कृषि प्र(शांत)दर्शन!

 

 

 

 

सलग तिसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आलेले ‘वाशिष्ठी’ डेअरी चे भव्य – दिव्य कृषि प्रदर्शन नुकतेच चिपळूणला यशस्वीरित्या पार पडले. डोळ्याचे पारणे फिटेल आणि वर्षभर आठवणी ताज्या राहतील अशा देखण्या पद्धतीने स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानावर कृषिग्राम उभारण्यात आले होते. दरवर्षी या कृषि प्रदर्शनात नवनवीन कल्पना, भव्यदिव्यता यात होत जाणारी वाढ, असंख्य प्रकारचे पशु- पक्षीधन, बचत गटांपासून विविध प्रकारच्या व्यावसायिकांना आर्थिक उन्नतीसाठी दिली जाणारी संधी यामुळे या प्रदर्शनाची हवा आता कोकण, पश्चिम महाराष्ट्र यापुरतीच राहिलेली नाही तर येत्या वर्षा – दोन वर्षांत ती संपूर्ण महाराष्ट्रात आणि हळूहळू देशात पसरेल यात शंका नाही. दरवर्षी भव्य दिव्यतेत आणि प्रतिसादात होणारी वाढ लक्षात घेता सध्याचे मैदान फारच अपुरे पडेल असे वाटते. पुढील वर्षीपासून कदाचित याच्या दुप्पट मैदानाची गरज भासू शकेल. कृषि प्रदर्शन म्हटलं की पश्चिम महाराष्ट्र, नाशिक, जळगाव, विशेषकरुन बारामतीचं नाव ठळकपणे समोर येतं, मात्र प्रशांत यादव, त्यांच्या ‘ मॅनेजमेंट एक्सपर्ट ‘ पत्नी सौ. स्वप्ना यादव, त्यांची सर्व सहकारी टीम यांनी सुभाषराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या तीन वर्षांत चिपळूणच्या या कृषि प्रदर्शनाला एक वेगळी ओळख, उंची देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हे पाच दिवस संपत नाहीत तोच पुढच्यावर्षीच्या प्रदर्शनाविषयीं उत्सुकता वाटून राहणं हे यशस्वी आयोजनाचे द्योतक आहे. भव्यदिव्यता ठेवतानाच नीटनेटके नियोजन, विविध कल्पना, सौंदर्यदृष्टी, वेगवेगळ्या गटाच्या, आवडीच्या लोकांसाठी मार्गदर्शन किंवा सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे प्रदर्शनाला मिळणारा प्रतिसाद वाढत आहे. ही कौतुकास्पद आणि सकारात्मक बाब आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील मोठमोठ्या उद्योगसमूहाना, सहकार क्षेत्रातील बड्या नेत्यांना जे पन्नास वर्षांत जमू शकले नाही आणि कोकणात तर ‘ केवळ अशक्य ‘ या गटात मोडणारा दुग्धव्यवसाय केवळ चार वर्षांत नावारूपाला आणि फायद्यात आणण्याची ‘किमया’ वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून प्रशांत यादव यांनी साधली आहे. त्यांच्या या यशाचे गुपित स्पर्धेच्या युगात ‘गुपित’ स्वरूपातच राहणे आवश्यक आहे. वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून कोकणात दुग्धक्रांती झाली तर फार मोठे कार्य ठरेल. ‘वाशिष्ठी’ला दुधाचा महापूर येवो आणि त्यातून आर्थिक, सामाजिक उन्नती साधली जाओ याच शुभेच्छा. ‘अमूल दूध पीता हैं इंडिया’ या धर्तीवर भविष्यात ‘वाशिष्ठी दूध पीता हैं इंडिया’ अशी जाहिरात पाहण्यास मिळेल अशी आशा करूया.

कृषि प्रदर्शनाला मिळणारा प्रचंड प्रतिसाद हा कौतुकास्पद असला तरी अजून त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे आलेल्या हजारो लोकांतून नेमके किती तरुण तरुणी, महिला या कृषि क्षेत्राकडे वळल्या… बेरोजगार म्हणून नुसतंच फिरणारे तरुण या प्रदर्शनातून नेमका कोणता रोजगार उभा करू शकले… नोकरीसाठी मोठमोठ्या शहराकडे धावणाऱ्या तरुणांपैकी किती तरुण गावात थांबले…याकडे गांभीर्याने लक्ष दिले गेले पाहिजे. त्याचा आढावा घेतला गेला पाहिजे. त्यासाठीची यंत्रणा उभारली पाहिजे. नुसतंच प्रदर्शन पाहून गाय, बैल, म्हैस, घोडे, कुत्रे, मांजरे किंवा गोठे, घरे यांच्याबरोबर फोटो काढणे, रिल्स करणे हाच उद्देश असू नये. ते करताना ज्यासाठी हे प्रदर्शन भरवले आहे त्यातून आपल्याला काय घेता येईल, कोणता रोजगार करता येईल याकडे अधिक लक्ष दिले जाईल तेव्हा या प्रदर्शनाचे उदिष्ट खऱ्या अर्थाने सफल होईल. कारण शेती हा ग्रामीण भारताचा कणा होता तोच आता मोडला आहे. अशा प्रदर्शनातून हाच कणा पुन्हा मजबूत झाला तर त्याचे श्रेय मोठे असेल. प्रत्यक्ष शेतीविषयक, रोजगार विषयक मार्गदर्शन सत्रात ज्यादिवशी मंडपात बसायला जागा मिळणार नाही, घोडे, बैल यांच्याबरोबर फोटोत रमणारे तरुण – तरुणी या मंडपात गर्दी करतील आणि पुढल्या प्रदर्शनात आपला विशेष असा स्टॉल लावतील तर ‘ वाशिष्ठी ‘ चा हा संकल्प खऱ्या अर्थाने सिद्धीस जाईल. प्रशांत यादव, स्वप्ना यादव आणि त्यांच्या टीमने याकडे लक्ष द्यावे अशी अपेक्षा आहे. आणखी एक महत्वाचा मुद्दा सुचवावा वाटतो. काही ठिकाणी पाण्याचा दुष्काळ तर काही ठिकाणी डुक्कर, वांदर, बिबटे यासारख्या प्राण्यांमुळे लोकं शेती किंवा शेतीपूरक व्यवसाय करण्यास तयार होत नाहीत. त्यामुळे वाशिष्ठी डेअरीने पाण्याचे स्रोत वाढविण्यासाठी बंधारे तसेच वन्यप्राणी त्यांच्या मूळ अधिवासात राहण्यासाठी वेगवेगळ्या भागात जंगलं विकसित करण्यासाठी पुढाकार घेतला तर सर्वच दृष्टीने उपयुक्त ठरेल. जमिनीची धूप, गाळ, पूर यासह वन्यप्राण्यांचे मानवी वस्तीत येणे याला आळा बसेल. पर्यावरण चांगले राहील. गतवर्षी आम्ही काही पत्रकार कच्छ येथे गोसेवा केंद्र पाहण्यासाठी गेलो होतो. त्या संस्थेने शेकडो एकर जमिनीवर जंगल तयार केलं आहे. तिथं मनुष्यप्राणी जाण्यास सक्त मनाई आहे. या जंगलामुळे त्यांच्या एकूणच जमीन, पाणी आणि कृषि निगडित कार्याला मोठा फायदा झाला आहे. असो. माझ्या अल्पबुद्धीनुसार काही अपेक्षा, सूचना केल्या आहेत. योग्य वाटल्या तर त्यावर विचार व्हावा. चुकीच्या असतील किंवा आधीच अंमलात येत असतील तर सोडून द्याव्यात. कारण कृषि – सहकार क्षेत्रात आम्हाला फार गती नाही. पुन्हा एकदा प्रशान्त यादव, सौ. स्वप्ना यादव आणि त्यांच्या सहकार्यांचे अभिनंदन आणि पुढील प्रदर्शनासाठी शुभेच्छा.

*ता. क.* कृषि प्रदर्शन हा लोकांसाठी जेवढा उपयोगी आणि महत्वाचा उपक्रम आहे तेवढाच तो प्रशांत यादव यांच्या राजकीय करियरसाठी महत्वाचा ठरत आहे. प्रदर्शनाचा शुभारंभ यादव यांच्या वाढदिवशी होणं, वाढदिवस हजारो लोकांच्या आणि मोठमोठ्या नेत्यांच्या उपस्थितीत साजरा होणं ही राजकीय शेती समृद्ध करणारी (कोणी कितीही नाही म्हटलं तरी ) बाब नक्कीच आहे. अर्थात त्यात वावगं असं काही नाही. कारण प्रशांत यादव यांना कृषि आणि सहकारात टीकायचं असेल, वाढायचं असेल तर राजकीय पाठिंबा आवश्यक आहे आणि त्यासाठी स्वतःची ताकद, आवाका सिद्ध करणंही नक्कीच महत्वाचे आहे. गेल्यावर्षी त्यांनी राजकीय चातुर्य दाखवून ‘ कमळाची शेती ‘ करण्याचा निर्णय घेतला. पालिका निवडणुकीत त्यांनी चिपळूणच्या काही तळ्यातून कमळं फुलवून दाखवली आहेत. आता तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कमळाची शेती फुलवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे येणारच आहे. त्यानंतर 2029 च्या निवडणुकीत त्यांना स्वतःसाठी कमळ फुलवायचं आहे. त्यासाठी त्यांना अगदी सदानंद चव्हाण यांच्यापासून भाजपातील ज्येष्ठ आणि तरुण नेत्यांनी शुभेच्छाही दिल्या आहेत. उदय सामंत यांनी आपल्या धनुष्यातून अनेक बाण मारून वाशिष्ठीचा प्रवाह आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला, पण भाजपवाल्यानी आपलं ‘तंत्र-मंत्र’ वापरून यादव यांना वाशिष्ठी तीरी ‘कमळाची शेती’ करण्यास प्रोत्साहन दिलं. कमळाच्या फुलांमुळे ‘लक्ष्मी’ प्रसन्न होतेच आणि असंख्य भ्रमरही आकृष्ट होतात आणि कमळाच्या पाकळ्या त्यांना अलगद बंदिस्त करतात. त्यातून बाहेर पडणं सहज सोपं नसतं एवढं मात्र खरं. प्रशांत यादव भविष्यात कमळाची शेती कशी करतात, किती वाढवतात, त्यातून फायदा किती होतो याबाबत मात्र सर्वांनाच उत्सुकता आहे कारण त्यांनी आपल्याभोवती माहोलही तसाच तयार केला आहे.

संपादक मकरंद भागवत

पत्रकारितेचा तीस वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक विषयांवर परखड भाष्य.

Related articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *