निलेश सांबरे यांची कोकणातील विकासाची प्रेरणादायी वाटचाल!

निलेश सांबरे यांची कोकणातील विकासाची प्रेरणादायी वाटचाल!

 

 

कोकण माझं कुटुंब, प्रत्येक स्वप्न माझी जबाबदारी शिक्षणाला बळ, आरोग्याला आधार, महिलांना स्वावलंबन

निलेश सांबरे यांची कोकणातील विकासाची

प्रेरणादायी वाटचाल!

 

रत्नागिरी : कोकणातील विद्यार्थी, महिला आणि सर्वसामान्य कुटुंबांच्या जीवनात शिक्षण, आरोग्य, स्वावलंबन आणि विकासाची नवी दिशा निर्माण करण्याच्या उद्देशाने जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश भगवान सांबरे यांच्या रत्नागिरी दौऱ्यात विविध उपक्रम उत्साहात पार पडले. मोफत वह्या वाटप, विद्यार्थी मार्गदर्शन, महिला सक्षमीकरण, आरोग्यसेवा आणि गाव संवादाच्या माध्यमातून त्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला.

 

लांजा, ओणी आणि देवाचे गोठणे येथे विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आधार देणाऱ्या या उपक्रमाला विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

 

यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना निलेश सांबरे साहेब म्हणाले, “मी एवढं सगळं मोफत का करतो? कारण कोकण माझं कुटुंब आहे. कुटुंबातील माणसांकडून पैसे घेत नसतात आपल्या कुटुंबासाठी आपण सुख-सुविधा निर्माण करतो. त्याच भावनेतून कोकणातील विद्यार्थ्यांसाठी काम करतो.

 

ते पुढे म्हणाले, “आज एखाद्या विद्यार्थ्याच्या हातात आपण एक वही देतोय; पण त्या वहीच्या प्रत्येक पानावर त्याचं भविष्य लिहिलं जाणार आहे. परिस्थिती कठीण असली तरी स्वप्नं मोठी असली पाहिजेत. कोणत्याही विद्यार्थ्याचं शिक्षण केवळ आर्थिक अडचणीमुळे थांबता कामा नये.”

 

भोके येथे ग्रामस्थांशी मनमोकळा संवाद साधतानाच शिवणकला वर्गाचे उद्घाटन करण्यात आले. महिलांच्या हाताला कौशल्य आणि त्या कौशल्याला रोजगाराची जोड मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला. महिलांना स्वावलंबी होण्यासाठी जिजाऊच्या माध्यमातून आवश्यक ते सहकार्य करण्याचा विश्वास निलेश सांबरे साहेब यांनी दिला.

 

“महिलेच्या हातात कौशल्य आलं की तिच्या हातात स्वतःच्या कुटुंबाचं भविष्य बदलण्याची ताकद येते. महिलांना केवळ मदत करण्यापेक्षा त्यांना स्वतःच्या पायावर उभं करणं महत्त्वाचं आहे,” असा संदेश त्यांनी दिला.

 

लांजा येथील गणेश मंगल कार्यालयातील आगरे हॉल येथे श्री. नितीन बाळगुडे पाटील यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक आणि शिक्षक उपस्थित होते. निलेश सांबरे साहेब प्रमुख उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत स्पर्धा परीक्षांची तयारी, कौशल्यविकास आणि भविष्यातील संधींचा योग्य उपयोग करावा, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

 

आरोग्याच्या क्षेत्रातही जिजाऊच्या माध्यमातून गरजू नागरिकांना आधार देण्याचा प्रयत्न सुरू आहे. आर्थिक परिस्थितीमुळे कोणालाही उपचारांपासून वंचित राहावे लागू नये, या भावनेतून मोफत रुग्णालये आणि आरोग्यसेवेच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत मदत पोहोचवली जात आहे. शिक्षणासाठी वही, रोजगारासाठी कौशल्य आणि आरोग्यासाठी उपचार—समाजाच्या प्रत्येक गरजेच्या ठिकाणी मदतीचा हात पोहोचवणे, हीच जिजाऊची भूमिका असल्याचे निलेश सांबरे साहेब यांनी स्पष्ट केले.

 

यानंतर पावस येथे गाव संवाद साधत निलेश सांबरे साहेब यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. गावातील शिक्षण, रोजगार, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्न जाणून घेत, समस्या समजून घेण्यासाठी गावागावात पोहोचण्याची आपली भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

 

यावेळी लोकप्रतिनिधींच्या जबाबदारीवरही निलेश सांबरे साहेब यांनी स्पष्ट आणि तिरकस भूमिका मांडली. निवडणुकीच्या काळात मतदारांच्या दारापर्यंत पोहोचून आश्वासनांची यादी सांगणारे अनेक लोकप्रतिनिधी आपण पाहतो मात्र निवडणूक संपल्यानंतर त्याच मतदारांच्या प्रश्नांसाठी कितीजण त्यांच्या दारापर्यंत पोहोचतात, हा खरा प्रश्न आहे. मत मागताना मतदार ‘आपला माणूस’ असतो, तर काम करताना तो परका होऊ नये. लोकप्रतिनिधित्व म्हणजे केवळ निवडणूक जिंकण्याची संधी नसून, जनतेची सुख-दुःखं आपली मानून काम करण्याची जबाबदारी आहे. आश्वासनं देणं सोपं असतं; मात्र ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मैदानात उतरावं लागतं. म्हणूनच राजकारणात शब्दांपेक्षा काम बोललं पाहिजे,असे त्यांनी सांगितले.

 

ते पुढे म्हणाले, आपण आपल्या घरातील कुटुंबीयांसाठी ज्या पद्धतीने सुख-सुविधा निर्माण करतो, त्याच पद्धतीने आपल्या मतदारांसाठीही केलं पाहिजे. कारण मतदार हा फक्त मत देणारा नाही तो आपल्या कुटुंबाचा भाग आहे.

 

निलेश सांबरे साहेब यांच्या मते, विकास हा केवळ मोठ्या प्रकल्पांचा विषय नाही. एखाद्या विद्यार्थ्याच्या हातात वही पोहोचणे, एखाद्या महिलेला कौशल्य मिळणे, एखाद्या तरुणाला योग्य मार्गदर्शन मिळणे, गरजू रुग्णाला उपचार मिळणे आणि एखाद्या कुटुंबाची अडचण समजून घेण्यासाठी त्याच्या दारापर्यंत पोहोचणे हाच खरा विकास आहे.

 

“कोकणातील कोणत्याही मुलाने परिस्थितीमुळे स्वप्न सोडू नये आणि कोणत्याही महिलेने संधीअभावी स्वतःला मर्यादित ठेवू नये. शिक्षण असो, रोजगार असो, आरोग्य असो किंवा स्वावलंबन जिजाऊ तुमच्या सोबत आहे,असा विश्वास निलेश सांबरे साहेब यांनी व्यक्त केला.

 

विद्यार्थ्यांच्या हातातील वहीपासून महिलांच्या हातातील कौशल्यापर्यंत, गरजूंच्या आरोग्यापासून गावकऱ्यांच्या प्रश्नांपर्यंत कोकणातील प्रत्येक कुटुंबाला आपलं कुटुंब मानून काम करण्याची निलेश सांबरे साहेबांची भूमिका या संपूर्ण दौऱ्यातून ठळकपणे समोर आली.

 

कोकणाला केवळ आश्वासनांची नाही, तर प्रत्यक्ष कामाची गरज आहे आणि हे काम करताना प्रत्येक कुटुंबाच्या चेहऱ्यावर समाधान आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या डोळ्यात भविष्याचं स्वप्न दिसलं पाहिजे, हीच त्यांच्या कामाची प्रेरणा या दौऱ्यातून अधोरेखित झाली.

संपादक मकरंद भागवत

पत्रकारितेचा तीस वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक विषयांवर परखड भाष्य.

Related articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *