संगमेश्वरात महामार्ग रोखला!

संगमेश्वर : कोकणातून जाणाऱ्या मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम गेली तब्बल १८ वर्षे रखडले असून त्यामुळे अपघातांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. या पार्श्वभूमीवर कोकणवासीयांचा संयम संपत चालल्याचे चित्र संगमेश्वर तालुक्यात दिसून आले. जनआक्रोश समितीच्या वतीने सोनवी पुलाजवळ महामार्ग रोखून जोरदार रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली.
मुंबई–गोवा महामार्ग हा कोकणवासीयांसाठी केवळ वाहतुकीचा मार्ग नसून जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. मात्र अर्धवट अवस्थेत असलेल्या या महामार्गामुळे रोज अपघात, मृत्यू, आर्थिक नुकसान आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे हा प्रश्न आता विकासापुरता मर्यादित न राहता कोकणवासीयांच्या जीविताचा आणि जगण्याच्या हक्काचा बनला असल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली.
आंदोलनादरम्यान शासनाच्या उदासीन भूमिकेचा निषेध करत आंदोलकांनी प्रतिकात्मक तिरडी यात्रा काढली. “हा महामार्ग म्हणजे कोकणाचा मृत्यूमार्ग बनत चालला आहे,” असा गंभीर संदेश देत शासनाने रखडलेले काम तातडीने पूर्ण करण्याचे ठोस व लेखी आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची ठाम भूमिका जनआक्रोश समितीने घेतली आहे.
सलग सुमारे एक तास महामार्ग पूर्णपणे बंद राहिल्याने दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. याचा फटका प्रवासी, रुग्णवाहिका तसेच मालवाहतूक वाहनांना बसला. मात्र या परिस्थितीसाठी प्रशासनालाच जबाबदार धरावे, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली.
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच उपविभागीय अधिकारी निलेश माईंनकर आणि पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली व त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र महामार्गाचे काम त्वरित सुरू न झाल्यास आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा इशारा जनआक्रोश समितीने दिला आहे.

