजचे आहेत का, त्यावर पांढरे पट्टे आहेत का या सर्व गोष्टींची माहिती मिळेल. आणि त्या त्या स्पॉटला योग्य त्या सुधारणा करता येतील. या सर्व टीमने स्लो आणि फास्ट अशा दोन्ही प्रकारे दिवसा व रात्री टेस्ट घ्यावी म्हणजे त्यांना आपल्या कामाचा दर्जा आणि चुका लक्षात येईल.

व्ही आकाराचा खोलगट भाग काही ठिकाणी आहेत तिथे गाडी एकदम पाताळात जाऊन पुन्हा अवकाशात जाते. पुलांच्या दोन्ही टोकांना स्लोप न देता दोन दोन इन्चाची उंची ठेवल्याने गाड्या मजबूत दणकतात आणि प्रवाशांची डोकीही फुटतात. काही ठिकाणी रस्त्यात जोडाच्या ठिकाणीहि स्लोपची बोंब आहे. अचानक दिसणारे खड्डे, अचानक येणारे डायव्हर्जन, सिंगल लेनबाबत सूचना फलक नसल्याने आणि जॉईंट ठिकाणी स्लोप नसल्याने चालकाचा गोंधळ उडतो आणि अपघात होतात. त्यात अनेकजण जीव गमावतात. काही जायबंदी होतात. त्यामुळे अनेक कुटुंबे उध्वस्त झाली. होत असतात. कारण काय तर ठेकेदार आणि अधिकारी यांनी अगदी साध्या साध्या गोष्टीत दाखवलेला बेजबाबदाऱपणा! ज्या गोष्टी अडाणी माणसाला, छोट्या मुलालाही कळतात त्या गोष्टी अभियंता मंडळींना, वर्षानुवर्षे काम करणाऱ्या ठेकेदारांना का कळत नाहीत?

मुंबई – गोवा हायवेचे कामाबाबत झालेली रखडपट्टी, त्याच्या कामाचा सुमार दर्जा, लेव्हलचा अभाव याबाबत आता न बोललेलं बरं. एकदा हा रस्ता पुरा करा आणि मोकळे व्हा असं म्हणायची वेळ आलेली आहे. जो काही रस्ता होईल त्याचा किमान मेंटेनन्स तरी नीट चालू ठेवा एवढीच अपेक्षा आहे. गणपती बाप्पा मंत्री, अधिकारी, ठेकेदार यांना सु्बुद्धी देवो आणि सर्वच कोकणवासियांना या रखडपट्टीतून लवकरात लवकर मुक्तता मिळो.

 

ता. क. – भर रस्त्यात अगदी पाच दहा किमीचा रस्ता पूर्ण असताना मध्येच पाच पन्नास फुटाचा पॅच तसाच खराब का ठेवतात? त्याचं काय शास्त्र? हे ठेकेदार आणि अभियंतेच जाणोत. साधं उदाहरण गोळवली येथील. सनराईज हॉटेलसमोर गोव्याकडे जाणाऱ्या लेनवर उजव्या बाजूला असा पॅच आहे. त्यामुळे स्पीडने येणारा गोंधळतो आणि अपघात होतो. हे एक उदाहरण झाले. असं अनेक ठिकाणी दिसेल.

संपादक मकरंद भागवत

पत्रकारितेचा तीस वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक विषयांवर परखड भाष्य.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *