आंबा बागायतदारांच्या प्रश्नावर ठाकरे शिवसेना आक्रमक!

आंबा बागायतदारांच्या प्रश्नावर ठाकरे शिवसेना आक्रमक!

लढाई आंबा बागायतदारांच्या घामाच्या दामाची;

राजू शेट्टींच्या भेटीत शिवसैनिकांचा बुलंद आवाज!

राजकीय जोडे बाजूला ठेवून शिवसेना (उबाठा) उतरली मैदानात; बाळ माने, मयुरेश्वर पाटील यांच्या नेतृत्वात बळ एकवटले..

रत्नागिरी – रत्नागिरीच्या लाल मातीतील कष्टकरी आंबा बागायतदारांची लूट करणाऱ्या कॅनिंग कंपन्यांच्या विरोधात आता संघर्षाची ठिणगी पडली आहे. आज शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांची व्यथा मांडली असली, तरी या संघर्षाला खऱ्या अर्थाने बळ दिले ते उपस्थित असलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या रण धुरंधरांनी!

रत्नागिरीतील हापूस आंबा उत्पादक शेतकऱ्यांवर कॅनिंग कंपन्यांकडून होणारा अन्याय आता उघड झाला आहे. “आधी कॅनिंगच्या आंब्याला ७० ते ७५ रुपये प्रति किलो दर दिला जात होता. मात्र, बाहेरचा आंबा स्वस्त दरात उपलब्ध करून देऊन आता स्थानिक आंब्याचा दर ३० ते ३५ रुपयांवर आणून पाडला आहे,” असा खळबळजनक खुलासा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते श्री. बाळ माने यांनी केला आहे.

*शिवसेना उभी राहिली ‘ढाल’ बनून!*

केवळ चर्चा नको तर न्याय हवा, या भूमिकेतून शिवसेना उपनेते श्री. बाळ माने, तालुका प्रमुख श्री. मयुरेश्वर पाटील, उपतालुका प्रमुख श्री. विजय देसाई आणि शहर प्रमुख श्री. प्रशांत साळुंखे,विभाग प्रमुख व कोकण विभाग आंबा व्यापारी व शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाश (बावा) साळवी यांनी आज प्रत्यक्ष मैदानात उतरून आंबा बागायतदार आणि व्यावसायिकांचे समर्थन केले. जेव्हा जेव्हा शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी येते, तेव्हा तेव्हा त्याच्या पाठीशी उभा राहणारा ‘शिवसैनिक’ आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात बागायतदारांच्या हक्कासाठी ताठ मानेने उभा होता.

*कंपन्यांच्या मनमानीला शिवशाही उत्तर!*

कॅनिंग कंपन्यांनी ५० टक्के भाव कमी करून जो अन्याय केला आहे, तो शिवसैनिक कदापि सहन करणार नाही. “शेतकऱ्याचा आंबा मातीमोल भावात विकला जात असताना आम्ही शांत बसू शकत नाही,” ही आक्रमक भावना यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. बाळ माने आणि मयुरेश्वर पाटील यांच्या उपस्थितीने आंबा उत्पादकांमध्ये एक नवा विश्वास निर्माण झाला आहे की, त्यांच्या घामाच्या प्रत्येक थेंबाचे मोल मिळवून देण्यासाठी शिवसेना शेवटच्या क्षणापर्यंत लढेल.

*कार्यकर्त्यांनो, हीच वेळ आहे बागायतदारांच्या पाठीशी उभे राहण्याची!*

राजू शेट्टी यांनी मांडलेली कैफियत आणि त्याला शिवसेनेने दिलेली खंबीर साथ यामुळे हा लढा आता अधिक तीव्र झाला आहे. विजय देसाई, प्रशांत साळुंखे आणि उपस्थित सर्व शिवसैनिकांनी ज्या निष्ठेने आज शेतकऱ्यांची बाजू लावून धरली, त्याने हे सिद्ध केले की रत्नागिरीच्या हापूसचा राजा आणि तो पिकवणारा आमचा शेतकरी हाच शिवसेनेसाठी सर्वोच्च आहे.

 

 

 

 

संपादक मकरंद भागवत

पत्रकारितेचा तीस वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक विषयांवर परखड भाष्य.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *