‘वाशिष्ष्ठी’च्या कृषी प्रदर्शनाला प्रचंड प्रतिसाद!

चिपळूण  : येथे झालेले कृषी व पशूधन प्रदर्शन लाखो नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहे. दिनांक ५ ते ९ जानेवारी २०२६ रोजी चिपळूण येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानावर प्रशस्त जागेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले होते. या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री, मा.केंद्रीय मंत्री, खा. नारायणराव राणे यांच्या हस्ते झाले.

यावेळी माजी आमदार, भाजप नेते डॉ. विनय नातू, भाजप नेते वैभव खेडेकर,चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण‌, संचालक सौ. स्मिताताई चव्हाण, सतीश मोरे, तसेच संयोजक वाशिष्टीचे अध्यक्ष प्रशांत यादव, मुख्यप्रवर्तक स्वप्ना यादव यांच्यासह अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होती. पाच दिवस चाललेल्या या प्रदर्शनात सात लाखपेक्षा जास्त नागरिकांनी भेट दिली.

*खा. राणे यांच्याकडून यादव यांचे कौतुक..*

माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांचे स्वास्थ्य ठीक नसले तरी भाषणातून कोकणी माणसाला जागृत करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. केवळ शिक्षण आणि नोकरी या चक्रात फसू नका तर गावांचा विकास होणे गरजेचे आहे. जर गावांचा विकास व्हावा अशी धारणा असेल तर युवकांना स्वयंरोजगाराकडे वळले पाहिजे. केवळ शेती नको तर शेतीस जोडधंदे आवश्यक आहेत. पशुपालन, दुग्ध व्यवसाय, बागायती फळझाडे लागवड, त्याचे अर्थकारण ही स्वयंपुर्णतेची गुरुकिल्ली आहे! हे प्रदर्शन युवकांना उद्युक्त करेल! असे गौरवोदगार खासदार नारायण राणे यांनी आपल्या मनोगतात काढले व प्रशांत यादव यांच्या धाडसचे भरभरून कौतुक केले.

*विविध स्टॉल.. सर्व एका छताखाली*

या प्रदर्शनात असंख्य स्टॉल उभारण्यात आले होते. महिलांनी बनवलेले पाकीटबंद पदार्थ विक्रीला ठेवले होते. खाऊ, लोणची, सांडगे पापड, आयुर्वेदिक औषधे, परफ्यूम, आईस्क्रीम, पुस्तके, शेती अवजारे, पशु आहार, घरोपयोगी साहित्य,धूप उदबत्ती ची विक्री, खादीचे कपडे, लोकरी पासून बनवलेले वस्तू, जाजम, चटई, विद्युत उपकरणे, वाहने, यांसारख्या अनेक वस्तूंचे प्रदर्शन भरले. याशिवाय नानाविध रंगीबेरंगी फुलांची संकरीत झाडे, फळांची कलमे, शेती विषयक मार्गदर्शन, परिसंवाद, प्रात्यक्षिके यांची रेलचेल होती.

*पशू पक्षांनी मन जिंकले…*

यानंतर प्रदर्शनातील मध्यावर एकाहून एक सरस देखण्या आकर्षक घोड्यांवर लोकांच्या नजरा खिळल्या. एक हजार किलो हून अधिक वजनाचा सोन्या रेडा , म्हशी, मुरा क्रॉस ब्रीड जातीचा रेडा, सर्वात छोटी म्हैस , विविध प्रजातींचे वळू ,गाय, वासरे, उंट, शेळ्या, आखाती, आशियाई देशांतील कोंबड्या, बदके, चिमण्या, निळ्या रंगाचा आफ्रिकन पोपट आणि आबालवृद्ध यांपासून सर्वांचे आकर्षण ठरलेला भलामोठा सरडा आणि बिबट्या सारखे ठिपके असलेली मांजरे अगदी सर्व गोष्टी दुर्मिळ आणि लक्षवेधी असल्याने ते या प्रदर्शनाचे आकर्षण ठरले होते.

*खवय्यांची रेलचेल..*

या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे एका विशिष्ट दिशेला खाऊ गल्ली तयार केली होती, दिवसभर खवय्यांची रेलचेल त्या ठिकाणी होती. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने इथल्या व्यवस्थेची पाहणी वाशिष्ठी समुहाची माणसे करीत होती. सौ. स्वप्ना यादव जातीनिशी इथल्या व्यवस्थेवर देखरेख ठेऊन होत्या.

*बकासुर, मथुर, सर्जा, चिकू साऱ्यांनी मन जिंकले..*

दररोज बैलगाडी शर्यतीतील नामचीन दिग्गज नंदी या प्रदर्शनात आमंत्रित केला होता. या तुफान व्हायरल बैलांना पाहण्यासाठी प्रेक्षकांचा गराडा पडायचा. या मैदानावर या नावाजलेल्या बैलांच्या रॉयल एन्ट्रीने चिपळूणकर सुखावले.

*स्पर्धा व कार्यक्रमांची रेलचल…*

कृषी प्रदर्शन काळात अनेक स्पर्धा घेण्यात आल्या. पाककला स्पर्धा, कॅट शो, डॉग शो, याशिवाय शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन चर्चा सत्र, यान मोठ्या डॉक्टरांचे पथक शेतकऱ्यांना उपयुक्त सल्ले देत होते. रोज रात्री भजन संध्या,कीर्तन, हरिपाठ, संस्कृती दर्शन कार्यक्रम, यात गायक, निर्माता अशोक हांडे, गायक, संगीतकार अवधूत गुप्ते यांचे सादरीकरण झाले. या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी आलेल्या लोकांनी गत वर्षीचा उच्चांक केव्हाच पार केला. कृषी प्रदर्शनाला उदंड उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याने खूप मोठी आर्थिक उलाढाल या कृषी प्रदर्शनात झाली. सायंकाळी लहान मुलांना उंटाची सफारी, घोड्यांची सैर करायला मिळत होती. काही हौशी लोक या पाळीव जनावरांच्या सोबत फोटो घेण्यासाठी धडपडत होते. एकंदरीत हा सुख सोहळ्याने आनंदाला भरती आणली .

 

*सुखाची अनुभूती*

आतापर्यंत आपण केवळ भौतिक सुखाची चर्चा केली. आता वळूया स्वतःला अंतर्मुख करणाऱ्या आत्मिक समाधानाच्या शोधाकडे…

कोकणी माणूस आपलं वेगळेपण काही काळापूर्वी अबाधित राखून होता. पण जेव्हा विकासाच्या नावाखाली सुसंगत जगण्याला चूड लावणारे निर्णय आपण कोकणी माणसाने घेतले. त्यांचे परिणाम आपण भोगतोच आहोत. पण या दुष्परिणामांची शिदोरी आपण भावी पिढीलाही देणार आहोत! पण अशा परिस्थितीत आपल्या सुखाची अनुभूती वाढवणारी स्मृती मनात जीवंत करण्याचा प्रयत्न झाला.

*ग्रामीण जीवनाची नाळ*

कृषी प्रदर्शनात मातीचं घर, गोठा, मचान, पेंढ्याची अडवी , लोहार, कुंभार यांच्या जगण्यातला जिवंत पणा अनुभवता आला. अंगणाचं सारवण, तुळशी वृंदावन, सडा- सारवण, रांगोळी, बांबूच्या झापांची घरे, यामध्ये आपल्या ग्रामीण जीवनाची नाळ शोधण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला.

*पुन्हा चित्र बदलेल…*

कोकणातील जीवन हे पशुपालन, शेती, वायंगणी शेती, शेत मजूरी, यांच्या एकसंधतेतून बहरले होते.

एकेकाळी कुटुंबातील एक व्यक्ती कामासाठी परगावी जात असे पण काळानुरूप चित्र बदलले, आता गावातील घरात एक दोन वृद्ध व्यक्ती असतात. कुटुंबातील उर्वरित सदस्य हे शहरात स्थायिक होतात. हळूहळू होत असलेल्या या बदलांमुळे कोकणची दुर्दशा झाली आहे. आता पुन्हा एकदा कोकणातील शेती व शेतीपूरक व्यवसाय तरुणांना खुणावत आहेत.

*पुन्हा गोकुळ नांदेल…*

कोकणातील तरुण नोकरीसाठी शहरात गेल्याने आता घर,गोठा सारेच ओस पडले. कोकणी माणसाचे पाऊल गैरमार्गावर का वळले हा चिंतनाचा विषय! एकंदरीत वाशिष्ठी डेअरीने आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनात कोकणातील लुप्त होणारी संस्कृती, इथल्या जगण्याची किंमत ध्यानात येईल अशी सुंदर सुबक मांडणी केलेली होती. दररोज हजारोंच्या संख्येने लोक या कृषी प्रदर्शनाला भेट देण्यासाठी आले होते. नक्कीच गतवर्षीच्या उच्चांक मोडीत निघाला असेल! अशा प्रदर्शनात शेती आणि शेतीपूरक जोड धंद्याना बळ देणारी प्रेरणा, यंत्रणा यांचा मेळ बसला तर ओस पडलेल्या गोठ्यात गायींचे संगोपन होईल ….आणि भकास वाड्या वस्त्यांवर गोकुळ पुन्हा नांदेल असा आशावाद वाटतो वाटतो.

*सब कुछ यादव… कौतुकास्पद!*

वाशिष्टीचे अध्यक्ष प्रशांत यादव, मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव व त्यांच्या टीमने गेली तीन वर्षे हे प्रदर्शन भरवून एक नवा अध्याय घडवला आहे. याची बीजे भविष्यात नक्कीच दिसतील. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. एखाद्या इव्हेंट कपंनीपेक्षाही जबरदस्त काम या टीमने सौ. यादव मॅडम यांच्या नेतृवाखाली केले त्याला तोड नाही. भविष्यात त्यांची प्रेरणा घेऊन अनेक शेतकरी, व्यावसायिक, उद्योजक तयार होतील तेच या प्रदर्शनाचे फलित आहे, तेव्हा प्रशांत व स्वप्ना यादव हे दिपस्तंभ ठरतील.

संपादक मकरंद भागवत

पत्रकारितेचा तीस वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक विषयांवर परखड भाष्य.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *