प्रमोद जठार आणि रत्नागिरी भाजप!
# *प्रमोद जठार आणि रत्नागिरी भाजप!*#
बहुत प्रतीक्षेनंतर भाजपने ‘उपऱ्यांचा उदोउदो’ करण्याची भूमिका सोडून आपल्या ‘ओरिजिनल’, निष्ठावंत कार्यकर्त्याला पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात आणले आहे. हा कार्यकर्ता दुसरातिसरा कोणी नसून ते आहेत प्रमोद जठार! ते नुकतेच भाजपच्या कोट्यातून विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आले आहेत. पूर्वी ते 2009 साली कणकवली विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यानंतर मात्र त्यांना एकदा काँग्रेस उमेदवार नितेश राणे यांच्याकडून पराभवाला सामोरे जावे लागले आणि नंतर खुद्द नितेश राणे हेच भाजपचे उमेदवार असल्यामुळे या मतदारसंघाचे नेतृत्व करता आले नाही. असं असले तरी प्रमोद जठार हे पक्षाच्या राज्य पातळीवरील संघटनेत कार्यरत होते. जठार यांना विधानसभेत कणकवली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली तेव्हा त्यांनी कोकणातील अनेक प्रश्नांना अभ्यासपूर्ण वाचा फोडली. विधानसभेत आपल्या कामाची छाप पाडली. कोकणातील शेती, पर्यटन आणि कोकण रेल्वे संदर्भातील प्रश्न असतील विधिमंडळाने प्रमोद जठार यांना आक्रमक होताना पाहिले. अत्यन्त स्पष्ट आणि मुद्देसूद भूमिका घेताना पाहिले. मधल्या काळात नाणार रिफायनरीबाबत त्यांनी समर्थनाची भूमिका घेताना हा प्रकल्प कोकणासाठी का आवश्यक आहे ते येथील जनतेला पटवून देण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही प्रश्नाचा सखोल अभ्यास करणे, त्याबाबत आपली भूमिका सडेतोडपणे मांडणे हे जठार यांचे वैशिष्ट्य आहे. कोकणातील रखडलेले सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी त्यांनी पक्ष आणि शासन स्तरावर प्रयत्न केले. जठार हे काही काळ भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षही होते. आमदार असताना आणि नसताना प्रमोद जठार यांनी भाजपचा एक कार्यकर्ता म्हणून निष्ठापूर्वक काम केले. कार्यकर्त्यांशी, सामान्य जनतेशी ते कायम संपर्कात राहिले. मधल्या काळात मात्र पक्षाने त्यांना बेदखल केले की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. कारण सिंधुदुर्ग म्हटल्यावर ‘होल अँड सोल’ राणे पितापुत्र होते. त्यामुळे जठार काहीसे झाकोळले गेले. अर्थात महाविकास आघाडी सरकारच्या काळात नारायण राणे केंद्रीय मंत्री असूनही उद्धव ठाकरे सरकारने त्यांना नाट्यमयरित्या अटक केली होती. त्या दौऱ्यात प्रचंड टेन्स होता. त्यावेळी प्रमोद जठार राणे यांच्याबरोबर खंबीरपणे साथ देत होते. मीडियाला सामोरे जात होते आणि उद्धव ठाकरे सरकारवर आक्रमकपणे टिकेचे आसूड ओढत होते. 2024च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत तसे ते रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्ह्यात सक्रीय वाटत होते. नारायण राणे यांच्याऐवजी प्रमोद जठार यांना भाजप संधी देईल अशी चर्चा जोरात सुरु होती. जठार यांनीही तशी तयारी ठेवली होती. केली होती. मात्र, भाजपने आक्रमक, अनुभवी चेहरा म्हणून नारायण राणे यांना पसंती दिली. त्यानंतर ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात किती सक्रिय राहिले याची माहिती नाही, पण रत्नागिरी जिल्ह्यात मात्र ते फारसे दिसले नाहीत, चर्चेत राहिले नाहीत. विधानपरिषदेत रिक्त असलेल्या आमदारकीसाठी भाजपने जठार यांना संधी देऊन त्यांना स्वतःला, त्यांच्या समर्थकांना आणि विशेष करुन सिंधुदुर्ग – रत्नागिरीतील भाजप कार्यकर्त्यांना अनपेक्षित गिफ्ट दिली आहे. प्रमोद जठार हे विधानपरिषद सदस्य झाल्याने त्यांना कोकणाचे प्रश्न अधिक प्रभाविपणे मांडता येतील. ते सोडविण्यासाठी शासनाला भाग पाडता येईल. त्याशिवाय त्यांचा आमदार निधी कोकणात योग्य त्या कामासाठी वापरता येईल. (कार्यकर्ता कमी ठेकेदार जास्त असलेल्यांच्या फायद्यासाठी वापरला जाणार नाही अशी अपेक्षा आहे.) एकंदरच प्रमोद जठार यांच्या रूपाने एक अभ्यासू, स्पष्ट विचारांचा, आक्रमक आणि जनतेत मिसळणारा लोकप्रतिनिधी रत्नागिरी – सिंधुदुर्गला मिळाला आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा…
आमदारकी मिळाली त्याचबरोबर प्रमोद जठार यांच्याकडे भाजपने कोकण विभागाचे संयोजक म्हणून जबाबदारी दिली आहे. म्हणजे एकीकडे लोकप्रतिनिधी म्हणून ताकद देतानाच कोकण पट्ट्यात भाजपची संघटनात्मक ताकद वाढविण्याचीही जबाबदारी दिली आहे. भविष्यात एकला चलो किंवा स्वबळावर निवडणुका लढविण्याची वेळ आलीच तर भाजपला संघटनात्मक दृष्टीने मजबूत करणे आवश्यक आहे याची जाणीव असल्यामुळे जठार यांच्यासारख्या संघटन कौशल्य असलेल्या नेत्याला ही जबाबदारी दिली आहे. आता हे आव्हान ते कसं पेलतात ते कळायला काही काळ जावा लागेल. सध्या तरी सर्व प्रकारच्या निवडणुका पार पडल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या कामाची चाचणी 2029 च्या लोकसभा / विधानसभा निवडणुकीत होईल.
सद्यस्थितीत सिंधुदुर्गात भाजप स्ट्रॉंग आहे तो राणे यांच्यामुळे. पण इथे एक अडचण अशी आहे की राणे यांची ताकद ही त्यांची स्वतःची असते. ते ज्या पक्षात असतात किंवा असतील तेथे ती जाते. त्यामुळे कोणत्याही पक्षासाठी ती काहीशी सूज म्हटली पाहिजे. शिवसेना, काँग्रेसने तो अनुभव घेतलाय. सत्ता असो वा नसो कोणत्याही परिस्थितीत जो कार्यकर्ता निष्ठा कायम ठेवतो ती खरी पक्षाची ताकद. अशा स्वरूपाची संघटना बांधणे ही जठार यांची प्राथमिकता असली पाहिजे. नेते गेले, त्यांचे समर्थक सोडून गेले तरी एखादा सामान्य कार्यकर्ताही जिद्दीने उभा राहील असं संघटन असणे आवश्यक आहे. त्यामुळे स्वार्थासाठी, तात्कालिक फायद्यासाठी पक्षात येणाऱ्यांचा उदोउदो करायचा, त्यांना डोक्यावर बसवायचे असले उद्योग जे भाजपमध्ये सुरु आहेत ते थांबवले पाहिजेत किमान कमी केले पाहिजेत. नवीन लोकं पक्षात आले पाहिजेत याबाबत दुमत नाही पण आलेला खरोखरंच पक्षाच्या प्रेमापोटी आलाय का, त्याला पक्षाची ध्येयधोरणे मान्य आहेत का, उद्या विपरीत परिस्थितीत तो पक्षात राहणार आहे की आपलं चंबूगबाळं बांधून तयार आहे याची खात्री तरी करुन घेतली पाहिजे. मानसन्मान सर्वांनाच मिळाला पाहिजे. जुने बसलेत सतरंज्या उचलीत आणि नवीन आलेले पदं मिळवतायत, मिरवून घेतायत, सत्तेचा लाभ घेतायत अशी परिस्थिती आज रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपाची आहे. एक काळ रत्नागिरी, गुहागरसह अनेक ठिकाणी भाजपची संघटनात्मक ताकद चांगली होती. प्रामाणिक, निष्ठेने काम करणारे शेकड्यानो कार्यकर्ते होते. आता सगळे प्रोफेशनल झाले आहेत. भाजप पक्ष आहे की कॉर्पोरेट कम्पनी आहे अशीही शन्का कधीकधी येते.
एक – दीड महिन्यापूर्वी भाजपची रत्नागिरी दक्षिणची जिल्हा कार्यकारणी निवडली गेली. वर्षानुवर्षे काम करणाऱ्यांना मोठ्या पदावर काम करण्याची संधी तर दिलीच नाही साधं सदस्य म्हणून घेतलं गेलं नाही. त्यावरून भाजपमध्ये, संघामध्ये प्रचंड नाराजी आहे. यावरून अनेक पोस्टही समाज माध्यमावर व्हायरल झाल्या आहेत. त्यामुळे रत्नागिरीच्या दक्षिण भागात ‘ऑल इज वेल ‘ नाही. उत्तर रत्नागिरीतही काही फार चांगली परिस्थिती नाही. प्रमोद जठार यांना यांत लक्ष घालून नव्या जुन्यांमध्ये विश्वास निर्माण करण्याचे, जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना योग्य ती संधी – सन्मान देण्याचे काम प्राधान्याने करावे लागेल. रत्नागिरी भाजपातील वाद केवळ राज्य पातळीवर नव्हे तर केंद्रीय पातळीवर पोहचल्याचे सांगण्यात येते. प्रमोद जठार या सर्वांतून काय मार्ग काढतात हे नजिकच्या काळात कळेलच. मात्र एक आमदार म्हणून आणि स्पष्टवक्ता, शिस्तीत काम करणारा पदाधिकारी म्हणून प्रमोद जठार भाजपला चांगली उभारी देतील अशी अपेक्षा आहे. त्यांना भाजप वाढवायचा आहे, पण आव्हान केवळ पक्षांतर्गत नाही तर शिंदे सेनेचेही आहे. उदय सामंत यांच्याशी जुळवून घेत, प्रसंगी कमीपणा घेत पक्ष वाढवत न्यायचा की थेट आक्रमक धोरण स्वीकारायचे यापैकी कोणता मार्ग प्रमोद जठार स्वीकारतात याबाबत मात्र सर्वांनाच उत्सुकता असणार आहे.
मकरंद भागवत, पत्रकार, चिपळूण.

